अगदी असाच असतो भल्या माणसाचा जन्म अन् त्याचा लाभणारा सहवास.म्हणून तो सा-या भेदांपलिकडचा असला तरी सर्वांना आपलासा व हवाहवासा वाटतो.
खरंतर त्याच्या सहवासात ना कुठल्या भौतिक साधनांची ,फार बुध्दीमान असण्याची गरज नसतेच मुळी याउलट
फक्त मन व बुध्दीनं स्वतःला आहे तसं स्विकारुन हजर राहण्याची गरज असते.तो कळायला आधी तो कसा जगतो , हेच कळणं महत्वाचं असतं.त्याच्या सहवासातला हरेक क्षण काहीतरी नक्कीच मनाला शिकवत राहतो.जसं की स्वतःच्या
आचार – विचारांशी प्रामाणिक राहण्याची कसरत करत राहणं ,पैसा व भौतिक सुखाच्या लोभाला बळी न पडणं ,दुस-यांबद्दल वाईट भावना न ठेवणं , सदैव इतरांच्या कल्याणाची भावना ठेवणं ,बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्मनाचं सौंदर्य वाढवणं , माणसांच्या गर्दीतही एकांत अनुभवणं , नैराश्याला दूर साधत आशेला जागवत राहणं , चांगल्या गोष्टींचं मनापासून कौतुक करणं ,आपल्या प्रत्येक कृतीतून सा-याचं हित जपणं ,भावनांची कदर करणं , स्वतःमधल्या क्षमतांची ओळख करुन देणं,अशी सारीच सुसंस्कारांची अनमोल शिदोरी भेटत राहते.म्हणूनच तो मनाचं मोठं परिवर्तन घडवत
आयुष्य समृद्ध करत शाश्वत सुख व शांतीची सिध्दी प्राप्त करुन देणारा तेजस्वी सुर्यासारखा व्रतस्थ गुरु असतो ,याची मनाला पक्की खात्री पटत राहते.अन् तीच खूप काही गवसल्याची जाणीव मनाला सुखावणारी असते.असाच जणू अमुल्य गोष्टींच्या जाणीवांचा साक्षात्कार घडवून आणणारा हा सकाळच्या कोवळ्या उन्हातील प्रसन्न ,हसरा क्षण काही वेळांपूर्वी मला जुना चंदूर रोड परिसरात मोबाईलमध्ये टिपता आला.
- सागर बाणदार
- इचलकरंजी ( जि.कोल्हापूर )