आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते प्रॉडक्ट लाँचिंग सोहळा संपन्न; बाभळगावातून ७ जिल्ह्यात वितरीत होणार अमूलचे दुध व दुग्धजन्य पदार्थ
लातूर ; ( वृत्तसेवा ) – दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे यासाठी बाभळगाव येथील साई डेअरीने भारतातील पहिल्या क्रमांकाची दूध उत्पादक सहकारी संस्था असलेल्या गुजरातमधील अमूल आणि साबर डेअरीसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता बाभळगाव येथून अमूल दुध पिशवीसह अमूलचे दुग्धजन्य पदार्थ मराठवाड्यात आणि कर्नाटकात वितरीत होण्यास सुरवात झाली आहे.
साई डेअरी आणि ‘अमुल’, साबर डेअरी यांच्यात झालेल्या करारानुसार मिल्क प्रॉडक्टचे लाँचिंग लातूर ग्रामीणचे आमदार तथा साई डेअरी फार्म्सचे चेअरमन श्री. धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते बुधवारी (ता. ९) बाभळगाव येथे झाले. यावेळी साबर डेअरीचे प्रोडक्शन हेड के. के. जैन, फ्रेश प्रॉडक्ट डिव्हीजनचे हेड ए. के. त्रिपाठी, जयसिंगभाई पटेल, अतुल सुरु, साबर डेअरीचे हरेशभाई पटेल, परमेश्वर जोटारकर, व्यवस्थापक प्रणील जाधव, साबर डेअरी महाराष्ट्रचे एसडीओ राजेश दाभडिया, ट्वेंटीवन शुगर्सचे व्हाइस चेअरमन विजय देशमुख, पशूसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. कदम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले उपस्थित होते.
आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना भक्कम आधार मिळावा यासाठी आपल्या परिसरात उत्तम दुध डेअरी असावी, अशी आदरणीय आईंची (वैशालीताई देशमुख) इच्छा होती. यातून बाभळगाव येथे साई डेअरीला सुरवात झाली. दुधाच्या क्षेत्रात सहकार तत्वावर ज्या संस्था उत्तम काम करतात तसेच काम साई डेअरीतही व्हावे, असे माजी मुख्यमंत्री, लोकनेते विलासराव देशमुख यांनी सांगितले. तेच ध्येय समोर ठेवून आम्ही कार्यरत आहोत. त्यानुसारच अमूल आणि साबर यांच्यासोबत हे नवीन पाऊल आम्ही टाकत आहोत. दुग्ध व्यवसायातून आपल्या भागातील शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत, हाच प्रमुख उद्देश आहे.
माजी मुख्यमंत्री, लोकनेते विलासराव देशमुख आणि सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या दुरदृष्टी नेतृत्वामुळेच मांजरा परिवाराने साखर उद्योगात आपला ठसा उमटवला. साखर उद्योगातून मांजरा परिवाराने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवली. आता दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून नवीन क्रांती घडवून शेतकरी बांधवांना अधिक समृद्ध करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, असेही आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.
‘साई डेअरी’मध्ये अमूलच्या दुध, दही, ताक या पदार्थांचे पॅकेजिंग होत आहे. याचे लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, बीड यासह कर्नाटक राज्यातील बिदर, गुलबर्गा येथे वितरण होण्यास सुरवात झाली आहे. सध्या साबर डेअरी ५० हजार लिटर दुधाचे संकलन आपल्या भागातून करीत आहे. हे संकलन लवकरच १ लाख लिटरपर्यंत पोहचेल, असा विश्वास आहे. येणाऱ्या काळात अमूलचे अन्य दुग्धजन्य पदार्थ येथे तयार करून वितरीत होतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
के. के. जैन, ए. के. त्रिपाठी यांनी मनोगतात साई डेअरीच्या पायाभूत सुविधांचे कौतूक केले. साई डेअरी आणि अमुलच्या माध्यमातून लातूर आणि आसपासच्या जिल्ह्यात दुधासह दुग्ध उत्पादने पोहचवून या उद्योगातून युवकांना नवीन संधी निर्माण करुन देण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. प्राचार्य डॉ. दुष्यंंत कटारे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
—
धवलक्रांतीची ही सुरवात
लोकनेते, माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रेरणेतून इथल्या मातीत होणाऱ्या धवलक्रांतीची ही सुरवात आहे. यातून आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात चांगले दिवस येतील, तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि ग्रामीण अर्थकारणाला नवीन चालना मिळेल, असा विश्वास आमदार श्री. धिरज देशमुख यांनी व्यक्त केला.
–