पाणी व शेतकरी हे दैवत समजून काम करणारे अभियंते हे समाजास प्रगतीपथावर नेतात. . . . जयंत पाटील.
पुणे ;दि.१४(प्रतिनिधी) –
पाणी व शेतकरी हे दैवत समजून करणारे अभियंते हे समाजास प्रगतीपथावर नेत असतात असे गौरवोद्गार मा. ना. श्री जयंत पाटील, जलसंपदा मंत्री यांनी काढले. ते आज बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजित “उत्कृष्ट अभियंता पुरस्कार” वितरण सोहळ्यामध्ये बोलत होते.
राज्याच्या जलसंपदा विभागात सन २०१६, २०१७ व २०१८ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या अभियंत्यांचा जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात लातूर येथील मांजरा प्रकल्पातील पाण्याचे सिंचनासाठी सन २०१७ व २०१८ यावर्षी उत्कृष्ट व्यवस्थापन करणारे श्री महेंद्र भास्कर जोशी, उपविभागिय अधिकारी यांचा मा. मंत्रीमहोदयांचे हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. श्री महेंद्र जोशी यांनी सन २०१६-१७ व २०१७-१८ च्या रब्बी व उन्हाळी हंगामांमध्ये सिंचन व्यवस्थापनासाठी पुरेसे मनुष्यबळ व निरीक्षण वाहन उपलब्ध नसतानाही प्रत्येक गरजू शेतकर्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. या प्रयत्नांमुळे सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये अनुक्रमे ४८७७ हे. व ८८८४ हे. या विक्रमी क्षेत्रास पाणीपुरवठा करणे शक्य झाले. तसेच या दोन्ही वर्षांमध्ये विक्रमी पाणीपट्टी जमा करुन संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तसेच मांजरा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात उपवितरीकांची दुरुस्ती करुन कधीही पाणी न मिळालेल्या १५० हे. क्षेत्रास व्यवस्थित पाणीपुरवठा करण्यात यश मिळवले. ही त्यांची कामगिरी सन २०११ ते २०१६ या पाच वर्षांच्या या क्षेत्रामध्ये पडलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उल्लेखनिय ठरल्याने महाराष्ट्र शासनाने त्यांचा “उत्कृष्ट अभियंता” पुरस्कार देवून गौरव केला आहे. या त्यांच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.