रायगड – इरशाळगडाच्या खाली आदिवासी पाड्यावर दरड कोसळून झालेली दुर्घटना वेदनादायी असल्याची भावना व्यक्त करुन बचावकार्यास प्राधान्य देत युद्धपातळीवर मदत कार्य करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करुन मदत व बचावकार्याचा आढावा घेतला. नंतर ग्रामस्थांना भेटून त्यांची आस्थेने विचारपूस केली, त्यांना धीर दिला. आवश्यक ती सर्व मदत सरकारकडून केली जाईल, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिली.
इरशाळगड ठाकूरवाडी याठिकाणी रात्रीपासून प्रशासनाच्या वतीने मदत कार्य व मदतीचा ओघ चालू झाला आहे. प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने रात्रीच दुर्घटनाग्रस्त ठिकाणी मदत साहित्य व पथके पाठवून मदत कार्य सुरू केले आहे. दुर्घटनेनंतर अलिबाग, खोपोली, कर्जत, लोणावळा, बदलापूर, पनवेल, वाशी व मुंबई येथून मदत पथके रवाना झाली. ८ रुग्णवाहिका, ४४ अधिकारी- कर्मचारी, २ जेसीबी पनवेल महानगरपालिका येथून पाठविण्यात आले आहे.
कर्जत येथून कळम, आंबिवली, मोहिल आदी प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी घटनास्थळी आहेत. दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंती हॅकर्स, शिवदुर्ग मंडळाचे स्वयंसेवक देखील या मदत कार्यात सहभागी झाले आहेत.
उपचारांसाठी शासकीय रुग्णालय तसेच एमजीएम हॉस्पिटल येथे बेड तयार ठेवण्यात आले असून घटनास्थळी पाण्याच्या बाटल्या, चादरी, ब्लॅंकेट्स, मदत साहित्य, बिस्किटे तसेच इतर प्रथमोपचार साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
खालापूर पोलिस ठाणे हद्दीत चौकजवळील इरसाळ वाडी येथे घडलेल्या दरड स्खलन घटनेच्या अनुषंगाने चौक दूरशेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे.