विशेष लेख
आज शाळेत येताच मला मुलांनी अनेक प्रश्न विचारले, मॅडम आजपासून धोंडा सुरू झाला का? धोंड्याचा महिना का येतो? या महिन्यात काय करावे लागते? यावर्षी वर्षाचे महिने 13 सांगायचे का?
मुलांची उत्सुकता पाहून मला त्याबद्दल लेख लिहावा असे वाटले या लेखातून माझ्या शाळेतल्या मुलाप्रमाणे अनेक मुलांची उत्सुकता असेल म्हणून लिहिले.
मुलांनो आपण शाळेत भूगोल, विज्ञान शिकतो.पृथ्वीच्या सूर्याभोवती व स्वतःभोवती फिरण्यामुळे ऋतू निर्मिती होते. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो.आमावास्येपासुन प्रतीपदा ते पोर्णीमा शुक्लपक्ष व पोर्णिमेनंतर प्रतीपदेपासुन ते अमावास्येपर्यंत कृष्णपक्ष असे दोन पंधरवाडे मिळून एक महिना होतो.हे आपणास माहित आहे.
सौर वर्ष व चांद्र वर्ष यांचा फरक अकरा दिवसाचा असतो. हा फरक भरून काढण्यासाठी एक महिना अधिक धरला जातो. दर तिसऱ्या वर्षी हा अधिक महिना येतो दर दोन अधिक मासात जास्तीत जास्त 35 व कमीत कमी 27 महिन्याचा कालावधी असतो आपले सण व्रतवैकल्ये चंद्रावर अवलंबून असतात . मार्गशीर्ष व माघ हे महिने कधीही अधिक येत नाहीत.बाकी महिन्यात आलेल्या तेराव्या महिन्यास अधिक महिना असे म्हणतात. यावर्षी आलेला अधिक महिना म्हणजे अधिक श्रावण महिना होय. श्रावण मास म्हणजे नेहमीचा महिना त्याला नीज श्रावण म्हणतात.मराठी नववर्ष हे चंद्र वर्ष आहे ते गुढीपाडव्यापासून सुरू होते.

मराठी कालगणनेनुसार या वर्षी 13 महिने असले तरी इंग्रजी मात्र बारा महिने येतात. आपले ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात पृथ्वीचा सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस 5 तास 48 मिनिटे व 46 सेकंद लागतात याला सौर वर्ष म्हणतात. चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 354 दिवस 8 तास 48 मिनिटे 24 सेकंद लागतात त्याला चांद्रवर्ष असे म्हणतात. सौर वर्षाच्या काळात अकरा दिवसाचा फरक पडतो हे दर वर्षाचे अकरा अकरा दिवस तीन वर्षांनी ते 33 दिवस होतात व अधिक महिना येत असतो .अधिक महिन्यात 33 दिवस असतात त्यालाच आपण धोंड्याचा महिना असेही म्हणतो. या महिन्याची अनेक नावे आहेत पुरुषोत्तम मास, मलमास ,अधिक मास धोंड्याचा महिना.
आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाचे महत्त्व वेगवेगळ्या पध्दतीने सांगितले आहे.धोंडे महात्म या ग्रंथात धोंड्याच्या महिन्याचे महत्त्व विशद केले आहे. पुरूषोत्तम महात्म्य पूर्वी विष्णूनी नारदास, श्रीकृष्णाने पांडवास सांगितले होते. विविध कथेतून पुरूषोत्तम म्हणजे विष्णू , नारायण यांच्या पुजनाचे महत्त्व सांगितले आहे.तेहतीस पदराच्या तेहतीस वाती तेहतीस दिवस धोंडेवात म्हणून लावतात.सर्व पाहुण्यांना पुरणाचे धोंडे करुन जेवायला बोलावतो. तेहतीस कोटी देव जिच्या अंगी असतात त्या गोमातेलाही दररोज 33 धोंडे खायला दिले जातात.या महिन्यात सुवासिनींनी वेगवेगळ्या प्रकारची दान, धर्म ,पूजा करावी.प्रत्येक दान करावयाच्या वस्तू तेहतीस असाव्यात.धोंडे दानात सोने,चांदी,तांबे,पितळ,अनारसे
,लाडू,खारका,बत्ताशे, बदाम,काजू,मणूका,
अंजीर,किसमीस,करंजी ई.प्रकार दिले जातात.आपल्याकडे जावयाला धोंडे दान देण्याची पद्धत आहे. दीपदान ,विडादान ,अपूपदान,भांड्यामध्ये घालून केले असता सर्व पापांचा नाश होतो म्हणून अधिक मासात ब्राह्मणाला ही सर्व दान केल्यास मोक्षप्राप्ती होते असे अधिक महात्म्यात सांगितले आहे.
अधिक महिन्यात चांगले संकल्प करून ते पूर्णत्वास न्यावेत.वैज्ञानिक स्पष्टिकरणासह प्राचिन संस्कृतीची माहिती यातून नक्कीच मिळेल. शिक्षणात आवश्यक भारतीय संस्कृतीचा वारसा जपत वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी हे आवश्यक वाटते.

सौ.सविता जयंतराव धर्माधिकारी.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कासारखेडा.ता.जि.लातूर
मो.न.9421369737.
dharmadhikari.savitaj@gmail.com