बीडमधील शेतकऱ्याची आत्महत्या नव्हे, हा तर ठाकरे सरकारच्या बेपर्वाईचा बळी !
लातूर दि. १२– ग्रामीण महाराष्ट्राच्या समस्यांविषयी पूर्णपणे अज्ञानी असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बेपर्वाईमुळेच राज्यातील अतिरिक्त ऊसाच्या गाळपाची समस्या गंभीर बनली असून बीडमधील शेतकऱ्याने ऐन उमेदीत गळफास घेऊन केलेली आत्महत्या हे ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेचे पाप आहे असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.
ऊस उत्पादन वाढत राहिले तर शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येईल असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच दिला होता. गडकरी यांच्या इशाऱ्याकडे राज्य सरकारने गंभीरपणे लक्ष देवून ऊस गाळपाचे काटेकोर नियोजन करायला हवे होते असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, क्षुल्लक कारणावरून काही नेत्यांना छळण्यासाठी सूडबुद्धीचे राजकारण करण्यात रमलेल्या राज्यातील ठाकरे सरकारने अतिरीक्त ऊसाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. या बेपर्वाईमुळेच अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असून राज्यातील सुमारे ७० लाख टन ऊस गाळपाविना उभ्या शेतात करपून जात आहे.
गाळप न झालेल्या ऊसाची नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ७५ हजार रुपये देण्याच्या भाजपच्या मागणीकडे दुर्लक्ष करून ठाकरे सरकार शेतकऱ्याच्या अडचणीत भर घालत आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पुण्यात साखर आयुक्तालयासमोर आंदोलन करून राज्य सरकारचे या समस्येकडे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला. पण द्वेषाच्या राजकारणात बुडालेल्या ठाकरे सरकारपर्यंत शेतकऱ्याचा आक्रोश पोहोचलाच नाही. गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात सुमारे ५०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही महाविकास आघाडी सरकारचे डोळे उघडलेले नाहीत. शेतकऱ्याचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नसेल तर ग्रामीण भागातील शेतकरी मुंबईवर चाल करून आपल्या समस्या मंत्रालयासमोर मांडतील असा इशारा आ. कराड यांनी दिला.
बीड मधील नामदेव जाधव नावाच्या ३२ वर्षांच्या एका शेतकऱ्याने ऊसाचा कालावधी होऊन कारखान्याने ऊस उचलला नाही म्हणून शेतात करपणाऱ्या उसाला आग लावून शेतातच गळफास घेऊन सदरील शेतकऱ्याने आत्महत्या केली. ठाकरे सरकारच्या निष्क्रीय कारकिर्दीचा हा थेट बळी असून शेतकऱ्यावरील अन्यायाचा विक्रम नोंदवून ठाकरे सरकारने आपल्या असंवेदनशील कारभाराचे दर्शन घडविले आहे. ऐन उमेदीत आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्या ठाकरे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी गृह खात्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे स्वयंघोषित तारणहार आणि स्वतःस देवाचा बाप म्हणविणारे नेते आता तोंड मिटून गप्प का, असा सवालही त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला.