लातूरकरांचा अनोखा उपक्रम
लातूर ; दि.१६ ( प्रतिनिधी) — ‘ आरोग्यासाठी… देशासाठी सायकलिंग …!’ हा संदेश देण्यासाठी लातूर सायकलिस्ट क्लबच्या ७४ जणांनी ७४ किलोमीटर सायकलिंग करून अनेकांची वाहवा मिळवली आहे .या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .
धावपळीच्या जगात सगळ्यांचे जीवन गतिमान झाले आहे .अशावेळी प्रत्येकाला आपल्या आरोग्याकडे, फिटनेसकडे लक्ष द्यायला वेळ मिळेलच असे नाही .त्यात कोरोनाची पहिली… दुसरी लाट येऊन गेली .जे कोरोना संक्रमित झाले त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सायकलिंग सारखा दुसरा चांगला व्यायाम नाही . सातत्याने सायकलिंग करण्याकडे अनेकांचा ओढा राहिला आहे .त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी लातूर सायकलिस्ट क्लब विविध उपक्रम सातत्याने राबवित असते.
या क्लबमध्ये सर्व वयोगटातील पुरुष- महिला आहेत. यात गंगाधर सोमवंशी सारखे लोक ही आहेत. ते आठवड्यातून एकदा ५५ किलोमीटर सायकलिंग करतात. त्यांच्यासह अनेकांनी तिरुपती , पंढरपूर आदी ठिकाणी सायकलचा प्रवास केला आहे. या क्लबच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात. म्हणून हा क्लब अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे.
देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आणि फिटनेसचा संदेश देण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व सकाळी लातूर सायकलिस्ट क्लबच्या वतीने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सकाळी जिल्हाधिकारी बी . पृथ्वीराज, पोलिस अधीक्षक डॉ. निखिल पिंगळे उप जिल्हा अधिकारी गणेश महाडिक व सदाशिव पड़धूने यांनी हिरवी झेंडी दाखवतात ७४ सायकलस्वारांनी आपल्या मार्गाकडे कूच केली. यात पन्नाशी पार केलेल्या पुरुष -महिलांपासून ते बारा वर्षाच्या लहान मुला- मुलींचा समावेश होता .१६ महिला ५८ पुरुष यात सहभागी झाले होते.
माऊंट लिटेरा झी स्कूल येथून या सायकल प्रवासाला सुरुवात झाली .वाडा चौक, गांधी चौक ,शिवाजी चौक ,रेणापपूर नाका , पिंपळ फाटा , बर्दापूर, बीड-लातूर सीमा या मार्गावर सायकल चालवून परत जी स्कूल येथे ७४ किलोमीटरचे अंतर पार करून हे ७४ सायकलस्वार परतले . याला जवळपास चार तास लागली .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रशस्तीपत्र देऊन सगळ्यांना सन्मानित करण्यात आले .यावेळी तहसीलदार स्वप्निल पवार , दयानन्द आर्य , हेमा कर्वा, नीलेश अग्रवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती. या सायकलिंमध्ये सतीश खोबरे, गंगाधर बिरादार , श्रावण उगले , रवींद्र भूमकर, श्रीरंग मद्रेवार , अभिजीत देशपांडे, अमृत मेलकुंदे, संदीप महिंद्रकर , प्रशांत पेंडेकर , प्रफुल्ल कुलकर्णी , योगेश कर्वा, ज्योति राजे, स्मिता देशपांडे आदींनी सहभाग नोंदवला रेणापूर फाटा येथे रेणापूर मॉर्निंग ग्रुपच्या वतीने या सायकलस्वारांसाठी हायड्रेशन पॉईंटची व्यवस्था करण्यात आली होती.