संजय बियाणी यांच्या हल्लेखोरांवर कठोर
कारवाई करण्याची मारवाडी संघटनची मागणी
लातुरात २ हजार स्त्री – पुरुषांच्या उपस्थितीत झाली निषेध सभा
लातूर, दि. ०७ :
नांदेड येथील युवा समाजसेवक संजय बियाणी यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ गजाआड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी गुरुवारी लातुरात पार पडलेल्या मारवाडी संघटनच्या निषेध सभेत करण्यात आली. बालाजी मंदिरात झालेल्या या निषेध सभेस मारवाडी समाजातील तब्बल २ हजारहून अधिक स्त्री – पुरुष , व्यापारी बांधव उपस्थित होते.
नांदेड येथील युवा समाजसेवक संजय बियाणी यांच्यावर त्यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात हल्लेखोरांनी बेछूटपणे १० ते १२ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी होऊन संजय बियाणी यांचा मृत्यू झाला. हा हल्ला करून खंडणीखोर मारेकरी पसार झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी लातूरच्या श्री बालाजी मंदिरात मारवाडी संघटनच्या वतीने निषेध सभेचेर आयोजन करण्यात आले होते.
या घटनेचा मारवाडी समाजाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. संजय बियाणी यांची निर्घृण हत्या करण्यापूर्वी हल्लेखोरांकडून त्यांच्याकडे खंडणीचीही मागणी करण्यात आली होती. याचा मारवाडी समाजाने निषेध केला आहे. या प्रकरणातील आरोपीना तात्काळ गजाआड करून त्यांच्याविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीना कठोर शिक्षा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
लातूर शहरातही मागील काही वर्षांपूर्वी गोपीकिशन अग्रवाल व मालू बंधूंची अशा पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणातील आरोपींवर आजपर्यंत कोणतीच मारावी झाली नाही, त्याची खंत व्यक्त करून मारवाडी संघटनच्या वतीने या प्रकरणी विनाविलंब कारवाईची मागणी केली आहे. यापुढे व्यापारी बांधव कोणत्याही क्षेत्रातील खंडणीबहाद्दरास थारा देणार नाहीत. यासाठी शासन स्तरावरूनही व्यापाऱ्यांना योग्य ते सहकार्य व सुरक्षा पुरविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.