ज्ञान हाच भारतीय जीवनाचा मुलाधार
– श्रीमती इंदुताई काटदरे
लातूर/प्रतिनिधी:अगदी पूर्वीपासून ज्ञान हाच भारतीय जीवनाचा मूळ आधार राहिलेला आहे.पाश्चात्यांच्या अनुकरणामुळे हे ज्ञान आज अव्यवस्थित झाले आहे.जागतिक वर्तमान परिस्थितीत भारताला ज्ञाननिष्ठ देश बनविण्यासाठी शास्त्रांचे मूळ सिद्धांत सर्वांसमोर आणले पाहिजेत,असे प्रतिपादन पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलपती श्रीमती इंदुताई काटदरे यांनी केले.
कर्णावती येथील पुनरुत्थान विद्यापीठाच्या वतीने हरंगुळ येथील जनकल्याण विद्यालयात अखिल भारतीय विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेचे उद्घाटन करताना श्रीमती इंदुताई काटदरे बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुलबर्गा येथील बसवराज पाटील तर व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी,देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक अनिल भालेराव,परिषदेचे संयोजक संदीप रांकावत यांची उपस्थिती होती.
उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना श्रीमती काटदरे म्हणाल्या की,पूर्वी भारतीय ज्ञान व्यवस्थित होते परंतु आज ते अव्यवस्थित झालेले आहे. ही परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी तीन टप्प्यात काम करावे लागणार आहे.अवस्थिति पासून व्यवस्थिती,अनुवस्थिती ते व्यवस्थिती व अव्यवस्थिती पासून व्यवस्थिती पर्यंत आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. भारतीयांनी आपले जीवन ज्ञाननिष्ठ बनवलेले आहे. इतर देशांच्या दृष्टीने भारतीय निरक्षर असतील परंतु ते अज्ञानी नाहीत. ज्ञानाचे प्रथम प्रकटीकरण अनुभूतीजन्य असते.चार वेद हेच मूळ ज्ञान आहे. ऋषीमुनींनी ते आपल्या वाणीतून प्रकट केले.महर्षी व्यासांनी त्याचे संपादन केले.श्री गणेशाने दिलेल्या लिपीमुळे ते ग्रंथरूपात उपलब्ध झाले.४ वेद,६ वेदांग व ४ उपवेद अशा एकूण १४ विद्या आहेत.
वेद हा पाठांतर करण्याचा विषय नाही तर त्यातील तत्वज्ञान जीवनात लागू झाले पाहिजे,असे त्या म्हणाल्या.
इंदुताईंनी सांगितले की, ज्ञान हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. हे ज्ञान सर्वांसाठी सुलभ होणे गरजेचे आहे. आपल्या मूळ ज्ञानाला बाजूला सारून पाश्चात्त्यांनी त्यावर आक्रमण केले. मंदिरांसोबतच ग्रंथही नष्ट करण्यात आले.त्यामुळे आपण क्षीणप्राण झालो. ज्ञान क्षेत्रावर आक्रमण झाल्याने आज आपण सर्वच क्षेत्रात त्यांचे अनुकरण करत आहोत. देशातील विद्यापीठात आज जे शिक्षण दिले जाते ते अभारतीय आहे.आजची दृष्टी अर्थकेंद्री व कामकेंद्री झाली आहे.पाश्चात्य आक्रमणानंतर भारतीय ज्ञान प्रदूषित झाले असल्याचेही श्रीमती काटदरे म्हणाल्या.
अध्यक्षीय समारोपात बसवराज पाटील यांनी ज्ञान या शब्दाचीच हत्या झाली असल्याचे मत व्यक्त केले.आज ज्ञानासाठी शिक्षण दिले जात नाही.भारतात ८०० शास्त्र असून ते एकमेकांसाठी पूरक आहेत,असेही ते म्हणाले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. संयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
उद्घाटन सत्रानंतर झालेल्या दुसऱ्या सत्रात ‘राष्ट्रीय शिक्षा हेतू किये गये प्रयास और उनके परिणाम’ यावर राकेश मिश्रा यांनी विचार मांडले. आज दिल्या जाणाऱ्या शिक्षणात मूळ भारतीय ज्ञान दिले जात नाही. शैक्षणिक धोरण याला कारणीभूत आहे.या धोरणाचा भारतीय संस्कृतीशी संबंध नाही. शिक्षण प्रणाली मूळ उद्देशापासून दूर असल्याने ज्ञान एकमेकांना पूरक ठरत नाही,असे मत त्यांनी व्यक्त केले.
चर्चासत्रात सहभागी झालेले अंकित शहा यांनी ‘ब्रिटिश क्लासरूम मॉडेल’ या विषयावर विचार मांडताना भारत व पाश्चात्य देशांच्या अर्थ मॉडेलमध्ये फरक असल्याचे आधारेखित केले.आपण पुनर्जन्म मानतो पण पाश्चात्य संस्कृतीत एकच जन्म असल्याचे मानले जाते.
पाश्चात्य जगतात अति स्वातंत्र्यामुळे एकटेपणा आला आहे.सनातन इकॉनॉमिक मॉडेलसाठी मंदिर इकोसिस्टीम गरजेची आहे.ब्रिटिश मॉडेल मधून बाहेर पडण्यासाठी ती उपयोगी ठरेल.ब्रिटिश मॉडेलमुळे आजची विवाह संस्था देखील बिघडली असल्याचे ते म्हणाले.
चर्चासत्राचे अध्यक्ष स्थान भूषवताना अरुण कुमार उपाध्याय यांनी भारतीय शास्त्र एका जन्मात समजणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले. आक्रमणानंतर मंदिरे पाडून ग्रंथही नष्ट केले गेले. त्यातील जे काही आज शिल्लक आहेत त्यावरून संशोधन सुरू आहे.त्यात समन्वय साधला तर ज्ञान मिळू शकते.आज विविध क्षेत्रात होणाऱ्या संशोधनांना कसलाही अर्थ उरला नसल्याचे ते म्हणाले.
या सत्राचे संचलन नियती सप्रे यांनी केले. श्रीराम देशपांडे यांनी उपस्थित मान्यवरांचा ग्रंथ भेट देऊन सन्मान केला.स्व.बाळासाहेब देवरस सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास देशभरातून आलेल्या मान्यवरांसह संयोजन समितीतील पदाधिकारी व निमंत्रितांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.