महिन्यातून एक परिक्रमा अंबाजोगाईची केली की आपल्याला आपल्या वेगवेगळ्या समाज बांधवांचे दर्शन होते व त्यांचे बदलते स्वरूप आणि व्यथा पण कळतात.
विठुरायाच्या पंढपुरहुन आलेले धनगर बांधव बोलतात मात्र तेलगू. प्लस्टिकचे भांडी विकण्याचे काम करतात.एकूण दहा कुटुंब आहेत.
बाबा आमटेंच्या वरोरा तालुक्यातील आलेले बहुरूपी बांधव आज खुर्च्या विकणे व बाज विकण्याचा व्यवसाय करतात. एकूण 9 कुटुंब आहेत.
गजानन महाराजांच्या शेगावच्या अगदीच जवळ रस्त्यावर असणाऱ्या अकोट तालुक्यातील फासेपारधी तर सुंदर फुल, पक्षी आणि झुंबर तयार करून विकण्याचा व्यवसाय करतात.गंमत म्हणजे हे वेगवेगळ्या भाषेत बोलतात. मुख्यतः गुजराती मधून !! एकूण आठ कुटुंब.
बीड जिल्ह्यातील नाथापूरहुन आलेली वडार बांधव विहीर फोडण्याचे काम करतात !! पाच कुटुंब.
सगळेच काही काळ आपल्या भागात राहतात. मोकळ्या जागेत आपली चंद्रमोळी झोपडी उभारताना. उघड्या आकाशाखाली कुडकुडत झोपतात.
काहींची लेकरं शिकत आहेत तर काहींनी शिकणार नाहीत हे स्वीकारले आहे. अशा अंबाजोगाईच्या परिक्रमेतुन फक्त महाराष्ट्र दर्शनच होत नाही तर भारतदर्शन आणि देवदर्शन पण होतं !!
देश बदलण्यासाठी देशातील सर्वांचे जीवनमान सुधारले पाहिजे हे मात्र आता पटते !! त्याआधी निदान अंबाजोगाईत आपले प्रेमाने विचारपूस करणारे कुणी तरी आहे हा आनंद द्यायला तरी सुरुवात केली पाहिजे !!
लेखन :प्रसाद चिक्षे