३०० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांनी सादर केले शोधनिबंध – अनेक ज्येष्ठ शल्य चिकित्सक डॉक्टर्स जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
लातूर 🙁 प्रतिनिधी)– लातूर सर्जिकल असोसिएशनच्या वतीने लातूर शहरातील हॉटेल ग्रँड इंटरनॅशनलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ४५ व्या राज्यस्तरीय शल्य चिकित्सक परिषदेची ( मॅसिकॉन ) उत्साहात सांगता झाली. या परिषदेत सहभागी झालेल्या एकूण ११०० पैकी ३०० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांनी आपले शोधनिबंध सादर केले. तर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक ज्येष्ठ शल्य चिकित्सकांना यावेळी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तीन दिवस पार पडलेल्या या शल्य चिकित्सक परिषदेचे उद्घाटन माजी पालकमंत्री आ. अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्याप्रसंगी ऑल इंडिया सर्जिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जैन, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंदे, सचिव डॉ.समीर रेगे यासह मान्यवरांची उपस्थिती होती. परिषदेच्या पहिल्या दिवशी एकूण ३० शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक परिषदेत सहभागी झालेल्या तज्ज्ञ तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून दाखवण्यात आले. लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहा अद्यावत ऑपरेशन्स थिएटरमध्ये या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यापैकी १५ शस्त्रक्रिया या लॅप्रोस्कोपीच्या सहाय्याने करण्यात आल्या. त्याकरिता जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या वतीने अत्याधुनिक मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली होती. हॉटेल ग्रँड इंटरनॅशनलच्या एकूण सात हॉल मध्ये ही राज्यस्तरीय शल्यचिकित्सक परिषद पार पडली.
परिषदेच्या सांगता समारोहास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड उपस्थित राहणार होते. मात्र संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे ते प्रत्यक्ष या परिषदेस उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांचा व्हिडीओ संदेश यावेळी प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये त्यांनी लातुरात पार पडत असलेल्या या परिषदेस आपल्या शुभेच्छा असल्याचे सांगून तज्ज्ञ डॉक्टरांच्या शोधनिबंधांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी लातूर सर्जिकल असोसिएशन व ( मॅसिकॉन ) च्या वतीने पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे, डॉ.डी. व्ही. पतंगे, डॉ.व्ही. एच. मैंदरकर, डॉ. व्ही. व्ही. घवले, डॉ. जी.बी. पल्लोड, डॉ. हंसराज बाहेती, डॉ. ए. व्ही. डावळे, डॉ.एस. एन. जटाळ, डॉ. एस. एस. पाटील, डॉ.व्ही. पी. कुलकर्णी, डॉ. साकोळकर, डॉ. डी.एन. चिंते, डॉ. आर. सी. गांधी, डॉ.दिनकर काळे, डॉ. अजित जगताप, डॉ.जी.व्ही. पोलावार या ज्येष्ठ शल्य चिकित्सकांना सपत्नीक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या शल्य चिकित्सक परिषदेच्या संयोजन समितीत ( मॅसिकॉन ) चे अध्यक्ष डॉ. दिनकर काळे, सचिव डॉ. अजय पुनपाळे , कोषाध्यक्ष डॉ. दीपक गुगळे, लातूर सर्जिकल असो.चे अध्यक्ष डॉ. संजय वारद , सचिव डॉ. रवींद्र ईरपतगिरे, डॉ. योगानंद दडगे , कोषाध्यक्ष डॉ. अविनाश बदने, शासकीय वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, कार्यकारी अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते पाटील यांचाही समावेश होता. परिषदे दरम्यान करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेत सर्जरी विभागाचे डॉ. अनमोड , डॉ. मेघराज चव्हाण, डॉ. गणेश स्वामी व त्यांच्या सहकार्यांचे योगदान लाभले.
याकामी भूलतज्ज्ञ विभागाचे डॉ. शैलेंद्र चव्हाण, डॉ. सिरसाठ, डॉ. जोशी, डॉ. किरण तोडकरी , डॉ. सौ. मोरे व त्यांच्या सहकार्यांचे योगदान लाभले. तसेच लातूर सर्जिकल असो.चे ज्येष्ठ डॉ. एस.एन. जटाळ , डॉ. हंसराज बाहेती, डॉ. डी.एन. चिंते, डॉ. पल्लोड यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. या परिषदेसाठी राज्यभरातून आलेल्या डॉक्टर्सच्या निवासाची व्यवस्था डॉ.शिरीष मस्के पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. निखिल काळे, डॉ.अमोल लोंढे, डॉ. अविनाश बदने पाडली . तर परिषदेस उपस्थित डॉक्टरांच्या रजिष्ट्रेशनची जबाबदारी डॉ.अजित जगताप यांनी पार पाडली .
या परिषदेचा सायंटिफिक कार्यक्रम आखणे व प्रत्यक्षात अंमलात आणण्याची जबाबदारी डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. रवींद्र ईरपतगिरे, डॉ. अभिजित रायते, डॉ. प्रियंका राठोड, डॉ. योगानंद दडगे व त्यांच्या सहकार्यांनी पार पाडली . परिषदेच्या समारोप सत्राचे सूत्रसंचालन डॉ. ऋजुता अयाचित यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. दीपक गुगळे यांनी केले.
( छाया : शिरीष कुलकर्णी, लातूर )