*अन्नत्याग आंदोलनातील दोघेजण रुग्णालयात*

0
396

अन्नत्याग आंदोलनातील दोनजण रुग्णालयात दाखल

सरकारच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन

लातूर/प्रतितिनधी ः- अतिवृष्टी आणि पुर परिस्थितीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना सरसकट मदत तात्काळ मिळावी यासह विविध मांगण्यासाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात लातूर येथील शिवाजी चौकात सोमवार दि. 11 ऑक्टोंबर पासून 127 शेतकर्‍यांनी 72 तास अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केली आहे. आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी आंदोलनकर्त्यापैकी दोन शेतकर्‍यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्याचबरोबर शेतकर्‍यांना पोरके करणार्‍या सरकारच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यापैकी 21 शेतकर्‍यांनी मुंडन आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांच्या पांठिब्यासाठी शेकडोजणांनी मुंडन केले आहे. अन्नत्याग आंदोलनस्थळी पाठिब्यांसाठी जिल्हाभरातील हजारो नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान झालेले सोयाबीन आणून आपला पाठिंबा दर्शवित आहेत.

लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटामुळे मोठ्या अडचणीत सापडलेला असून हातातोंडाशी आलेला खरीप पिकाचा घास वाहून गेलेला आहे. सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ मदत मिळणे अपेक्षीत होते. मात्र सरकारने अद्याप सरसकट मदत जाहीर न केल्याने अधिक अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना मदत मिळवून देण्याकरीता माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात लातूर येथील शिवाजी चौकात 72 तासाचे अन्नत्याग आंदोलन 127 शेतकर्‍यांनी सोमवार दि. 11 ऑक्टोबर पासून सुरु केलेले आहे. आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी आंदोलनकर्त्या दोन शेतकर्‍यांची प्रकृती खालावलेली आहे. यामध्ये देवणी तालुक्यातील काशीनाथ गरिबे व निलंगा तालुक्यातील मदनसुरीचे मुरलीधर सुर्यवंशी यांचा समावेश आहे. या दोघांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नुकसान होऊनही अद्यापर्यंत शेतकर्‍यांना मदत जाहीर न केल्याने आंदोलनकर्त्यामधील शेतकर्‍यांना सरकारने आपल्याला पोरके केल्याची भावना व्यक्त करण्यात आली व याचा निषेध म्हणून 21 जणांनी मुंडन आंदोलन केले. या मुंडन आंदोलनाला जिल्ह्यातील शेकडो शेतकर्‍यांना आपला पाठिंबा दर्शवत त्यांनीही मुंडन केलेले आहे.

आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी जिल्हाभरातील हजारो शेतकर्‍यांनी आंदोलनस्थळी येत आपल्या नुकसान झालेल्या सोयाबीनच्या पेंड्या मुंख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी आ. संभाजी पाटील निलंगेकर व जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांच्यासह खा. सुधाकर श्रृंगारे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्याकडे सुर्पूद केले. यावेळी या शेतकर्‍यांनी गेंड्यांची कातडी पांघरलेल्या या सरकारला जाग आणण्यासाठी आपण पुढाकार घेत आम्हाला मदत मिळवून द्यावी अशी भावना या शेतकर्‍यांनी यावेळी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्र्यांसह माजी मंत्र्यांचा पाठिंबा

शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी जे अन्नत्याग आंदोलन सुरु केलेले आहे त्याला केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, भागवत कराड यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खा. प्रताप पाटील चिखलीकर, खा. डॉ. प्रितम मुंडे, कर्नाटकचे माजी मंत्री प्रकाश खंड्रे, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. अतुल सावे, आ. सुरेश धस, आ. नमीता मुंदडा यांनी दुरध्वनीद्वारे संपर्क साधून पाठिंबा दर्शविलेला आहे. त्याचबरोबर माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ध्वनीचित्रफीतीच्या माध्यमातून संदेश पाठवून या आंदोलनाला पाठिंबा देत या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी आपण सरकारला भाग पाडू असा विश्वास शेतकर्‍यांना दिला. आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती लातूर, भुकंपग्रस्त कृति समिती, लातूर-उस्मानाबाद, जिल्हा विधिज्ञ आघाडी यांच्यासह शेकडो शिक्षक शेतकर्‍यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दिला आहे.

निटूर कडकडीत बंद

शेतकर्‍यांना अतिवृष्टीची सरसकट भरपाई मिळावी तसेच पिक विमा मिळावा यासाठी मा. मंञी तथा आ. संभाजीराव पाटील निलंगेकर लातूर येथे उपोषणास बसले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आज निटूरमध्ये ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला व अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला.

आज सकाळपासून च व्यापार्‍याने आपापली दुकाने उघडली नाहीत त्यामुळे बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान शेतकर्‍यांना अद्यापही पिक विमा व सोयाबीन पिकाचे सरसकट नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकर्‍यामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी शेतकर्‍यामधून होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here