रोटरी परिवाराच्या माध्यमातून केले जाणारे प्रत्येक सामाजिक कार्य जागतिक पातळीचे असते : बी. बी. ठोंबरे
लातूर : रोटरी परिवाराच्या माध्यमातून केले जाणारे प्रत्येक सामाजिक कार्य, उपक्रम जागतिक पातळीवर अव्वल ठरणारे असते असे प्रतिपादन नॅचरल शुगर्सचे संस्थापक अध्यक्ष – कृषीयोद्धा बी. बी. ठोंबरे यांनी केले. रोटरी क्लब लातूरच्या वतीने शुक्रवारी, दि. ३० जून २०२३ रोजी श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या व्यावसायिक गुणवत्ता सन्मान पुरस्कार सोहळ्यात ठोंबरे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांची उपस्थिती होती.
व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष सीए सुनील कोचेटा, सचिव श्रीमंत कावळे, रामनिवास धूत उपस्थित होते. या सोहळ्यात लातूरचे ख्यातनाम उद्योजक हुकूमचंदजी कलंत्री, योगप्रशिक्षक दीपक गटागट , लातूर शहर मनपाच्या स्वच्छता दूत श्रीमती लताबाई रसाळ यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन व्यावसायिक गुणवत्ता सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या नृत्य आविष्काराने लातूरचे नाव गिनीज बुकात नोंदविणाऱ्या सृष्टी जगतापचं यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना बी. बी. ठोंबरे म्हणाले की, रोटरी परिवारात समाजातील सर्वच क्षेत्रातील लोकांना कार्य करण्याची संधी मिळते. रोटरी परिवार कोणतेही ध्येय समोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करते हे सर्वज्ञात आहे. रोटरीने संपूर्ण जगाला पोलिओ मुक्त करण्याचे ध्येय ठेवले होते. त्यानुसार आपला भारतदेश आता पोलिओ मुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल करीत आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासात उद्योगक्षेत्राचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद करून ठोंबरे यांनी आयकर विभागाचे काही अधिकारी उद्योजकांना अक्षरशः चोर समजून वागत असल्याची खंत व्यक्त केली. समाजातील दोन चार लोकांमुळे सर्वच उद्योजकाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन असा बनत गेल्याने उद्योजकांच्याही मनात आपण एवढे चांगले कार्य करूनही आपल्याला दोष दिला जात असल्याने मरगळ निर्माण होते. ती मरगळ रोटरीसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने नक्कीच दूर झाल्याचे वक्तव्यही त्यांनी केले.
Bरोटरी क्लब लातूरचा हा उपक्रम रोटरीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी असा असल्याचे सांगून या पुरस्कारासाठी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड केल्याबद्दल ठोंबरे यांनी संधान व्यक्त केले. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आपले विचार व्यक्त करताना लातूरच्या उज्वल संस्कृतीबद्दल आपण ऐकून होतो, त्याची प्रचिती याठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्ष येत असल्याचे सांगितले. रोटरी परिवाराच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या समाजकार्याने प्रशासनास हातभार लावण्याचे काम होत आहे. लातूरची अर्थव्यवस्था मजबूत असल्यानेच त्याठिकाणची कायदा व सुव्यवस्था अबाधित असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. लक्ष्मीरमण लाहोटी यांनी यावेळी बोलताना रोटरी परिवाराच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याला तोड नसून गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींच्या आरोग्याविषयी रोटरी परिवाराने पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक वाटल्यास संस्था म्हणून आपणही आर्थिक वाटा उचलण्यास तयार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुरस्कार विजेते हुकूमचंद कलंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रोटरी परिवारात काम करताना आपल्याला नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्वाची शिकवण मिळाल्याचे सांगितले. या पुरस्काराने आपल्यात नवचैतन्य निर्माण केल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. दीपक गटागट , लातूरचे नाव गिनीज बुकात नोंदविणाऱ्या सृष्टी जगताप यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक रोटरीचे अध्यक्ष सुनील कोचेटा यांनी केले.
सचिव कावळे यांनी वर्ष २०२२ – २३ मध्ये रोटरीच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. रामनिवास धूत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रोटरी परिवारातील अनेक सदस्यांना यावेळी सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयप्रकाश दगडे व महेंद्र जोशी यांनी तर आभार प्रदर्शन राघवेंद्र इटकर यांनी केले. यावेळी रोटरीचे पुढीलक वर्षाचे अध्यक्ष एड. जांबुवंतराव सोनकवडे, बसवराज उटगे, रामप्रसाद राठी, शामसुंदर मानधना , सुरेश पेन्सलवार , डॉ. संजय जोगदंड, डॉ. हरिप्रसाद सोमाणी, डॉ. विनोद लड्डा यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात रोटरीच्या वतीने प्रज्ञा कांबळे या होतकरू विद्यार्थिनीस सायकल भेट देण्यात आली.