कचर्याने माखलेल्या शहरात गणरायाची स्थापना
अजित पाटील कव्हेकरांनी हातात घेतला झाडू
शहर स्वच्छतेसाठी घेतला पुढाकार
मनपा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी अकार्यक्षम असल्याची टीका
लातूर;(माध्यम वृत्तसेवा):- गणेशोत्सव काळामध्ये जनजागृती केली जाते .लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा चालू केली . गणेशोत्सव काळामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते अजित पाटील कव्हेकर यांनी गणेशोत्सव काळामध्ये जनजागृती करण्यासाठी हाती झाडू घेत स्वच्छता मोहीम करीत असेही श्रमदान केले. त्यांच्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लाडक्या गणरायाचं आगमन सर्वत्र झालं.आकर्षक सजावट करत भक्तांनी त्याची स्थापना केली.लातूरात मात्र सर्वत्र पसरलेल्या कचर्याच्या सानिध्यातच भक्तांना श्री गणेशाची स्थापना करावी लागली. नाईलाजाने गणपतीलाही लातुरकरांची दुर्गंधी सहन करावी लागत आहे.अशा स्थितीत प्रशासन कसलीही हालचाल करत नसल्याने भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी माझं लातूर, माझी जबाबदारी असे म्हणत शहर स्वच्छतेसाठी झाडू हाती घेतला आहे.

गणेशोत्सवाच्या काळातही शहर कचर्याने व्यापलेले असून लातूरकरांचा जीव संकटात सापडला आहे.या स्थितीत प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे स्वतः झाडू हातात घेत शहराची स्वच्छता करण्याचा उपक्रम त्यांनी सोमवारी राबवला.
शहरातील कचर्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून आ वासून उभा आहे.या ज्वलंत प्रश्नामुळे लातूरकर पुरते हैराण झाले आहेत. दोन वर्षापासून आपण या प्रश्नासंदर्भात प्रशासनाशी भांडतोय.दोन दिवसाचे अन्नत्याग उपोषणही केले. या अगोदर स्वतः गटारी साफ केल्या.अनेकवेळा मनपाला निवेदने दिली. परंतु या निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही.म्हणून आता त्यांच्यावर अवलंबून न राहता आपणच हातात झाडू घेतला पाहिजे आणि शहर स्वच्छ केले पाहिजे अशी भूमिका मी घेतली, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सोमवारी (दि.9) भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी लातूर शहराची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे.पहिल्याच दिवशी त्यांनी 10 ट्रॅक्टरच्या माध्यमातून शहरातील विविध भागात जाऊन माझं लातूर माझी जबाबदारी म्हणत शहर स्वच्छ करण्याचे काम केले. शनिवारी गणरायाचे आगमन झाले असून दुर्गंधीयुक्त वातावरणात गणेशोत्सव कसा साजरा करायचा ? असा यक्ष प्रश्न लातूरकरांना पडला आहे. आपण वेळोवेळी कचर्यासंबंधी आवाज उठवला असून मनपा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून शहराची ही दूरावस्था झाल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक लोकप्रतिनिधी विधिमंडळात शहराच्या कचर्या संबंधी प्रश्न विचारत असले तरी ही पूर्ण नौटंकी आहे.त्यांनी स्थानिक पातळीवर काम करण्याची गरज असल्याचे मत अजित पाटील यांनी व्यक्त केले.

मुंबईमध्ये बसून लातूरचे प्रश्न सुटू शकत नाहीत.त्यासाठी स्थानिक पातळीवर काम करावे लागते असे सांगत लातूरच्या लोकप्रतिनिधीवर त्यांनी निशाणा साधला.शहरात ठिकठिकाणी कचर्याचे ढीग साचले आहेत, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कचर्यामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.लातूरकरांचे आरोग्य लक्षात घेता आपणच यासंबंधी पुढाकार घेतला पाहिजे असे मला वाटले. म्हणूनच ही मोहीम मी हाती घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गंजगोलाईतून शहराच्या साफसफाईला त्यांनी सुरुवात केली.आम्हाला आमच्या क्षमतेप्रमाणे जिथपर्यंत पोहोचता येईल तिथपर्यंत पोहोचून शहरातील घाण साफ करायची आहे. प्रशासनाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी शहराच्या साफसफाईकडे दुर्लक्ष केले असले तरी आपली नैतिक जबाबदारी म्हणून शहर साफ करावे लागणार आहे.माझं लातूर, संवाद लातूरकरांशी या उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागातील लोकांच्या समस्या जाणून घेत फिरत असताना नागरिकांकडून कचर्याच्या प्रश्नासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी माझ्या क्षमतेप्रमाणे मी पार पाडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या स्वच्छता श्रमदान अभियानात मंडळाध्यक्ष संजय गिर, अॅड.गणेश गोजमगुंडे, काकासाहेब चौगुले, रवी लवटे, मुन्ना हाश्मि, अमोल गित्ते, गजेंद्र बोकन, आकाश बजाज, आदित्य फफागिरे, योगेश गंगणे, लता घायाळ, अमित शिंदे, शिवाजी कामले, सिध्दार्थ कसबे, चैतन्य फिस्के, ऋषिकेश क्षिरसागर, मंदार कुलकर्णी, सागर घोडके, गणेश खाडप, राजेश पवार, सचिन जाधव, बाळू शिंदे, संतोष ठाकूर, शशिकांत हांडे, हणमंत काळे, अजय रेड्डी, विकास डुरे, विश्वजीत पाटील, बालाजी खमामे, खंडू लोंढे, वैभव वनारसे, आकाश जाधव आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व लातूरकरांनी सहभाग नोंदविला.
—————————————————————————–