एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे ‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत’चे उद्घाटन
(NATIONAL LEGISLATORS’ CONFERENCE, BHARAT)
मुंबई, दिः १६ जूनः ‘( विशेष प्रतिनिधी) –‘विकसित आणि समृध्द भारत बनविण्यासाठी सर्व आमदारांनी समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या अंतोदयाच्या जीवनात परिवर्तन आणून त्यांचे जीवन बदलावे. अमृत महोत्सवाच्या काळात परिवर्तनीय भारतासाठी आमदारांच्या योगदानातून समर्पण भाव अत्यंत महत्वाचा आहे.’’ असे आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पहिल्या राष्ट्रीय विधायक संमेेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटतर्फे आयोजित पहिल्या ‘राष्ट्रीय विधायक संमेेलन, भारत’ चे मुंबई येथील बीकेसी जीओ सेंटर मध्ये उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. निलम गोर्हे, लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, श्री.शिवराज पाटील चाकुरकर विशेष अतिथ म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय विधायक संमेलनाचे प्रमुख संयोजक समन्वयक राहुल विश्वनाथ कराड उपस्थित होते.या संमेलनात देशातील विधानसभा आणि विधान परिषदेचे अध्यक्ष, दोन हजाराहून अधिक आमदार व ऐंशी मंत्री उपस्थित होते.

ओम बिर्ला म्हणाले,‘‘ लोकशाहीच्या मंदिरातून जनतेचे कल्याण व परिवर्तन होत आहे. यामुळे आम्हाला सत्याची प्रेरणा मिळते तसेच प्रामाणिकता येते. या मंदिराला आणखी मजबूत करण्यासाठी सर्वांनी मिळून कार्य करावे. भारतीय संविधान मार्गदर्शक व दिशा दर्शक आहे. अशावेळस त्याची रक्षा करणे आमची जबाबदारी आहे.
संसद रोज स्थगित करणे, घोषणाबाजी करणे हे अशोभनीय व्यवहार असून चिंताजनक विषय आहेत. संविधान किती ही चांगले असले तरी त्याचे पालन करून आचरणात आणावे. जनता तुमच्या कार्यावर बारीक लक्ष ठेवते. त्यासाठी पारदर्शकता, समर्पण भावना दाखवावी, असे ही त्यांनी सांगितले.’’

देवेंद्र फडणवीस म्हणाले,‘‘ लोकशाही व देशाला सर्वेच्च स्थानावर घेऊन जाण्यासाठी आमदारांचे योगदान महत्वाचे असून येथे विचार विमर्श होत आहे. वर्तमान काळात आमचा अजेंडा मिडिया ठरवितो अशावेळेस प्रत्येक आमदारांनी लक्षात ठेवावे, की देशाच्या विकासासाठी जनतेने आम्हाला निवडले आहे. त्यामुळे अजेंडा विसरून चालणार नाही. लोकशाही मुळे देशातील शेवटचा व्यक्ती सरकारपर्यंत पोहचले आहे. सर्व विधानसभेत जास्तीत जास्त काम होणे गरजेचे असून महत्वाच्या मुद्यांवर चर्चा व्हावी.’’

सुमित्रा महाजन म्हणाल्या, ‘‘आजच्या काळात नेता शब्द खराब झाल्याने आमदारांनी आपल्या कामाच्या माध्यमातून या शब्दाला महत्व आणावे. प्रत्येक आमदारांनी आपल्या क्षेत्रातील दोन महत्वपूर्ण विषय निवडून त्यावर कार्य करावे. सासर आणि माहेर उत्तमप्रकारे सांभाळणार्या महिला या उत्कृष्ठ राजकारणी आहेत. आता सर्वांनी मिळून चांगले सरकार व सशक्त लोकशाहीसाठी कार्य करावे.’’
मीरा कुमार म्हणाल्या, ‘‘सामाजिक परिवर्तनासाठी आमदारांनी जीवन समर्पित करावे. समाजातील शेवटच्या व्यक्तीची प्रगती हे लक्ष त्यांनी ठेवावे. या परिषदेसाठी प्रत्येक राज्यातील विधानसभा, विधान परिषदेचे अध्यक्ष व लोकसभा अध्यक्ष यांनी जबाबदारी घ्यावी, की संमेलनाचे आयोजन प्रत्येक १८ महिन्यांनी करावे.

शिवराज पाटील चाकुरकर म्हणाले, ‘‘येणार्या काळात जगात मोठे परिवर्तन होईल. अशावेळेस जुन्या काळातील विचारांचा ठेवा जतन करावा. आजच्या काळात मतासाठी पैशांचे वाटप केले जाते ते वाईट असून त्याला थांबविणे गरजेचे आहे. अशावेळेस पार्लमेंटमध्ये बसून काही गोष्टी बदलाव्या लागतील.’’
राहुल कराड म्हणाले, ‘‘लोकशाही व कार्यक्षम प्रशासनाला सशक्त बनविण्यासाठी ही परिषद अत्यंत महत्वाची आहे. येथे देशातील ५० कोटी जनतेचे नेतृत्व करणारे प्रतिनिधी एकत्रित आले आहेत. वेगवेगळ्या पार्टीतील आमदार एमओयूच्या माध्यमातून विकासात्मक कार्य करतील अशी आशा आहे. ही यात्रा वाईटापासून चांगल्याकडे जाणारी आहे. त्यामुळे ही परिषद प्रत्येक वर्षी घेण्याचा मानस आहे.’’

डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,‘‘२१व्या शतकात भारत विश्वगुरू बनेल. संपूर्ण जगाला सुख, शांतीचा मार्ग दाखविण्याचे दायित्व भारताकडे असेल. देशाप्रति, कुटुंबाप्रति प्रथम कर्तव्य असावे. ७५ वर्षाच्या काळात देशात अशी परिषद होणे अद्वितीय आहे.’’
राहुल नार्वेकर यांनीही आपले विचार मांडले.
प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.