*अरविंद पाटील निलंगेकर यांचे आवाहन*

0
1010
लोकप्रतिनिधींनी लोकाभिमुख होऊन कार्य करावे-अरविंद पाटील निलंगेकर
जि.प. सदस्य आढावा बैठकीत आवाहन
लातूर/प्रतिनिधी ः- लोंकाचे प्रश्न सोडून त्यांचे हित साधण्यासाठी लोकप्रतिनिधींस निवडून दिले जाते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही कार्यरत असून लोकप्रतिनिधी या नात्याने अधिकाधिक लोकाभिमुख होऊन लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिक सक्रियपणे कार्य करावे असे आवाहन  भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत बोलताना त्यांनी हे आवाहन केले आहे. यावेळी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्षा सौ. भारतबाई साळुंके, सभापती गोविंद चिलकुरे, रोहिदास वाघमारे, माजी सभापती तथा जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषद हे उत्तम व्यासपीठ असून या व्यासपीठावर सदस्य या नात्याने काम करण्याची संधी मतदारांनी तुम्हाला दिली असल्याचे सांगत अरविंद पाटील निलंगेकर यांनी मागील काळात केलेली कामे आणि आगामी काळात होणारी कामे ही अधिकाधिक लोकाभिमुख होऊन त्याचा फायदा जनतेपर्यंत पोहंचविण्यासाठी सदस्यांनी आता अधिक सक्रियपणे काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता मोजकेच दिवस कामासाठी असून या काळात सर्वसामान्य जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासह त्यांना अधिकाधिक शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सदस्यांनी पुढाकार घेत मतदारसंघात सातत्याने संपर्क करणे अपेक्षीत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या संपर्काच्या काळात गेल्या पाच वर्षात तुम्ही आणि पक्षाच्या माध्यमातून पक्षनेत्यांनी याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांची माहिती आणि सर्वसामान्या जनतेला झालेला लाभ याचाही लेखाजोखा मांडणे आवश्यक असल्याचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी सांगितले.
विशेष म्हणजे राज्यात आपली सत्ता नसतानाही आपण केलेली कामे आणि त्यामुळे झालेला सर्वसामान्यांचा लाभ यासोबतच जिल्हा परिषदच्या माध्यमातून झालेली लोकहिताची कामे ही आगामी काळात आपल्या निवडणूकीची शिदोरी असून ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी पुढील दिवसात केवळ आणि केवळ मतदारसंघातच राहून सर्वसामान्यांची संपर्क साधणे क्रमप्राप्त असल्याचे सांगून अरविंद पाटील निलंगेकर यांनी या संपर्क मोहिमेत अधिकाधिक लोकांना सहभागी करून घ्यावे असे आवाहन केले. यासोबतच कोरोना प्रतिबंधक लस नागरीकांनी घेतली आहे का नाही याची शहानिशा करून आपला मतदारसंघात शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी सदस्यांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. मतदारसंघाच्या विकासकामांसह गरजू आणि वंचीत घटकांना वैयक्तीक लाभाच्या योजना मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न याचाही लेखाजोखा प्रत्येक सदस्यांनी आपल्या मतदारसंघात पोहचवावा असे आवाहन अरविंद पाटील निलंगेकर यांनी यावेळी केले.
बैठकीच्या प्रास्ताविकात जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पक्षश्रेष्ठींनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली म्हणून त्यांचे आभार व्यक्त करत या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सर्वसामान्यांच्या विकासाला केंद्रबिंदू ठेऊन केलेला कामांचा लेखाजोखा संक्षिप्त स्वरूपात मांडला. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्यांना कांही महत्वाच्या सुचनाही प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here