*१लाख बांबू लागवडीचा शुभारंभ*

0
252

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण करुन

मुंडे व शरद जोशी यांचा आदरभाव व्यक्त करावा

१ लाख बांबू वृक्ष लागवड शुभारंभ प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड

लातूर दि. १२ – निसर्गाचा समतोल बिघडला असून येणारा काळ हा सर्वांसाठी धोक्याची घंटा ठरु शकतो, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून आणि पुढच्या पिढीच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि शेतकरी संघटनेचे नेते स्व. शरद जोशी यांचा आदरभाव व्यक्त करावा असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी केले.

        लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी १ लाख बांबू वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला. त्यानूसार लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमीत्त  आणि शेतकरी संघटनेचे नेते स्व. शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त वृक्ष लागवड मोहीमेचा रेणापूर तालुक्यातील मौजे रामवाडी ख. येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड आणि बांबू लागवड सल्लागार समितीचे राष्ट्रीय सदस्य पाशाभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बांबू वृक्ष लागवड राष्ट्रीय तज्ञ संजय करपे, भाजपाचे नेते राजेश कराड, जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट, विजय काळे, वसंत करमुडे, रेणापूरचे माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे,  लातूर तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, रेणापूर पसच्या माजी सभापती बायनाबाई साळवे, माजी उपसभापती अनंत चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण जाधव, शीला आचार्य, महेंद्र गोडभरले यांच्यासह अनेक मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी स्व. मुंडे आणि स्व. शरद जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.  

          निसर्गाचा समतोल बिघडल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. अवेळी पडणार्‍या पावसामूळे शेतीचे होणारे नुकसान थांबवायचे असेल तर झाडाचे महत्व ओळखून वृक्षारोपण गरजेचे आहे. हे एकट्याने करुन चालणार नाही, झाडे वाढविणे ही सामुहिक जबाबदारी आहे. वृक्षारोपणात बहुउपयोगी बांबू लागवड शेतकर्‍यांनी करावी असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, बागायती पिकापेक्षा बांबू लागवडीतून निश्चितपणे अधिकचा फायदा होतो. बांबू लागवड ही खात्रीशीर उत्पन्नाची हमी आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील गावागावात १ लाख बांबू लागवडीचा संकल्प केला असून आज सुरु झालेली वृक्ष लागवड मोहीम येत्या २५ डिसेंबर २०२२ भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीपर्यंत सुरु राहील तेंव्हा शेतकर्‍यांनी अधिकाधिक प्रमाणात बांबू वृक्ष लागवड करुन वृक्षारोपणाची मोहीम यशस्वी करावी. या बांबू लागवड मोहीमेची देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब हे दखल घेतल्याशिवाय राहणार नाहीत असे आ. रमेशअप्पा कराड यांनी बोलून दाखविले.

         रामवाडी या गावातून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपाची आणि शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची चळवळ सुरु केली ती जिल्हाभर पसरली आज योगायोग मुंडे यांची जयंती आणि शरद जोशी यांची पुण्यतिथी या दिनी १ लाख बांबू वृक्ष लागवड मोहीमेचा शुभारंभ होतोय ही वृक्ष लागवडीची चळवळ जिल्हाभर झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून यावेळी बोलताना पाशाभाई पटेल यांनी आ. रमेशअप्पा कराड यांनी सुरु केलेल्या बांबू वृक्ष लागवड मोहीमेबद्दल अभिनंदन करुन पुढे बोलताना म्हणाले की, मानवाची गरज अन्न, वस्त्र व निवारा हे जरी असली तरी त्याआगोदर हवा, ऑक्सीजन गरजेचे आहे. ऑक्सीजन तयार करण्याचे कारखाने नाहीत ऑक्सीजन हे झाडातूनच मिळते. जगाच्या पाठीवर एकूण क्षेत्रापैकी 33 टक्के वृक्ष आवश्यक असताना आज घडीला मात्र अत्यंत अल्प प्रमाणात वृक्ष असल्याने निसर्गाचा समतोल बिघडल्याने वातावरणात मोठा बदल झाला.

दिवसेंदिवस पृथ्वीवरचे तापमान वाढत आहे. कार्बन झपाट्याने वाढत आहे. या तापमानामूळे हीमवृष्टी होवून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणार असल्याने जगातील अनेक देशांना याचा मोठा धोका होवू शकतो असे १९८ देशातील शास्त्रज्ञांनी भाकीत केले आहे. यावर मात करण्यासाठी वृक्षारोपणा शिवाय पर्याय नाही प्रत्येक व्यक्तिला २८० किलो ऑक्सिजन लागते आणि १ झाड ३२० किलो ऑक्सिजन देते. इतर झाडापेक्षा ३० टक्के अधिक ऑक्सिजन देणारे बांबू हे झाड आहे असे सांगून पाशाभाई पटेल म्हणाले की, सागवान, चंदन, आंबा आणि उस शेतीपेक्षा बांबू वृक्ष लागवड शेतकर्‍यांसाठी  अधिक फायद्याची आहे. बांबू बहुउद्देशीय आहे, बांबू पासून पेट्रोल, डिझेल, कपडे, घर, फर्निचर यासह अठराशे वस्तू तयार होतात. बांबू लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना शासनाच्या वतीने तीन वर्षात हेक्टरी ६ लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे. सोयाबीन, ऊसाऐवजी शेतकर्‍यांनी बांबू लागवड करावी असे आवाहन केले.

यावेळी बोलताना राष्ट्रीय बांबू तज्ञ संजय करपे म्हणाले की, कोकणातील अनेक शेतकर्‍यांनी हापूस आंबा ऐवजी बांबूची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. बांबू पुढे आंबा उत्पन्नात फिका पडला. बांबू पासून तयार झालेल्या वस्तु श्रीमंत लोकांचे साधन बनले आहे. त्यामूळे या वस्तु तयार करण्यासाठी बांबूची गरज असल्याने शेतकर्‍यांसाठी अधिकचे चार पैसे मिळवण्याची संधी चालून आली असल्याचे सांगून बांबू लागवडीची मोहीम हाती घेतल्याबद्दल आ. रमेशअप्पा कराड यांचे अभिनंदन करुन बांबूच्या इतिहासात आ. कराड यांचे नाव सुवर्ण अक्षरात लिहीले जाईल असे बोलून दाखविले.   

यावेळी कार्यक्रमाचे संयोजक महेंद्र गोडभरले यांनी आपले मनोगत व्यक्त करुन रामवाडी आणि परिसरातील बहुसंख्य शेतकर्‍यांनी बांबू लागवडीचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. प्रारंभी महावीर गोडभरले यांनी प्रास्तावीक केले तर शेवटी बालाजी तिरुके यांनी आभार मानले. 

यावेळी सरपंच पांडुरंग कलुरे, दिलीप बरुरे, राजु दाडगे, कल्याण पाटील, सिद्धेश्वर मामडगे, रमाकांत फुलारी, शालीक गोडभरले, शिवाजी जाधव, भागवत गित्ते, श्रीकृष्ण मोटेगांवकर, सुरेश बुड्डे, मुन्ना गुरले, श्रीकृष्ण पवार, नाथराव गित्ते, मंचक दाडगे, ग्यानदेव पुंडकरे, हणुमंत कुटवाड, चंद्रकांत गोडभरले, रमेश गोडभरले, विजय चव्हाण, आण्णाराव कलुरे, प्रेमानंद गोडभरले, प्रल्हाद कलुरे, पांडुरंग दिवटे, मनोहर गोडभरले, रमेश कोलपते, जलील शेख यांच्यासह रामवाडी खरोळा परिसरातील शेतकरी, भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here