भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिलांना सक्षम करण्याचे काम
लव्ह जिहाद विरोधी कायदा उत्तरप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात लागू होणे गरजेचे – चित्राताई वाघ
लातूर दि. १०– मुंबईत सुरू असलेला नंगानाच, आचकट, विचकट विकृती मुंबईतच नाही रोखली तर लातूरात येण्यास वेळ लागणार नाही. हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विषय आहे राजकारणाचा नाही. महिलांना सक्षम करण्याचे काम भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने करण्यात येत असून अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून घेवून जाण्याचे आणि त्यांचे आयुष्य उध्दस्त करण्याचे प्रकार वाढले असून अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्र राज्यातही लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांनी केले.
लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सौ. चित्राताई वाघ बोलत होत्या. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड, खा. सुधाकर शृंगारे, प्रदेश चिटणीस अरविंद पाटील निलंगेकर, शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, महिला मोर्चाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा श्रीमती रेखाताई तरडे, शहर जिल्हाध्यक्षा मिनाताई भोसले, प्रदेश पदाधिकारी अॅड. जयश्री पाटील, मिनाक्षी पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत बोलताना सौ. चित्राताई वाघ म्हणाल्या की, सध्या राज्यभर दौरा करत असून आतापर्यंत ३२ जिल्हयांचा प्रवास झाला आहे. मागील अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सक्षम विरोधी पक्षाची भूमीका बजावून तत्कालीन सरकारला विविध आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून जाब विचारण्याचे काम केले. पाच-सहा महिन्यापूर्वी राज्यात एकनाथजी शिंदे व देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेवर आले आणि आमची शंभर नव्हे तर हजार पटीने जबाबदारी वाढली. शासनाच्या विविध योजना गरजूपर्यंत पोहंचविणे, त्यांना न्याय हक्क मिळवून देणे ही आता आमची जबाबदारी आहे. राज्यशासन महिला बचत गटांना सक्षमपणे आधार देण्याचे काम करत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. बारा वर्षे वयापेक्षा कमी वयाच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्यास फाशीची शिक्षा, सोहळा वर्षे वयापेक्षा कमी वयाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यास वीस वर्षाचा कठोर कारावासाची शिक्षा लागू केली आहे तर मुलीच्या लग्नाचे वय आठरा वरून एकेवीस वर्षे करून मातृशक्तीचा सन्मान केला आहे. असे सांगून सौ. चित्राताई वाघ म्हणाल्या की, महिलांना सक्षम करण्याचे काम भाजपा महिला मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यातून सक्षम महिला नेतृत्व निर्माण होत आहे. विधानसभा सभागृहात सर्वाधिक भाजपाच्याच महिला आमदार आहेत. राज्य मंत्रीमंडळात किमान तीन चार महिला सक्षमपणे मंत्री म्हणून काम करीत असल्याचे येत्या काळात निश्चितपणे दिसेल.
महिलांच्या सुरक्षेसाठी सक्षम कायदे आहेत. या सर्व कायद्याची प्रभावीपणे कडक अंमलबजावणी झाली पाहीजे यासाठी सर्वांनी आग्रही भूमीका घ्यावी. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सुरक्षा मिळावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. कोरोनाच्या काळात गरज म्हणून मोबाईल हाती आला आणि वयाच्या आधी नको ती माहिती मिळत गेली. मुलांचा आणि पालकांचा संवाद कमी झाला हे घातक असल्याचे सांगून सौ. चित्राताई वाघ म्हणाल्या की, येत्या लोकसभा निवडणूकीत ४५ प्लस आणि विधानसभा निवडणूकीत २०० प्लस हे भाजपाचे ध्येय असून यात महिला मोर्चाचे मोठे योगदान असेल प्रत्येक बुथवर भाजपाच्या पंचवीस महिलांची टीम कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.