स्नेहमिलन
आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे विविध उपक्रम आहेत.त्यातील एक छान उपक्रम म्हणजे स्नेह मिलन.
आज आपण बघतो की,जीवनातील सहजपणा हरवत चालला आहे.कामाशिवाय कुणी कुणाकडे जाणे तर दूरच राहिले,साधे बोलणे देखील होत नाही. त्यामुळे आर्थिक,
भौतिक संपन्नता येऊनही माणूस सुखी होण्याऐवजी विविध शारीरिक, मानसिक आजारांना बळी पडत चालला आहे.
या वर एक उपाय म्हणून आपण आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल शी संबंधित व्यक्तींचे अतिशय अनौपचारिक असे स्नेह मिलन घेत असतो.विशेष म्हणजे हे स्नेह मिलन कुणाच्या तरी घरीच होते.इथे कुणी अध्यक्ष,प्रमुख पाहुणे,सूत्र संचालक असे काही नसते.कुठल्या ही प्रकारचे आखीव रेखीव स्वरूप नसते. सहजभाव हाच महत्वाचा असतो.त्यामुळे दिलखुलास गप्पा गोष्टी होतात.आता पर्यंत संगमनेर, नाशिक,पुणे, विरार ,नवी मुंबई या ठिकाणी असे स्नेह मिलन झाले.उपस्थित सर्वांसाठी ते अविस्मरणीय ठरले.
आपल्या पोर्टल शी संबंधित अनेक व्यक्ती अमेरिकेत आहेत.पण स्नेह मिलन चे स्वरूप अबाधित ठेवून ते इथे व्हावे,असे मला आल्यापासून वाटत होते.आणि विशेष म्हणजे तसे स्नेह मिलन इथे खरेच झाले. God is great!
आपल्या पोर्टल च्या लेखिका,ज्येष्ठ कॅन्सर संशोधक डॉ सुलोचना गवांदे या गेली ३५/४० वर्षे अमेरिकेत आहेत.त्या न्यू जर्सी येथे राहतात.३ मे रोजी मुंबईत त्यांच्या “रिव्हीलींग सिक्रेट ऑफ कॅन्सर ” या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी त्यांनी न्यू जर्सी येथील त्यांच्या घरी येण्याचे अतिशय अगत्याने आमंत्रण दिले.
गवांदे मॅडम अतिशय बिझी असतात. त्यांच्या कामानिमित्त त्यांचे जगभर सतत दौरे असतात. असे असूनही लोकांमध्ये कॅन्सर विषयी जागृती निर्माण व्हावी,त्यांनी योग्य ती जीवनशैली अंगिकारावी यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. याचाच एक भाग म्हणून त्यांनी तीनचार वर्षांपूर्वी “कर्करोग आणि आपण ” हे पुस्तक लिहिले.पॉप्युलर प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.पुढे महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात लेख माला लिहिली.मुंबई आकाशवाणी केंद्रावरून ही मालिका प्रसारित झाली.या सर्व बाबींमुळे त्यांना कॅन्सर वर इंग्रजीत पुस्तक लिहिण्याचा आग्रह होऊ लागला आणि त्यांनी अथक परिश्रम,संशोधन करून आता इंग्रजीत ही पुस्तक लिहिले आहे.
तर अशा या थोर गवांदे मॅडम नी नुसतेच त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले नाही तर आम्ही इथे आल्या पासून त्यांच्या घरी येण्यासाठी सतत पाठपुरावा केला.त्यांच्या व्यस्त वेळा पत्रकातून आमच्यासाठी पूर्ण एक दिवस काढला.न्यू यॉर्क येथून कुठल्या रेल्वे स्टेशन मधून किती वाजता गाडी आहे,ती कुठे थांबेल असे सर्व छान नियोजन त्यांनी केले.
गवांदे मॅडम नी सांगितल्या प्रमाणे आम्ही न्यू यॉर्क मधील पेंन स्टेशन हून गुरुवारी दुपारी १.४० वाजताची ट्रेन पकडली.बरोबर दिड तासाने ट्रेन रारितान स्टेशन ला पोहोचली.अर्थात
देवश्री बरोबर असल्याने स्टेशन मध्ये प्रवेश करणे,तिकीट काढणे,योग्य प्लॅटफॉर्म वरून योग्य गाडी पकडणे या सर्व गोष्टी सहज शक्य झाल्या. अन्यथा नव्याने येणाऱ्या,त्यात ही आमच्या सारख्या प्रौढ व्यक्तींसाठी या गोष्टी एकट्याने करणे सहज शक्य नाही.
गाडी अतिशय स्वच्छ,सुंदर होती.आपल्या कडे मेट्रो ट्रेन सुरु झाल्या आहेत,तशीच ही गाडी होती.बाहेरचे निसर्ग सौंदर्य पाहात प्रवास कधी संपला ते कळालेच नाही.
रारितान स्टेशन ला आम्ही उतरलो आणि आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. पोर्टल च्या दुसऱ्या लेखिका डॉ गौरी जोशी कंसारा यांचे पती,इंजिनियर आशिष कंसारा हे स्वतः त्यांची आलिशान गाडी घेऊन आम्हाला नेण्यासाठी आले होते.मागच्या वर्षी नाशिक येथे त्यांच्या घरी आमची भेट झाली होती.पहिल्या भेटीतच मला ते आवडले.उंचे पुरे,देखणे, हसरे,निगर्वी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.
रारितान स्टेशन हून आम्ही १५ मिनिटात गवांदे मॅडम च्या घरी पोहोचलो.तर तिथे
आश्चर्याचे आणखी काही सुखद धक्के आमची वाट पहात होते.आमच्या स्वागताला गवांदे मॅडम सोबत साक्षात डॉ गौरी जोशी कंसारा हजर होत्या.
तिसरा धक्का तर नुसता सुखद च नव्हता तर खूप गोड ही होता.
आदल्या दिवशीच देवश्री चा पदवीदान समारंभ झाल्याचे लक्षात ठेऊन ,तिचे नाव कोरलेला भला मोठ्ठा,सुंदर केक आमची वाट पहात होता. केक कापून देवश्री ची मास्टर डिग्री सेलिब्रेट केल्या गेली. हे सर्व काही इतके अनेपेक्षित होते, की खरेच वाटेना! गवांदे मॅडम चे पती डॉ गुलाम हे ही स्वतः ज्येष्ठ कॅन्सर संशोधक आहेत.पण त्यांचा ही स्वभाव अतिशय मृदू,मुलायम,स्नेहशिल, अगत्यशिल असा आहे.
गवांदे मॅडम,डॉ गौरी, अलका आणि देवश्री या चार चौघींचे लगेच मस्त गुळपिठ जमले.त्यामुळे डॉ गुलाम सर यांनी चहा,कॉफी बनवण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांना आशिष आणि मी साथ दिली.
पुढे दोन तीन तास कसे गेले काही कळालेच नाही. या दरम्यान मी दोघी लेखिकांना विशेष प्रसंगी आपण देतो,ते न्यूज स्टोरी टुडे चे,खुद्द देवश्रीने डिझाईन केलेले आकर्षक मग भेट म्हणून दिले.तर
न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन ने प्रकाशित केलेली ,सौ वर्षा महेंद्र भाबळ लिखित “जीवनप्रवास”
आणि निवृत्त पोलीस उपअधीक्षक सुनिता नाशिककर लिखित,
“मी,पोलीस अधिकारी” ही पुस्तके प्रकाशिका सौ अलका ने दोघींना भेट दिलीत.तसेच डॉ गौरी जोशी कंसारा यांनी आपल्या पोर्टलवर लिहिलेली “मनातील कविता” ही लोकप्रिय कवींच्या कवितांचे रसग्रहण करणारी,त्यांचा जीवन गौरव करणारी लेख माला लवकरच पुस्तक स्वरूपात प्रसिध्द करण्याची कल्पना सुचवली.त्यांनी ही या कल्पनेला लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला,हे विशेष.
डॉ गौरी आणि आशिष निघाले.ते गेल्यावर थोड्या वेळाने गवांदे मॅडम आणि गुलाम सर यांनी त्यांच्या कार ने आम्हाला माझी पुतणी सौ अंजली पंकज विभुते हिच्या घरी सोडले.
अशा प्रकारे अमेरिकेतील स्नेह मिलन अविस्मरणीय ठरले .
- देवेंद्र भुजबळ
+919869484800