सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या मराठी गझल अभिवाचनाने केले लातूरकर मंत्रमुग्ध : शायर अजय पांडे ‘बेवक्त’ यांचा सत्कार
लातूर( वृत्तसेवा )- : लातूरच्या सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या ‘गझलमाला’ या उपक्रमांतर्गत मराठी गझलसम्राट सुरेश भट यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे १५ एप्रिल, २०२४ रोजी सुरेश भटांच्या गझलांचे अभिवाचन व गायन सादर करण्यात आले. शिवाय, विशेष म्हणजे, सालाबादप्रमाणे होणाऱ्या उर्दू शायरांच्या सन्मान सोहळ्यात या वर्षी नामांकित उर्दू-मराठी गझलकार अजय पांडे ‘बेवक्त’ यांना सन्मानित करण्यात आले.

यावर्षीच्या जाहीर कार्यक्रमात सुरेश भटांच्या एकाहून एक सरस अशा गझला-कवितांच्या अभिवाचनाने व सन्मान सोहळ्यात झालेल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी रंगत आणली. संजय अयाचित, कौस्तुभ जोशी, महेश दास्ताने, प्रा. अरुणा देशपांडे, सुवर्णा बुरांडे, डॉ. स्वप्नजा यादव व अपर्णा गोवंडे यांनी सुरेश भटांच्या मराठी गझलांचे अतिशय मनोरम असे सादरीकरण केले.

मान्यवर गायकांनी गायिलेल्या त्यांच्या गझला-कवितांचे केवळ व्याकरणबद्ध सहज वाचनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कौस्तुभ जोशी यांनी गायिलेल्या ‘हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही’ या गीताने व ‘गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे’ या सामुहिक गीतगायनाने कार्यक्रम अभिजात उंचीवर नेला. दिनेश पोखरकर यांनी तबल्याची अतिशय रंगतदार साथ दिली. डॉ. संतोष कुलकर्णी यांनी अभिवाचनाचे सूत्रसंचालन केले.

आपल्या प्रास्ताविकात डॉ. संतोष कुलकर्णी यांनी सुरेश भटांच्या कलंदरीची व संघर्षाची उदाहरणे देत त्यांच्या विशेष गझलवृत्ती व त्यांचे मराठी साहित्यातले स्थान अधोरेखित केले. सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या सन्मानाला उत्तर देताना अजय पांडे यांनी सुरेश भटांचे मराठी साहित्यातील एकमेवाद्वितीय स्थान अबाधित असून, त्यांच्या रचना सामान्यजनांच्या ओठांवर असून त्या अजरामर व अवीट असल्याचे मत व्यक्त केले. आपल्या अभ्श्नातून त्यांनी उर्दूच्या इतिहास, विकास व जडणघडणीचा धांडोळा घेतला. खुमासदार शैलीत अध्यक्षीय समारोप करताना अभिजीत देशमुख यांनी आपल्या हयातीत सुरेश भटांसारखी दिग्गज मंडळी होवून गेल्याचा आपल्या पिढीला सार्थ अभिमान वाटला पाहिजे असे प्रतिपादन केले. प्रा. मनोहर कबाडे यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अजय पांडे यांच्या सन्मानपत्राचे वाचन डॉ. अनघा राजपूत यांनी केले. सौ. वृषाली कुलकर्णी, धनंजय बेंबडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

या वर्षी पंचवटी शहरातील हॉटेलच्या दालनात संपन्न झालेल्या कार्यक्रमास शिरीष पोफळे, गोविंद कुलकर्णी, बाळकृष्ण धायगुडे, कल्याण वाघमारे, भारत थोरात, डॉ. मुकुंद भिसे, संतोष गांधी, अमोल गोवंडे, सुरेश गीर ‘सागर’, वाय. डी. कुलकर्णी, बालाजी टेंकाळे, आविष्कार गोजमगुंडे, प्राचार्य कामण्णा, प्रदीप कुलकर्णी, गीता पाटील, साजिद जहिरोद्दिन, युनूस पटेल, शिरीष कुलकर्णी अशी अनेक मान्यवर रसिक, कलावंत, साहित्यिक, रंगकर्मी मंडळी उपस्थित होती.