मुंबई ; दि.२ ( विशेष प्रतिनिधी )
निवृत्तीनंतर बहुतेक महिला आपलं घर, संसार यातच व्यस्त होतात. वयाच्या साठी नंतरची दुखणी सुद्धा डोकं वर काढायला लागतात. त्यामुळे महिला निवृत्ती नंतर क्वचितच एकमेकांच्या सम्पर्कात रहातात. त्यात पुन्हा कोरोनाची भर पडली.
या सर्व पार्श्वभूमीवर एम टी एन एल च्या दोन वर्षांपूर्वी स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या नवी मुंबईतील 130 महिलांचे अनोखं स्नेहमिलन सानपाडा येथील मिलेनियम टॉवर्सच्या शॉपिंग कॉम्लेक्स च्या हॉल मध्ये नुकतंच आनंदात पार पडलं.
गणेशवंदना आणि स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली. तत्पूर्वी संयोजक अलका भुजबळ यांनी, हा कार्यक्रम न्यूज स्टोरी टुडे च्या वतीने दरमहा घेण्यात येत असलेल्या स्नेह मिलन कार्यक्रमातून आजचा कार्यक्रम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यावेळी कोरोना काळात दगावलेल्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमात “सीजीएचएस चे फायदे” या विषयावर डॉ एस सुधाकर यांनी उपस्थित महिलांना उपयुक्त माहिती दिली आणि त्यांच्या शंकाचे निरसन केले. केंद्रीय आरोग्य सेवेचे आपल्याकडे कार्ड आहे म्हणून बिनधास्त राहणे हे चुकीचे असून उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी नियमित योगा, ध्यान धारणा, सकस आहार आणि व्यायाम केला पाहिजे, हिच आरोग्याची गुरुकिल्ली असून सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहिले पाहिजे, असा मोलाचा सल्ला डॉ. एस. सुधाकर यांनी दिला.
डॉ. सुधाकर यांच्या मार्गदर्शनानंतर अनेक निवृत्त महिला कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करुन घेतले.
यावेळी कार्यक्रमाच्या संयोजक अलका भुजबळ यांच्यासह संयोजन समितीतील महिलांनी डॉ. एस. सुधाकर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला.
या नंतर निवृत्ती नंतर स्वस्थ न बसता, सामाजिक कामामध्ये स्वतःला झोकून देणाऱ्या
पुढील महिलांचा सत्कार करण्यात आला.
1) दमयंती शर्मा – रॉबिन हूड आर्मी या NGO तर्फे कॅन्सर ग्रस्त मुलांसाठी, गरीब मुलांना जेवणाचे वाटप, वृद्धाश्रमात जाऊन मदत करणे.
2) विजयलक्ष्मी बंडा – लॉयन्स क्लब तर्फे सोशल कामं, तसेच स्वतः यु ट्यूब चॅनल वर भक्तीगीत आणि रामायण, महाभारतचे सार सांगणे.
3) मानसी लाड – दररोज फेसबुक च्या माध्यमातून उदबोधक लेख लिहून विचाराला चालना देतात.
4) वर्षा भाबल – कविता करणे, लेख लिहिणे. रिटायरमेंट नंतर “जीवनप्रवास” हे आत्म चरित्रपर 27 लेख न्यूजस्टोरीटुडे वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेत
5) विलासिनी बडे – ऑनलाईन, ऑफलाईन योगा शिकवतात.
6) अलका भुजबळ- न्यूजस्टोरीटुडे या वेबपोर्टल च्या सहसंपादक आहेत, तसेच लेखन, निवेदन, अभिनय, महिलांचे आरोग्य या विषयी जनजागृती कार्यक्रम. या विविध क्षेत्रात सुध्दा त्या कार्यरत आहेत.
अशा 6 महिलांचा सत्कार करण्यात आला.
समाजासाठी कामं करताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, ह्याने मनाला समाधान आणि ऊर्जा मिळते असा संदेश यावेळी दिला गेला.
यावेळी वेगवेगळे खेळ, प्रश्न मंजुषा, बक्षीस, सेल्फीपॉईंट असे मनोरंजक कार्यक्रम करण्यात आले.
काही महिलांनी उस्फुर्तपणे गाणी गायली. कविता, भारुड, अनुभव कथन केले. तसेच स्नेहमिलनाची गरज याविषयावर संवाद साधून कार्यक्रमाचा भरभरून आनंद घेतला.
असं स्नेहमिलन दरवर्षी घ्यावं, ही काळाची गरज आहे असें ठरवून प्रत्येकीला भेटावस्तू देऊन कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.