गझल संगम
काल स्व.आईच्या स्मरणार्थ आयोजित ‘ग़ज़ल संगम’ साठी अत्यंत विपरीत हवामान असून देखील आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्हाला अपूर्व उत्साहाची देणगी दिली त्याबद्दल ऋणी आहोत.
ग़ज़लेचे किंवा कवितांचे कार्यक्रम अनेक होतात.त्यांचे वेगवेगळे प्रयोजनही असते.मराठी आणि उर्दू ग़ज़लेच्या विश्वात सद्यस्थितीत नेमकं काय घडतंय ते ऐकण्यासाठी कुठलाही फाजील आविर्भाव न ठेवता सरस्वतीच्या उपासकांचं स्वागत आम्ही करत असतो.त्यातून इथली अभिरुची अजून संपन्न व्हावी आणि नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या युवा पिढीला योग्य दिशा मिळावी हा उद्देश.आजपर्यंत देशभरातून आलेले अनेक चांगले उर्दू आणि मराठी ग़ज़लकार आपण ऐकलेले आहेत.तसाच कालचा कार्यक्रम होता.
नव्याने मराठी गझलेच्या प्रांतात विहरू पाहणारा रेणापूरचा युवक लतीफ़ शेख , अंबाजोगाईच्या निशा चौसाळकर यांनी सादरीकरणाचा शुभारंभ केला.
🌹आपल्या मातृभूमीत गझल सादर करण्याचा उत्साह व्यंकटेश कुलकर्णी यांच्या सादरीकरणात होता.हैद्राबादमध्ये इतकी वर्ष रहात असून सुद्धा त्यांनी केलेली माय मराठीची उपासना जाणवत होती. 🌹
आपल्या बहुचर्चित हज़लसह श्री.कालिदास चवडेकरांनी सादर केलेल्या इतर गझलाही दर्जेदार होत्या.मुळात परिक्षा संपवून कोसळत्या पावसात चार तास प्रवास करून गझलमंचावर उपस्थित व्हायचं हे त्यांचं ग़ज़लेशी इश्क़ असल्याचं प्रमाण आहे.
🌹श्री.सदानंद बेंद्रे …..त्यांचा ‘मुसाफ़िर’ हा तख़ल्लुस त्यांचं ‘भैय्या’ हे टोपणनाव खाऊन टाकणार आहे.😊
अप्रतीम सादरीकरण….गझल कागदावरून व्यासपिठावर अवतरताना तेवढीच परिणामकारक कशी वाटली पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे बेंद्रेची गझल.फारसा आरडाओरडा न करता,फारसे नाटकी हावभाव न करता किंवा तरन्नुमच्या नावाखाली सुरांच्या आश्रयाशिवाय जेव्हा गझल सादर करायची असते तेव्हा तो दम तिच्यात अंगभूत हवा.विचार,शब्द आणि कल्पनेचं सौंदर्य घेऊन कमनीय बांध्याची गझलसुंदरी मंचावर अवतरली पाहिजे.मग तिला मिळणारी दाद ही दिलफेक आणि उत्स्फूर्त असते.तशी दाद लातूरच्या रसिकांची बेंद्रेना मिळाली.
🌹पंडित सागर त्रिपाठीं विषयी ह्या पामरानं काय बोलावं? उर्दू ग़ज़ल आणि हिंदी काव्यसंस्कृतीचा वाहता ओघ आहे तो.त्या प्रवाहात वाहण्याशिवाय अन्य कुठलाही पर्याय आपल्यापाशी नसतोच.ते स्वतःला माझ्या आईचा मोठा मुलगा मानतात.अजून काय हवं?🙏🌹
स्व.आईची पुण्यतिथी हे निमित्त आहे.काय वाचावं ?काय ऐकावं ? कशात रमावं? याचं भान जे तिने दिलं ,या कार्यक्रमाच्या निमित्ताने यथाशक्ती त्याचं वितरण करण्याचा प्रयत्न करतो.
🌹माझे मित्र सुप्रसिद्ध कवि श्री. योगिराज माने आपल्या खुमासदार शैलीत नेहमीच कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन करतात आणि उत्साहाने करतात, तसेच माझे विद्वान मित्र मराठी गझलेचे अभ्यासक,उपासक डॉक्टर संतोष कुलकर्णी स्वतः चे सादरीकरण आणि कार्यक्रमाचे नियोजन अशी अमुल्य साथ देतात दोघांचा ऋणी मी कायम असतो.
🌹मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले लातूरचे जेष्ठ साहित्यिक आदरणीय श्री.शेषराव मोहिते यांनी या प्रसंगी उपस्थित राहून त्यांचा सत्कार करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.शिवाय कार्यक्रम ऐकण्यासाठी संपेपर्यंत ते उपस्थित राहिले.
🌹कवि सर्वश्री सुरेश गीर’ सागर’,सय्यद ज़हीरुद्दीन ‘जोश’,विमल मुदाळे इर्ले,यांचेही आभार.
श्री.अभिजीतजी देशमुख,श्री.संजय अयाचित व श्री.युनूस पटेल यांना सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.🌹
🌹माध्यम वृत्त सेवेचे श्री.गोपाळराव कुलकर्णी,श्रीयुत जैस्वाल , सिद्धेश्वर संकाये व ‘स्वानंद’सारखं देखणं सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल ॲड.संजय पांडे सर्वांना धन्यवाद !
🌹विशेष म्हणजे आपल्याला काही सादर करायचे नाही परंतु जे आपल्या समोर सादर होत आहे त्याचा मनस्वी आनंद घेण्यासाठी उपस्थित असलेले सर्व कवि आणि साहित्यिक यांचे विशेष आभार.🌹
काही न्यून जाणवलं असेल तर अवश्य सांगा पुढच्या वेळी सुधारणा करू… पुनःश्च एकदा सर्व रसिकांचे आभार 🙏🌹
- अजय पांडे 'बेवक़्त'
अभंग प्रतिष्ठानचे सर्व सदस्य मित्र