*माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विलासराव देशमुख *
*यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त विलासबाग, बाभळगाव येथे आदरांजली कार्यक्रम*
लातूर प्रतिनिधी २५ मे २२ :
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांना त्यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी गुरूवार दि. २६, मे २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता विलासबाग, बाभळगाव येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रार्थनासभेसाठी सकाळी ८.४५ वाजता विलासबाग, बाभळगाव येथे उपस्थित राहावे असे आवाहन देशमुख कुंटूबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
आदरणीय विलासरावजी देशमुख यांची राजकीय वाटचालीची सुरुवात ग्रामीण भागातून झाली. ग्रामीण भागातील समस्या त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. कृषीप्रधान व्यवस्थेच्या विकसातूनच राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकतो याची त्यांना जाणीव होती. त्यामुळेच त्यांचे विकासाचे धोरण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकासावर आधारीत होते. सर्वागीण विकास साधायचा असेल, तर ग्रामीण भागात आर्थिक क्रांतीची गरज आहे हे विकासाचे आर्थिक सुत्र त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून मांडले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कृषी व्यवसायाचे आधुनिकीकरण, सिंचन सुविधा, सहकारी चळवळ, साखर उद्योग, पथपूरवठा, कृषी उत्पादनावर आधारित प्रक्रीया उद्योग, आणि त्यासाठीचा पायाभूत सोयी-सुविधा उभारणीतून ग्रामीण अर्थव्यवथा मजबुत करण्यासाठी त्यांनी धोरणे आखून त्याची अंमलबजावणी केली. त्याचबरोबर त्यांनी शहरी भागातही गुंतवणूक वाढविली, उद्योगाना पाचारण केले, शहराचा वित्तीय विकास, प्रसार माध्यमाचा विकास, माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान आधारीत उद्योग, बांधकाम क्षेत्राचा विकास व मनोरंजन क्षेत्राचा विकास केला. यामुळे ग्रामीण आणि शहरांचा कायापालट करण्यात ते यशस्वी झाले होते.
लोकशाहीतील विधायक विचारांचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आपली राजकीय वाटचाल निवडत असतांना विलासरावजीनी राजकीय प्रवासासाठी जाणीवपूर्वक सर्वधर्मसमभावाचा विचार असलेल्या काँग्रेस पक्षाचीच निवड केली. राजकारण करीत असतांना त्यांनी लोकशाही मार्गानेच राजकारण केले. विरोधी विचारधारेचा त्यांनी कायम आदर केला.
अशा लोकविलक्षण आदरणीय विलासराव देशमुख या अष्टपैलू नेतृत्वाला आदरांजली वाहण्यासाठी गुरूवार दि. २६, मे २०२२ बाभळगाव येथील विलासबाग येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी सर्व क्षेत्रातील नागरिकांनी सकाळी ८.४५ वाजता विलासबाग येथे स्थानापन्न व्हावे अशी अपेक्षा आहे. सकाळी ९.०० वाजता सुप्रसिद्ध संगीतकार डॉ.वृषाली देशमुख-कोरडे व शशिकांत देशमुख यांच्या सहकाऱ्यांकडून शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भावदर्पण हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी ९.४५ वाजता शेवटचे भजन होईल भजन संपल्या नंतर सकाळी ९.५५ पासून पुष्पअर्पण करुन आदरांजली वाहण्यात येईल. आदरांजली वाहील्यानंतर सकाळी १०.०० वाजता प्रार्थना सभा संपेल. या प्रार्थना सभेचे सुत्रसंचालन बाळकृष्ण धायगूडे करणार आहेत. या आयोजित कार्यक्रमास विलासबाग, बाभळगाव येथे जनतेने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन देशमुख कुटूंबियांच्या वतीने करण्यात आले आहे
———————–