इचलकरंजी: प्रतिनिधी
कबनूर येथील कोल्हापूर रोडवरील फुलेनगर परिसरात एका फटाक्याच्या कारखान्यात अचानक स्फोट होऊन
लागलेल्या आगीमध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज बुधवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली. परवेज रफी मुजावर असे या घटनेत मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली.
याबाबत अधिक माहिती अशी की , श्री रफि मुजावर यांच्या मालकीचा फटाके तयार करण्याचा अमन फटाके मार्ट या नावाने कारखाना आहे. येथील जलस्वराज्य पाण्याच्या टाकीजवळ त्यांचा शोभेची दारू तयार करण्याचा फटाक्याचा कारखाना आहे .नेहमीप्रमाणे परवेज हा सकाळी सदरच्या कारखान्यामध्ये साफ सफाईसाठी गेला होता.त्या ठिकाणी अचानक स्फोट झाला.या स्फोटातील आगीमध्ये गंभीररित्या भाजून त्याचा जागीच मृत्यू झाला.
या स्फोटाची तीव्रता इतकी होती की या स्फोटाचा आवाज सुमारे २ किलोमीटर अंतरापर्यंत गेला होता.या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.