भावपूर्ण श्रद्धांजली
मित्रवर्य गिरीश वैकर ने फोन करून विचारले ‘ दिलीप राव यांचे काही कळले का ? ‘ मनात शंकेची पाल चुकचूकली पण वेड्या आशावादी मनाने त्याची आणि माझी समजूत काढली . पण काही मिनिटातच बातमी नक्की झाली . दिलीप गेला ! पत्रकार जगतातील पत्रकार , संघ वर्तुळातील एक आदर्श स्वयंसेवक , सरकारी माहिती क्षेत्रातील धारूररकर साहेब आणि माझ्या सारख्यांचा अत्यंत जवळचा मित्र दिलीप आम्हाला सोडून गेला .
१९८७ ते २०२२ , असा आमचा ३५ वर्षाचा मैत्रीचा प्रवास ! सुरु झाला संघाच्या कामातून पण तो तेव्हढाच मर्यादित राहिला नाही . सुख दुःखाच्या गोष्टी , व्यक्तीगत जीवनातील व्यवहारिक निर्णय , नोकरी आणि व्यवसायातील उलथापालथी ते घरगुती नातेवाईक आशा सगळ्या विषयात आम्ही दोघे बरोबर होतो . मनातले बोलत होतो . चि ऋचाचे लग्न ठरल्यावर त्याचा फोन आला तेव्हा त्याच्यातला एक आंनदी समाधानी बाप बोलत असल्याचे जाणवत होते .
वैचारिक विमर्शाची लढाई आकार घेत असताना आणि दिलीप सारख्या अभ्यासू , ध्येयवादी शिलेदाराची आवश्यकता अधिक वाढलेली असताना दिलीप आम्हाला सोडून गेला आहे ! ६१ हे जाण्याचे वय नाही ! खरे तर त्याच्या आयुष्यातील पत्रकारिता आणि लेखनाचा कळस अध्याय होऊ घातलेला होता . पण नियतीला हे मान्य नव्हते .
दिलीप ने जाण्याचा मुहूर्त पण कसा साधला बघा ! आज १ ऑगस्ट लो .टिळकांची पुण्यतिथी ! दिलीप ची पत्रकार म्हणून दिलीप उमरगेकर नावाने कारकीर्द टिळकांच्याच केसरी च्या नगर आवृत्ती पासून सुरू झाली . त्यांच्या सारख्याच निर्भीड वृत्तीने दिलीपने पत्रकारिता केली . लोकमान्यांना संसारा पेक्षा केसरी प्रिय होता आणि दिलीपने पण आयुष्यभर संसारपेक्षा आपल्या सामाजिक बांधिलकी ला , पत्रकारितेला प्राधान्य दिले . सामाजिक संवेदनशीलता कधी कधी माणसाच्या प्रकृतीवर परिणाम करून जाते . दिलीप च्या जाण्याने हे कटुसत्य अधिक जाणवत आहे .
दिलीप प्रथम भेटला तेव्हाच त्याच्यात मराठवाड्याच्या मातीत असलेल्या जिव्हाळा आणि ममत्वाच्या गुणांचा परिचय झाला . वनवासी कल्याण आश्रमच्या कामात तो प्रथम जोडला गेला . अर्थात बालपणी संभाजीराव भिडे , सुरेशराव केतकर , बाळासाहेब दीक्षित आणि तरुण पणी माननीय मधुभाई आणि सोमनाथजी या प्रचारकांच्या सहवासात वाढल्याने प्रचारकांशी त्याची सहज मैत्री होत असे . त्यामुळेच सुनीलराव देशपांडे यांच्या मुळे संघाच्या नित्य कामाशी दिलीप जोडला गेला . पुढे विजयराव , शिरीष राव आणि चंदुभाऊ यांच्यामुळे दिलीपराव नगरच्या कामात स्थिरावले . सहज संवाद , मिश्किल आणि विनोदी स्वभाव आणि ऐसपैस वागणे त्यामुळे सगळ्या नगरच्या स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांत तो लवकरच लोकप्रिय झाला . वयोवृद्ध कै . आप्पा अंबिके यांच्यापासून ते एखादा बाल स्वयंसेवकाला पण दिलीप आपला वाटायचा . स्वर्गीय माणिकराव पाटील यांचा विशेष स्नेह त्यानी प्राप्त केला होता . अरुणराव धर्माधिकारी , कै शरदराव खांदाट , अशोकराव भोंग हे त्याची खास घरे .
स्वतःची प्रतिभा आणि बौद्धिक क्षमता त्याने कधीही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होऊ दिला नव्हता हे त्याचे वैशिट्य होते आणि त्यामुळेच लौकिक जगात कितीही मोठेपणा मिळाला तरी तो संघात वावरताना एक सामान्य स्वयंसेवक म्हणून वावरत असे . संघाच्या अधिकाऱ्यांनी त्याला एखाद्या लेखाबद्दल कौतुकाचे दोन शब्द बोलून पाठीवर थाप दिली की ते त्याला कुठल्याही सन्मानापेक्षा महत्वाचे असायचे . संघाचे प्रचारक , अधिकारी आणि बरोबरीचे कार्यकर्ते यांचे प्रेम , त्यांच्या सहवासातील आठवणी हीच त्याच्या जीवन जगण्याची प्रेरणा होती . आवर्जून तो जेव्हा फोनवर असे काही त्याचे झालेले कौतुक सांगायचा तेव्हा त्याची निरागसता आणि प्रांजळपणा खूप लोभस वाटायचा ! त्यात अहंकाराचा कुठे लवलेश नसायचा .
तो हाडाचा पत्रकार होता हे शब्दशः खरे होते . त्याच्या घरातूनच ही प्रेरणा त्याला मिळाली होती . नगरला आल्यावर त्याला त्याची ही वृत्ती स्वस्थ बसु देत नव्हती . त्यामुळे केसरी मधून उमरगेकर या नावाने आणि इतर वृत्तपत्रात विविध नावाने त्याने लेखनास सुरुवात केली .
नगर मध्ये तरुण भारत सुरू होण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत केली . शासकीय पगाराची चांगली नोकरी सोडून तरुण भारत ची जबाबदारी स्वीकारली . अर्थात त्यात कुठलाही लाभ होण्यापेक्षा विचाराच्या प्रसाराची इच्छा , आकांक्षा होती . त्यासाठी त्याने काय काय केले , काय सहन केले यावर एक स्वतंत्र कथा कादंबरी होईल ! त्या काळातील सगळ्या कथा ,उपकथा तो सांगायचा तेव्हा विनोदाने सांगता सांगता गंभीर होऊन जेव्हा त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या व्हायच्या तेव्हा मन गलबलायचे पण समजावून सांगणे आणि पुढील चांगले चित्र रंगवणे हेच करावे लागायचे .
नगरला पुणे विद्यापीठ संलग्न पत्रकारितेचा अभ्यासक्रम गोपळराव मिरीकर यांच्या साहाय्याने त्याने सुरू केला तेथे तो स्वतः शिकला , शिकवले आणि अनेक पत्रकार त्याने घडवले तेच आज नगरचे प्रमुख पत्रकार आहेत आणि दिलीपला गुरुस्थानी मानणारे आहेत . या क्षेत्रातील अफाट गुणवत्ता असूनही त्याने या गुणवत्तेचा उपयोग केवळ संघकार्य आणि त्या विचाराच्या प्रसारासाठीच केला हे येथे लक्षात ठेवणे गरजेचे आहे .
शेवटी जेंव्हा माहिती आयुक्त झाला तेव्हा आपला मित्र एव्हढा मोठा झाला याचे सर्वानाच कौतुक होते . अनेकजण त्याला त्या खुर्चीत बघण्यासाठी , त्याला मिळालेला मोठा बंगला बघण्यासाठी मुद्दाम जायचे . नागपूरला बैठकीला गेल्यावर मलाही हे सगळे त्याचे वैभव बघायला मिळाले पण यापेक्षाही जाणवले ते म्हणजे त्याने सिद्ध केलेली अफाट कार्यक्षमता ! माहिती आयुक्तांच्या कार्यालयात एकही धारिका ( file ) केस प्रलंबित अथवा शिल्लक नाही हे उदाहरण त्याने निर्माण केले . केवळ नागपूर नाही तर संभाजी नगरचा कारभार पण असाच हाताळून त्याने स्वतःला सिद्ध केले आणि मिळालेल्या संघ संस्काराचे सोने अधिक तेजोमय असे सिद्ध केले . हे काम करताना उघडपणे संघकार्य करता येत नाही याने तो अस्वस्थ असायचा .
या सगळ्या मुळे त्याच्या जीवन प्रवासात अस्थिरता निर्माण झाली पण त्याने त्यामुळे आपल्या वागण्यात , बोलण्यात नकारात्मकता , निराशा येऊ दिली नाही . त्याला जे वाटायचे ते काही मोजक्या मित्रांशी बोलायचा
पण अन्यथा त्याने संयमातच खरा पुरुषार्थ असतो हे सिद्ध केले .
संघाबाहेर मोठा मित्रपरिवार त्याने नगर , संभाजीनगर , सोलापूर येथे जोडला होता . या रक्षाबंधनाच्या वेळी त्याने निर्माण केलेल्या मानलेल्या ( रक्ताच्या नसलेल्या) अनेक भगिनी त्याचा आठवणीने अस्वस्थ होतील . त्याचा साधेपणा आणि निरपेक्ष वृत्ती अनेकांना अप्रूप वाटणारी होती आणि त्यांच्याबद्दलचा आदर वाढवणारी होती . माहिती आयुक्त असताना , पत्रकार ,संपादक म्हणून काम करताना त्याने कुठलेही फायदे , लाभ पदरात पाडून घेतले नाही आणि कुणी तसे करताना त्याला सहन झाले नाही .
या सगळ्याचा प्रकृतीवर परिणाम होत असतो . तो त्याच्यावर पण झाला . मधुमेह, मग कोरोना त्यानंतर त्याचे इतर परिणाम आणि फुफ्फुसाचा त्रास याने तो पोखरला गेला आणि आज सर्वाना धक्का देत तो निघून गेला . त्याच्या बातमीने अनेकजण अस्वस्थ आहेत . अनेकांचे फोन आले . पण दिलीप सारखी व्यक्तित्व पार्थिव रूपाने गेली तरी त्यांच्या सहवासातून त्याने निर्माण केलेल्या आनंददायी आठवणीने सदैव आपल्यात असतात .
आता त्या नकला , किस्से , पोट धरून हसणे आणि रात्री जागवणे , थंडीत गरम दूध पीणे किंवा उन्हाळ्यात शिवशक्तीचे आईस्क्रीम किंवा सलार्ड ( हा त्याचा खास शब्द ) खाणे होणार नाही . त्याच्या हातचा भिशीभिली आण्णा हा खास कन्नड पदार्थ खायला मिळणार नाही याची जरूर खंत आहे पण स्वयंसेवकाच्या अभिव्यक्ती चे उदाहरण देत आमचा एक मित्र जगला याचा माझ्यासारख्या अनेकाना अभिमान आहे .
असे आज वाटते की स्वर्गीय दिलीप आद्य पत्रकार नारद महर्षी याना स्वर्गात लवकरच भेटेल आणि कदाचित तेथेही एखादे वृत्तपत्र सुरू करेल फक्त आम्हाला ते वाचायला मिळणार नाही एव्हढेच !
दिलीप धारूरकर याना विनम्र , भावपूर्ण श्रद्धांजली .
रवींद्र मुळे , नगर
भ्रमणध्वनी : ९४२२२२१५७०