आमची मुलगी , देवश्री ने जगप्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स इन जर्नालिझम कोर्स पूर्ण केला.तिच्या काँव्होकेशन साठी आम्ही सध्या अमेरिकेत आलो आहोत.या निमित्ताने मी,माझ्या Devendra Bhujbal या फेसबुक पेज सुरु केलेल्या
“अमेरिका अमेरिका…” या लेख मालेतील हा विसावा भाग….
स्वामीनारायण मंदिर
डॉ सुलोचना गवांदे मॅडम आणि डॉ गुलाम सर यांनी आम्हाला त्यांच्या कार ने माझी पुतणी सौ अंजली पंकज विभुते
( संगमनेर येथील माझा मामेभाऊ गोरख रासने व सौ सुरेखा वहिनी यांची कन्या) घरी सोडले.
अंजलीचे पती
श्री पंकज हे गेली ४ वर्षे अमेरिकेत आहेत.ते सध्या बार्सलेस या एका मोठ्या अमेरिकन बँकेच्या आयटी विभागाचे उपाध्यक्ष आहेत.
ती रात्र व दुसऱ्या दिवशीचा अर्धा दिवस त्यांच्या घरी कसा गेला, हे कळलेच नाही.विशेष म्हणजे एकदिड वर्षाच्या त्यांच्या रिशा या लहान मुलीच्या वेगवेगळ्या लीला पाहून आम्ही हरखून गेलो.
इतकी वर्षे मला वाटत असे की,अमेरिकेतील मराठी माणसे ,जेवण सुध्दा अमेरिकन घेत असतील! पण अंजली आणि पंकज यांच्या घरी राहिल्याने कळाले की,येथील मराठी माणसे आपल्या सारखेच वरण भात, भाजी, आमटी, पोळी असेच जेवण घेत असतात!.
दुसऱ्या दिवशी,आम्ही म्हणजे भुजबळ आणि विभुते परिवार,विभुते यांच्या कार ने न्यू जर्सी येथून १८ मैलांवर असलेल्या रॉबिन्स व्हिले येथील जग प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिर पहायला गेलो. अंजलीची मोठी मुलगी,रिया मात्र तिचा अभ्यास अस आमच्या बरोबर येऊ शकली नाही.
हिंदू मूल्ये,आचार विचार यांच्या प्रचारासाठी १७ शतकात नीलकंठ वर्णी यांनी स्वामीनारायण पंथाची स्थापना केली. आज जग भर ३ हजार ३०० ठिकाणी या पंथाची केंद्रे स्थापन झाली आहेत.
रॉबिन्स व्हिले येथील परिसरात प्रवेश करण्यापूर्वीच बाल
नीलकंठ वर्णी यांची ४९ फूट उंचीची सुरेख मूर्ती आपले लक्ष वेधून घेते.नीलकंठ वर्णी यांना ४९ वर्षांचेच आयुष्य लाभल्याने या मूर्तीची उंची सुध्दा ४९ फूट ठेवली आहे.
हा पूर्ण परिसर सुंदर बागा,कारंजे,हिंदू शैलीतील मंदिरे यांनी नटलेला आहे.आतील प्रमुख स्वामीनारायण
मंदिर,तेथील आकर्षक स्थापत्य शैली,रचना सर्व काही आपल्याला मंत्रमुग्ध व नत मस्तक करते.आत सुसज्ज भोजन गृह,विविध प्रकारचे शाकाहारी खाद्य पदार्थ आपल्याला मिळतात.पण २ नियम मात्र पाळावे लागतात, ते म्हणजे जे काही लागेल ते एकदाच घ्यायचे आणि दुसरा नियम म्हणजे उष्टे काही टाकायचे नाही.खरं म्हणजे हे दोन्ही नियम आपण रोजच्या जीवनात आणि विशेष म्हणजे लग्न कार्यात जेवताना तर नक्कीच पाळावे,असेच आहेत.
आम्ही गेलो,तो शुक्रवार चा दिवस असल्याने गर्दी तशी कमी होती.अन्यथा शनिवार,रविवारी येथे ५ हजार हून अधिक जास्त भाविक येत असतात,असे कळाले.
इथे सेवा देण्यासाठी एरवी उच्च पदांवर असलेले स्वयंसेवक तत्पर असतात.सेवा देण्यासाठी सुध्दा शेकडो जण इच्छुक असतात. सध्या पुढील ३ महिने स्वयंसेवकांची नाव नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे,या वरून इच्छुकांची संख्या लक्षात येईल.
या सुंदर,भव्य मंदिरात,आध्यत्मिक वातावरणात चारपाच तास कसे गेले,हे आम्हाला कळलेच नाही.अनिच्छेनेच आम्ही तेथून निघालो.
स्वामी नारायण मंदिर येथून परत न्यू यॉर्क येथे जाण्यासाठी आम्हाला पंकज यांनी प्रिंस्टोन स्टेशन ला सोडले.पण तिथे गेल्यावर कळाले की,आपल्याला
प्रिंस्टोन स्टेशन ऐवजी
प्रिंस्टोन जंक्शन येथे जायला हवे. म्हणून परत त्यांनी आम्हाला
प्रिंस्टोन जंक्शन ला सोडले.कार मधून उतरताना छोटी रिशा अलका ला सोडायला तयारच होईना,इतका तिला अलका चा एका दिवसात लळा लागला होता.रडून रडून तिने तिची नाराजी चांगलीच व्यक्त केली.आम्हाला ही तिला सोडवेना.पण शेवटी तिला रडत रडत ठेऊनच आम्हाला निघावे लागले.
प्रिंस्टोन स्टेशन आणि जंक्षन हे नाम साधर्म्य
आमचा चांगलाच घोटाळा करून गेले.त्यामुळे कुठल्या तरी एका स्टेशन चे नाव बदलायला हवे,असे मला वाटत राहिले!
–देवेंद्र भुजबळ
+919869484800