यशकथा

0
336

*हेमंत कासार:चढता आलेख*

भारदस्त व्यक्तिमत्व,प्रभावी नेतृत्व,उत्तम वक्तृत्व,धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांना ओळखले जाते असे ऍड हेमंतजी कासार यांनी अतिशय बिकट परिस्थितीतुन ,निर्भीडपणे स्वतःचे विश्व निर्माण केले .त्यांची यशकथा आजच्या तरुणांना नक्कीच प्रेरणादायी आहे….

श्री हेमंत चंद्रकांत कासार ह्यांची जन्म व कर्मभूमी सातारा.त्यांचा जन्म २० जुन १९५८ रोजी झाला. वडिलांचे मूळ गाव अहमदनगर परंतु आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असल्याने त्यांचं बालपण मामांकडे गेले.त्यांचे प्राथमिक शिक्षण हत्तीखाना तर माध्यमिक शिक्षण अनंत हायस्कुलयेथे झाले.त्यांचे बालपण फार गरिबीत गेले.

त्यांना तीन मामा. मोठया मामांकडून व्यवहार ज्ञान,दूरदृष्टी व धाडस लाभले. मधले मामा डॉ खुटाळे ह्यांनी उत्तम संस्कार दिले .त्यामुळे व्यसनांपासून अलिप्त राहिले .तर धाकटे मामा ह्यांच्याकडून लोकांशी जोडून राहण्याची कला शिकले.त्यांचे एक सावत्र मामा कृष्णाजी उर्फ भाऊ खुटाळे हे देखील अतिशय कर्तबगार होते. त्यांच्याकडून देखील अनेक गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या.

मामांच्या मुलांमुळे व्यवसायात उत्तम संधी मिळाली. त्यांच्या जडणघडणीत आजोळच्या लोकांचा पगडा व सहभाग खूप मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे असे ते आवर्जून सांगतात. त्यांची आई शांताबाई चंद्रकांत कासार ह्या खूप शांत,संयमी व साध्या होत्या .

हेमंतजीना वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाअभावी शाळेतील शिक्षण व्यवस्थित घेता आले नाही परंतु खूप शिकून काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.अत्यंत धाडसी,जिद्दी,धैर्यवादी स्वभाव असल्याने वयाच्या १६ व्या वर्षी राजलक्ष्मी थिएटर समोर रस्त्यावर कोल्ड्रिंक्स व खाद्यपदार्थ विकण्याचा व्यवसाय त्यांनी केला.एकीकडे शिक्षण व व्यवसाय चालू होता. असे करत त्यांनी बी कॉम पूर्ण केले.

कोणत्याही कामात कमीपणा नसतो स्वावलंबी व स्वाभिमानी असणे महत्त्वाचे असते,असे त्यांचे मत आहे

मामा लोकांच्या सहकार्यामुळे व आग्रहामुळे पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला गेले व मोठया कष्टाने, अथक प्रयत्नातून पुणे विद्यापीठाच्या

इंडियन लाँ सोसायटीच्या कॉलेज मधून कायद्याची पदवी घेतली. पुढे तिथूनच डिप्लोमा इन टॅक्सेशन पूर्ण केले.

त्यावेळी ते होस्टेलला राहत होते. एकटे राहिल्याने ते अनेक गोष्टी शिकले. स्वतःचे निर्णय स्वतःच घेत स्वतःचे काम स्वतः करावे लागे. त्यामुळे लहान वयातच ते स्वावलंबी बनले.परिस्थिती मनुष्याला खर्या अर्थाने घडवत असते व खूप काही शिकवून जाते . अनुभवातूच माणूस शहाणा होतो.

हेमांतजींनी दूरदृष्टी ठेऊन भविष्यात आपला स्वतःचा व्यवसाय करायचे ठरवले होते. त्या दृष्टीने कोणताही मोबदला न घेता नोकरी केली .पुढे अनुभवाच्या शिदोरीवर सातारा येथे १९८४ साली एका लहान खोलीत कायदेशीर सल्लागार व व्यवसाय मार्गदर्शक म्हणून व्यवसाय सुरू केला. त्यावेळी फक्त एक टेबल व खुर्ची होती .आज त्यांचे मोठे ऑफिस आहे.वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्यांनी स्वतःचे घर बांधले. यावरून त्यांच्यातील हिम्मत व जिद्द दिसून येते.

एका चाकोरीत व पारंपरिक पद्धतीने कर सल्लागार व्यवसाय न करता उद्योजक व व्यापाऱ्यांची सर्व पातळीवर कशी प्रगती होईल याचे त्यांनी मार्गदर्शन केले.आज त्यांच्याकडे ५०० लोकांचे काम असून अगदी छोटे व्यावसायिक,व्यापारी ते ५०० कोटी वार्षिक उलाढाल असणारे उद्योजक आहेत .

अनेक आव्हानात्मक व कायदेशीर अडचणींची कामे त्यांनी केली आहेत व आजही करत आहेत. त्यांनी कार्यक्षेत्र केवळ सातारा न ठेवता पुणे व इतर भागात विस्तारलेले आहे.आज त्यांच्याकडे प्रतिष्ठीत बिल्डर,एम आय डी सी व इतर भागातील इंडस्ट्रियल युनिट्स,हॉटेल्स,शिक्षणसंस्था,हॉस्पिटल,मोठे व्यापारी, वकील, आर्किटेक्ट, राजकीय पक्ष इ अशा लोकांची विविध प्रकारची कामे आहेत.हेमांतजींना त्यांच्या कामात त्यांचा मुलगा राजेश्वर जो सी ए आहे व त्याची पत्नी सौ भाग्यश्री यांची साथ व मदत आहे.सातारच्या राजघराण्याशी त्यांचे ऋणानुबंध आहेत . कै.छ.अभयसिंह महाराज व आ.छ.शिवेंद्रसिंहराजे यांच्याबरोबर त्यांचे घरघुती संबध आहेत.

प्रत्येक यशस्वी पुरुषाचा मागे एक स्त्री असते. ह्याप्रमाणे सौ सुनेत्रा ताईंचे त्यांच्या जीवनात मोलाचे स्थान आहे. त्यांची मुलगी केतकी ही देखील मेलबर्न ऑस्ट्रेलिया येथे मोठया बँकेत उच्च पदावर कार्यरत आहे.शिक्षणाचे महत्त्व माहीत असल्याने त्यांनी दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले.

वेळेचे उत्तम नियोजन,कामातील शिस्त,प्रामाणिकपणा,आधुनिकता,

प्रचंड मेहनत,चिकाटी व नैतिकता हे विशेष गुण असल्याने ते यशाचे शिखर गाठू शकले.कोणताही व्यवसाय करताना त्यातील बारकावे शिकून घेतले पाहिजे त्याचे सखोल ज्ञान असले पाहिजे असा उल्लेख ते करतात.सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत.समाजात ते अत्यंत लोकप्रिय असल्याने त्यांना मानाचे स्थान आहे व त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

ते नेहमी सर्वांना सहकार्य करतात. काहीही अडचण असली की मदतीला लगेच धावून येतात. त्यांच्या अनेक मोठया लोकांशी ओळखी असल्याने त्याचा उपयोग ते समाजहितासाठी व लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी करतात. त्यांनी समाजात अनेक लहान,मोठी काम सर्वांच्या सहकाऱ्यांने केली आहे मग ते नवरात्रीतले कार्यक्रमाचे नियोजन असो अथवा वधू वर मेळावे किंवा बसप्पा पेठतील कालिका मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार असो. सर्वांच्या सहमतीने, सर्वांना बरोबर घेऊन ते आजही तेव्हढ्याच हिमतीने काम करतात.आज वयाच्या ६३ व्या वर्षी देखील ते पूर्वीसारखेच कार्यरत आहेत व पुढेही राहणार आहेत. वय फक्त एक आकडा आहे,कोणत्याही कामाला वयाचे बंधन नसते,असे ते म्हणतात .

तुम्ही तरुणांना कोणता संदेश द्याल ? असे विचारल्यावर ते म्हणाले, दैनंदिन जीवनात व व्यापार उद्योगात काम करत असताना आपण वास्तववादी, विज्ञाननिष्ठ, अध्यात्मवादी असणे महत्वाचे आहे .त्याच बरोबर कष्टाला प्रामाणिकपणाची जोड द्या, चिकित्सक रहा व नवीन कौशल्य आत्मसात करा .तात्पुरता विचार न करता दीर्घकालीन विचार करा व व्यसनांपासून लांब रहाल तर तुमचे यश निश्चित आहे ,असा लाखमोलाचा संदेश त्यांनी दिला .

हेमंतजीना दीर्घायुष्य लाभो या मनःपूर्वक शुभेच्छा.

लेखन : रश्मी हेडे.

संपादन : देवेंद्र भुजबळ.9869484800.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here