जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी घेतला अल्पसंख्याक विकास योजनांचा आढावा
▪️ जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन
लातूर, दि. २७ : जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला. तसेच या योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तीला देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी सोमनाथ रेड्डी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, माध्यमिकाचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिकाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता संजय सावंत, पुरणमल लाहोटी शासकीय यंत्र निकेतनचे प्राचार्य नितीन नितनवरे, नितीन आगावणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ समाजातील अल्पसंख्याक घटकांपर्यंत पोहचवून त्यांच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करावा, असे श्री. गांधी यावेळी म्हणाले.

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य करते. त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह लातूर येथे कार्यान्वित आहे. या वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी जास्तीत जास्त मुलींना प्रोत्साहित करावे, असे श्री. गांधी यांनी सांगितले.
जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे लातूर जिल्हा कार्यालय लातूर येथील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते झाले. जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यावेळी उपस्थितीत होते.
