16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeआंतरराष्ट्रीय*शिकागोच्या सुजाता*

*शिकागोच्या सुजाता*

यशोगाथा

अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात ‘साउथ एशियन लँग्वेजेस अँड सिव्हिलायझेशन’ या विभागात मराठी भाषेच्या असि. इन्स्ट्रक्शनल प्रोफेसर म्हणून प्रा डॉ सुजाता महाजन कार्यरत आहेत.
पण त्यांचा पुणे ते शिकागो हा प्रवास सहजासहजी झाला नाही.

महाविद्यालयीन उच्च शिक्षण प्राप्त केल्यानंतर
प्रा सुजाता महाजन यांनी पुणे येथे
निरनिराळ्या महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक म्हणून काम केले. पुढे त्यांची पुणे येथीलच ‘अमेरिकन इंस्टीट्यूट ऑफ इंडियन स्टडीज’ मध्ये मराठी भाषेच्या प्रमुख म्हणून नेमणूक झाली. भारतातील विविध भाषा शिकविणाऱ्या या इन्स्टिट्यूट मध्ये मराठीचा विभाग त्या सांभाळत होत्या. त्यांची कामातील निष्ठा अवर्णनीय होती. तेथे त्यांनी दहा वर्षे काम केले. पुढे त्यांना एक उत्तम संधी त्यांना चालून आली आणि ती म्हणजे शिकागो विद्यापीठात
‘साउथ एशियन लँग्वेजेस अँड सिव्हिलायझेशन’ या विभागात मराठी भाषेच्या असि. इन्स्ट्रक्शनल प्रोफेसर म्हणून रुजू होण्याची.


ही पोस्ट स्वीकारायची तर घरापासून दूर जावे लागणार होते. पण जगातील एका नामवंत विद्यापीठात आपली मराठी भाषा शिकवायला जाण्याचे आकर्षणही तितकेच मोठे होते. त्या विचारांनी त्या रुजू झाल्या आणि शिकागो विद्यापीठाला शिक्षण क्षेत्रातील एक चांगली व्यक्ती मिळाली.

सुजाता मॅडम यांनी पुणे विद्यापीठातून मराठी घेऊन एम ए. केले आहे. तसेच भाषाशास्त्र विषयातही एम. ए. केले. भाषाशास्त्र या विषयाची गोडी लागल्याने त्यातच त्यांनी विद्यावाचस्पती
(पीएच डी) संपादन केली. मराठी विश्वकोशाच्या भाषाशास्त्र विभागातही त्यांचे योगदान आहे.

सुजाता यांना लहानपणापासून लेखनाची आवड होती. “मी पाचवीत असल्यापासून लिहीत होते. पण बारावीत असताना माझं लेखन प्रकाशित झालं.” त्या सांगत होत्या.
बी.ए.ला असताना त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं त्याचं शीर्षक होतं ‘भावनिका’. तीन चार ओळींच्या कणिकांचा हा संग्रह होता १९८४ साली प्रकाशित झालेल्या या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा लेखनाचा ‘राज्य पुरस्कार’ मिळाला. त्या कविता लिहीत राहिल्या. त्यांचा ‘आर्त’ नावाचा संग्रह १९८५ साली म्हणजे लगेचच प्रकाशित झाला. त्यावेळी त्या अहमदनगर येथे राहत होत्या, नगरमध्ये साहित्यिक वातावरण चांगलं होतं. कवी, लेखकांच्या भेटीगाठी, कवितावाचन यामुळे साहित्य निर्मितीला अत्यंत पोषक वातावरण होतं. अनियतकालिके निघत असत. सुजाता यांच्या कथा किर्लोस्कर , सत्यकथा, स्त्री, हंस यासारख्या नावाजलेल्या मासिकात येऊ लागल्या. बारावीत असतानाच त्यांनी एक कादंबरी लिहायला घेतली आणि ती पाच दिवसात पूर्ण केली. तिला पुढे ‘रेऊ प्रतिष्ठान’चा लघु कादंबरी साठीचा पुरस्कारही मिळाला. मानवी नातेसंबंधांवर आधारित ही कादंबरी ‘सीमापार’ या नावाने १९८४ साली ‘साहित्य जागर’ या दिवाळी अंकात छापून आली.

सुजाता महाजन यांच्या कथांचे विषय नेहमीच हटके असतात. पुनर्वसन केंद्रातील काही केसेस जवळून पाहिल्याने त्यांना त्यावर कथालेखन करावेसे वाटले. म्हणून काही केसेसच्या स्टोरीज अभ्यासून स्वप्रतिभेची भर टाकून त्यांनी कथालेखन केले. ‘इथेच या क्षणात’ नावाच्या त्यांच्या कथासंग्रहात या कथांचा समावेश आहे पद्मगंधा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे

‘प्रत्येक स्त्रीमध्ये एक परस्त्री लपलेली असते. ती तिच्याशी बोलत असते.’ डॉ.सुजाता यांना रात्री किंचित अंधारात स्वतःचेच प्रतिबिंब पाहून सुचलेली ही कल्पना, त्यांना एका कवितेचा विषय देऊन गेली. ‘स्वतःतल्या परस्त्रीच्या शोधात’ हे त्यांच्या काव्यसंग्रहाला दिलेले नाव! कॉन्टिनेन्टल प्रकाशनने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. ‘शहरातील प्रत्येक’ या कथासंग्रहात कामगारापासून संशोधकापर्यंत समाजाच्या विविध स्तरात वावरणाऱ्या स्त्रियांच्या अनुभव विश्वातले अनेक प्रसंग त्यांनी रेखाटले आहेत. ही शहरातील प्रत्येकाची किंवा प्रत्येकीची कहाणी आहे.

सुजाता यांना बालसाहित्याचीही आवड आहे. त्यांनी स्वतः ‘बिंदी’ नावाची एक बालकादंबरी लिहिली आहे. धारा प्रकाशनने ती प्रकाशित केली आहे. शिवाय बालसाहित्याची वाटचाल अभ्यासून त्यांनी लिहिलेले ‘बाल साहित्य: स्वरूप आणि वाटचाल’ हे पुस्तक अतिशय मोलाचे ठरले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. च्या अंतिम वर्षाला ते क्रमिक पुस्तक म्हणून लावले आहे.

डॉ. सुजाता यांनी महाकवी कुवेंपू यांच्या चरित्राचे मराठीत भाषांतर केले आहे. हे पुस्तक ‘राष्ट्रकवी कुवेंपू प्रतिष्ठान’ने प्रकाशित केले. तसेच अमराठी भाषकांसाठी त्यांनी व्याकरणाचे एक पुस्तक ही लिहिले. विविध साहित्य प्रकारात लिलया लेखन करणाऱ्या सुजाता महाजन यांची लेखन कारकीर्द खूप मोठी आहे.

शिकागोमधे आल्यावर सुजाता मॅडम तेथील साहित्यक्षेत्रात सामील झाल्या. शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या सभासद झाल्यावर मंडळाच्या अध्यक्ष उल्का नगरकर यांनी त्यांची आवड पाहून त्यांच्याकडे साहित्यकट्ट्याची जबाबदारी सोपवली. तेथे वेगवेगळे साहित्यिक कार्यक्रम आयोजित करायचे होते. दर मंगळवारी, उत्तम पुस्तकांचे वाचन, साहित्यचर्चा यांसारखे कार्यक्रम आयोजित करत त्यांनी तेथील रसिकांची आवड फुलवली. या साहित्यकट्ट्यावर अधून मधून भाषिक खेळदेखील आयोजित केले गेले. या कार्यक्रमाचा चांगला परिणाम झाला. काही मंडळी स्वतः लिहू लागली. त्यांनी स्वतःच्या लेखांचे वाचन केले. मराठी साहित्याचा इतिहास आणि त्याचा मुळापासून गंध लोकांना मिळावा या दृष्टीने सुजाता मॅडम यांनी मराठीतील प्रथम कवयित्री महादाईसापासून अर्वाचीन कवी-कवयित्रींपर्यंत कवितांचा एक पटच सादर केला. सर्व सदस्यांनी या उपक्रमात जुन्या-नव्या कवितांचे वाचन करून स्मरणरंजनाचा आनंद घेतला.

साहित्यकट्ट्याचाच एक भाग होता, ‘बोलका कट्टा’ भारतातून वेगवेगळ्या मान्यवरांना बोलावून त्यांची व्याख्याने, सुप्रसिद्ध कवींचे कवितावाचन आणि मुलाखती ऑनलाईन होऊ लागल्या. महाराष्ट्र मंडळाच्या या सर्व उपक्रमांमुळे आणि सुजाता मॅडमच्या योगदानामुळे शिकागोमधील मराठी मंडळी साहित्यात चांगली रमली.

विद्यापीठात विद्यार्थ्यांना मराठी शिकवताना तुम्हाला काय समस्या येतात ? असे मी विचारले असता, मॅडम म्हणाल्या की, “समस्या नाही. परंतु या विद्यार्थ्यांमध्ये इतकी विविधता असते की प्रत्येकाचा विचार स्वतंत्र पातळीवर करावा लागतो. काही विद्यार्थी अमेरिकन असतात. त्यांना बरेचदा देवनागरी लिपी माहीत नसते. ती शिकवावी लागते. मराठीतील काही ध्वनींचे उच्चार त्यांना जमत नाहीत. काही मुले भारतीय वंशाची पण अमेरिकन संस्कारात वाढलेली असतात. त्यांच्या घरात मराठी बोलले जात नाही. त्यांनाही सुरुवातीपासून लिहायवाचायला शिकवावे लागते. काही विद्यार्थी मराठी बोलणारे असतात पण त्यांना लिहिता वाचता येत नसते. काही विद्यार्थी भारतीय पण इतर प्रांतातले असतात, संस्कृती समान असल्याने समान अभिव्यक्तीच्या अनेक खुणा सापडतात आणि तुलनेने मराठी शिकणं थोडे सोपे जाते. हे विद्यार्थी कधी मराठी घरातले असतात, म्हणून त्यांना मराठी शिकायचे असते.कधी जुने धार्मिक ग्रंथ, अभंग, ओव्या, संतसाहित्य यात त्यांना रस असतो, तसेच ऐतिहासिक पत्रव्यवहारातही.

सुजाता मॅडम यांच्या काही विद्यार्थ्यांनी मराठीत विद्वत्तापूर्ण लेखही लिहिले आहेत. काहींनी वसंत व्याख्यानमालेसारख्या कार्यक्रमात मराठीत व्याख्यानही दिले आहे.

डॉ. सुजाता महाजन यांच्या रूपाने अमेरिकेत मराठी शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एक उत्तम मार्गदर्शिका मिळाली आहे. तसेच शिकागो महाराष्ट्र मंडळाला साहित्यिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेणारी एक कार्यकर्ती मिळाली आहे.


लेखन: मेघना साने
संपादन:देवेंद्र भुजबळ
☎️9869484800

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]