लातूर विशाल सहकारी सोसायटीच्या संचालकांची बिनविरोध निवड
माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांच्या नेतृत्वात ३५ वर्षांची परंपरा कायम
लातूर/प्रतिनिधी:
लातूर विशाल सहकारी सोसायटीच्या संचालकांची बिनविरोध निवड होण्याची ३५ वर्षाची परंपरा यावेळीही कायम राहिली. माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांच्या नेतृत्वात यावेळीही संचालकांची बिनविरोध निवड झाल्याचे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. लातूर शहरासह बोरवटी, खोपेगाव, खुलगापुर, वासनगाव, वरवंटी, सिकंदरपुर, खाडगाव आदी १२ गावांची एकत्रितरित्या लातूर विशाल सहकारी सोसायटी तयार करण्यात आलेली आहे.या सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू होती.
माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांच्या नेतृत्वात लोकनेते विलासरावजी देशमुख सहकार पॅनल कडून उमेदवारांनी अर्ज भरले होते.बुधवार दि.६ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कर्जदार गटातून माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, बाजार समितीचे माजी सभापती लालासाहेब देशमुख, माजी उपसभापती रावसाहेब लकडे,पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ मोरे, विकास कारखान्याचे संचालक गोविंदराव डुरे पाटील, सत्यनारायण पाटील, ॲड.विकास सुळ, नागनाथ खोबरे, दगडू भारती, विष्णू खंदाडे, व्यंकट रणखांब, भुजंग पाटील, दत्तात्रय आर्वीकर, महिला गटातून आशा जगन्नाथ सुरवसे पाटील, समता राम थोरमोटे पाटील, अनुसूचित जाती गटातून फुलचंद धडे, यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांच्या नेतृत्वात मागील ३५ वर्षांपासून ही सोसायटी बिनविरोध होत आहे.यावेळीही ती परंपरा कायम राखल्याबद्दल नूतन संचालकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बिनविरोध विजयी झालेल्या नूतन संचालकांच्या वतीने माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. सोसायटीच्या सभासदांचे हित जोपासून नवनव्या संकल्पना राबविण्यावर आगामी काळात भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांकडून अभिनंदन.
लातूर शहर व परिसरातील १२ गावांचा कारभार हाकणारी लातूर विशाल सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली.याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी नूतन संचालकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले. लातूर सोसायटीची वैभवशाली परंपरा कायम राखल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.