उदगीर—लातूर जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक महत्त्व असलेल्या हत्तीबेट “ब” वर्गीय पर्यटन स्थळास जागतिक पर्यटनाचा “अ”दर्जा मिळवून देण्याबरोबरच या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी १५कोटींचा निधी मिळवून देण्याची घोषणा खासदार सुधाकर शृंगारे यांनी केली.
खा. सुधाकर शृंगारे यांनी हत्तीबेट पर्यटन स्थळास भेट देवून तेथील गुहे,लेण्या, वनौषधीची व हैदराबाद मुक्ती संग्रामात लढा झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. त्यांच्या हस्ते हत्तीबेट गडावर वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमास जि. प. चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके,सभापती गोविंदराव चिलकुरे,अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रा. पंडित सूर्यवंशी, जि. प. च्या माजी सदस्या उषा रोडगे, शंकर रोडगे,भाजपा तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे, धर्मपाल नादरगे, रामदास बेंबडे, उदयसिंह ठाकूर, संजय जाधव, भागवत गुरमे, लक्ष्मण जाधव, सुधाकर बिरादार यांच्यासह हत्तीबेट पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी व्ही. एस. कुलकर्णी व सीतारामदास त्यागी महाराज यांनी मान्यवरांचा सत्कार केला. व हत्तीबेट विकास कामांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
खा. सुधाकर शृंगारे यांनी जीवनातील ताणतणाव दूर होण्याचे औषध हत्तीबेटाच्या भूमीत असल्यामुळे आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी हत्तीबेट सारख्या निसर्गरम्य ठिकाणांची आवश्यकता आहे.या पर्यटनाची माहिती सर्व दूर झाल्यास हे पर्यटन स्थळ राज्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार असल्याचे शृंगारे म्हणाले.या कार्यक्रमात देवर्जन येथे लिंगायत भवन बांधकाम करण्यासाठी खासदार निधी मिळावा या मागणीचे निवेदन समाजाचे नेते सोमेश्वर रोडगे यांनी दिले. प्रास्ताविक रामचंद्र तिरुके यांनी केले. आभार प्रदर्शन युवराज धोतरे यांनी मानले.