लातूरकरांनी दाखवलेल्या संयमाबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी मानले आभार
प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी साधला संवाद
लातूर/प्रतिनिधी:
गेले कांही दिवस पिवळसर पाण्याचा पुरवठा झाल्यानंतर मनपाच्या वतीने तातडीने कार्यवाही करून शहरात स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी शुक्रवारी (दि.१३ मे )मध्यरात्री व शनिवारीही पाणीपुरवठा सुरू असणाऱ्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यानच्या काळात शहरातील नागरिकांनी संयम बाळगल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभारही मानले. लातूर शहराला धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. उन्हाळ्यात कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. त्यानंतर मागील बाजूस साठून राहिलेले पाणी पुढे येत असताना त्यातील शेवाळ वर्गीय जिवाणूंचा क्लोरीन गॅसशी संपर्क आल्यानंतर पाणी पिवळसर होत होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. तज्ञांचा सल्ला घेऊन क्लोरीन डाय ऑक्साईडचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पाण्याचा पिवळसर रंग नाहीसा झाला.
पाणी शुद्ध करून पुन्हा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे शुद्ध पाणी लातूर शहरात दाखल झाले. त्यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलकुंभाला भेट देऊन शुद्ध व स्वच्छ पाणी येत असल्याची खात्री केली. जलकुंभ भरल्यानंतर तातडीने शहरात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. रात्री १२.३०वाजता प्रकाश नगर परिसरात भेट देऊन नळाद्वारे येणारे पाणी स्वच्छ असल्याचे महापौरांनी स्वतः पाहिले. त्या भागातील नागरिकांशी त्यांनी संवादही साधला. शनिवारी दिवसभरात नेताजी नगर, शाम नगर, राम रहीम नगर, बाबा नगर, कपिल नगर आदी भागांमध्ये महापौरांनी भेटी दिल्या.नळाद्वारे शुद्ध व स्वच्छ पाणी येत असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
शनिवार पासून शहरात पाणीपुरवठा सुरू झाला आहे. संपूर्ण शहरात पाणीपुरवठा होण्यास ८ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे यापुढे ज्या भागात पाणीपुरवठा होईल तेथे जलवाहिनी मध्ये साठून असलेले पाणी सुरुवातीस येऊ शकते. पहिली २०-२५ मिनिटे पिवळसर पाणी येऊ शकते त्यानंतर मात्र स्वच्छ पाणी येईल. असे सांगताना आलेले पाणी उकळून पिणे हे कधीही आरोग्यास लाभदायक असल्याचेही महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले. जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख हे सातत्याने याप्रश्नी लक्ष देवून होते व यांनी पाणी समस्या निराकरणासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. पाण्याचा पिवळसर रंग नाहीसा करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी मार्गदर्शन करणारे सर्वजण विशेषतः महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे निवृत्त अभियंता विजय चोळखणे, क्लोरीन डाय ऑक्साईडचे पुरवठादार सुरेश कुलकर्णी, मनपाचे अभियंता विजय चव्हाण, वैद्य, रोहित पवार, स्थानिक मनुष्यबळ पुरवठा कंत्राटदार सिद्राम हारके, हाताची दोन बोटे गमावूनही कर्तव्य बजावणारे भुजबळ यांचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आभार मानले आहेत.
यामुळे पाणी झाले स्वच्छ..
पाणी पिवळसर होण्यामागील कारणे व त्यावरील उपाययोजना यासाठी विविध तज्ञांचा सल्ला घेण्यात येत होता. मजिपा चे निवृत्त अभियंता विजय चोळखणे यांनी यापूर्वी मनपातहि सेवा बजावली होती यादृष्टीने महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सुचविल्या प्रमाणे क्लोरीन डाय ऑक्साईडचा साठा तातडीने सातारा येथून उपलब्ध करून घेण्यात आला आणि त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पाण्याचा पिवळसर रंग व वासही नाहीसा झाला.
चौकट २ पालकमंत्री यांचे विशेष लक्षजिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख हे सातत्याने याप्रश्नी लक्ष देवून होते व यांनी पाणी समस्या निराकरणासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. पाण्याचा पिवळसर रंग नाहीसा करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या सूचना केल्या होत्या.