प्रवास एका संगीतकाराचा

0
684

*चिंबाडल्या रानी विठ्ठलाचा लळा*

*प्रवास संगीतकाराचा*

आनंदी विकास मराठवाड्यातील पहिल्या महिला संगीतकार. ख्याती सिद्ध संगीतकार पं. दशरथ पुजारी ,मुंबई यांच्या त्या शिष्या. त्यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी 1998 ते 2008 या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये नांदेड ते मुंबई असा दर आठवड्यातून दोन दिवस कष्टप्रद प्रवास करून संगीताचे उच्च शिक्षण घेतले. दुर्दम्य इच्छाशक्ती , स्वतःबद्दलचा प्रचंड आत्मविश्वास, सतत काहीतरी नावीन्यपूर्ण सर्जनशील करण्यासाठी ची धडपड ,उत्तम संगीत देण्यासाठीचा अट्टहास, अतुलनीय रचना देण्यासाठी अविरतपणे कष्ट करण्याची तयारी यामुळेच त्यांचा अचंबित करणारा प्रवास शक्य झालेला आहे. संगीतकार म्हणून करिअर करताना जी आवश्यक व्यावसायिक कौशल्ये असायला हवीत. ती त्यांनी ग्रामीण भागात राहून सुद्धा मेहनतीच्या बळावर आत्मसात केली. त्यासाठी आवश्यक असणारी संगीतक्षेत्रातील गुरु सुद्धा त्यांनी कल्पकतेने निवडले.आजवर त्यांनी 400 पेक्षा जास्त काव्यरचना संगीतबद्ध केले आहेत . त्यांनी आतापर्यंत चौदा सीडीं ची निर्मिती केलेली असून पाच थीम सॉंग ही त्यांनी प्रकाशित केलेले आहेत.

गाणी ऋतू वेल्हाळ या नावाने त्यांनी निर्मिती केलेला कार्यक्रम ज्यात गाणी ,कविता ,नृत्य ,चित्र, संगीत व काव्य हे सर्व कला प्रकार एकाच वेळी लिलया साधत त्याचे प्रयोग अखिल भारतीय संगीत संमेलन परभणी , अखिल भारतीय नाट्य संमेलन बीड ,अखिल भारतीय साहित्य संमेलन , मराठवाडा साहित्य संमेलन अशा अतिउच्च व्यासपीठावरून त्यांनी हे प्रयोग दमदारपणे सादर केलेले आहेत. तसेच अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनात परभणी येथे याच प्रकारातून लहान मुलांसाठी ‘ फुलपाखरांचा गाव ‘ हा नाविन्यपूर्ण संगीत कार्यक्रमही सादर केलेला आहे.महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या ठिकाणाहून तिर्थक्षेत्राच्या ठिकाणाहून त्यांनी स्वतःचे दर्जेदार कार्यक्रम सादर केलेले आहेत. साहित्यिक क्षेत्रातील ना. धो. महानोर, नाट्य नाट्यक्षेत्रातील चतुरस्त्र अभिनेते प्रभाकर पणशीकर , गायिका उत्तरा केळकर , मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्या सृजनात्मक संगीत निर्मितीचा गौरव केलेला आहे.संगीतकार म्हणून आज पर्यंतचा त्यांचा प्रवास कसा झाला याचा आढावा आज आपण आनंदीविकास यांनी नुकत्याच निर्माण केलेल्या “*चिंबाडल्या*रानी* ” या गीताच्या निर्मितीच्या निमित्ताने त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा हा लेख.

……………………………………………………

मराठवाड्यातील मुदखेड जंक्शन या तालुक्याच्या ठिकाणी आनंदी विकास यांचा जन्म झाला. वडील हरिहरराव वैद्य मुदखेड च्या महात्मा गांधी विद्यालया मध्ये संस्कृतचे शिक्षक होते. वडील संस्कृत विषयाचे विद्वान पंडित, संस्कृत वांड़मयाचा चे अभ्यासक, व्यासंगी असे व्यक्तिमत्व होते. आई गोपिकाबाई कर्तव्यदक्ष गृहिणी होत्या आईने त्यांच्या संगीत शिक्षणासाठी सातत्याने केलेल्या तडजोडी मुळे व वडिलांनी केलेल्या हेतुपुरस्सर मेहनतीने तसेच मुदखेड परिसरामध्ये वावरणाऱ्या गोंधळी, मुसाफिर मसनजोगी ,जोगतीण इ. यांच्या माध्यमातून लोकगीतांचा व लोककलांचा अभ्यास लहान वयातच होत गेला. यांच्याकडून जी गीते ऐकली जायची त्यांच्या ज्या चाली ऐकल्या जायच्या याचाही खूप मोठा परिणाम त्यांच्या बालमनावर झाला व याच ठिकाणी त्यांच्यातल्या संगीतकार या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत गेली व ती बीज पेरणी मुदखेड परिसरामध्ये शालेय शिक्षण घेत असताना झाली. मुदखेड ला संगीताचे शिक्षण गुरुवर्य माधवराव कांजाळकर यांच्याकडे घेतले. मुदखेड मध्ये शामराव केजकर व शोभा केजकर या दाम्पत्याने त्यांचा संगीताचा रियाज करून घेतला. म्हणतात ना ‘लेकराचे पाय पाळण्यात दिसतात ‘ या म्हणीप्रमाणे वडिलांना त्यांच्यातल्या संगीतकलेची चुणूक त्याच वेळी कळाली होती म्हणून वडील पहाटे तीन वाजता त्यांना रियाजा साठी गुरुजींकडे घेऊन जायचे.

शालेय वयात शिक्षण घेत असताना त्यांनी सांगितलेली एक गंमतशीर आठवण आहे. एकदा मंत्री महोदयांचा मुदखेड ला सत्कार होता व त्या कार्यक्रमातील स्वागत गीत व पसायदान बनण्याची जबाबदारी आनंदी विकास यांच्याकडे होती .या कार्यक्रमाला मंत्रीमहोदय उशिरा आल्यामुळे त्यांना भूक लागली. अनेक तासांची प्रतीक्षा केल्यामुळे भूक वाढू लागली. त्यामुळे भुक सहन न झाल्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबतचा जेवणाचा डब्बा उघडून एका खोलीमध्ये खायला सुरुवात केली . त्यानंतर काही क्षणांमध्ये अचानक मंत्रीमहोदय कार्यक्रम स्थळी प्रगट झाले व स्वागत गीत म्हणणारी मुलगी कोठे आहे ? याबाबत कार्यक्रमाचे संयोजक विचारणा करत असताना त्यांनी त्यावेळी सुद्धा ठाम उत्तर दिले ,मला भूक लागली होती मी आता जेवते आहे व मी जेवण झाल्यानंतरच स्वागत गीत गाणार आहे. असा बिनधास्तपणा , ठामपणा ,वक्तशीरपणा त्यांच्या अंगी बालवया पासूनच होता हे विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते.

शिक्षण पूर्ण करत असताना त्याबरोबरीनेच संगीताचेही शिक्षण त्यांचे चालू होते. त्यांनी मराठी विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. असून संगीत अलंकार ही संगीत क्षेत्रातील पदवी देखील प्राप्त केली आहे त्यानंतर पुढे अंबाजोगाई येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पं शिवदास देगलूरकर यांच्याकडे गायनाचे धडे घेतले.

पुढे लग्नानंतर नांदेड जवळील मालेगाव या त्यांच्या छोट्या गावी त्यांनी पुढे संगीत आराधना चालूच ठेवली. मालेगाव मधून त्यांनी सलग 7 वर्ष संगीताचे मोठमोठे उपक्रम व कार्यक्रम संपन्न केले व तेथील रसिकांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण होण्यास साहाय्य केले .योगायोगाने आयुष्यामधील जोडीदार सुद्धा संगीतक्षेत्रातील मिळाल्यामुळे संगीत साधना करण्यासाठी चे पाठबळ मिळाले. मनामध्ये मात्र संगीत क्षेत्रामध्ये काहीतरी नावीन्यपूर्ण, इतरांपेक्षा वेगळे करावयाची तीव्र इच्छा असल्यामुळे मुंबई येथे 1998 मध्ये ख्यातनाम संगीतकार दशरथ पुजारी सरांकडे त्यांनी पुढील शिक्षण घेतले. पुजारी सरांचा परिचय होण्याची गोष्ट सुद्धा एक योगायोगच होती .मुंबईच्या नवाकाळ या वर्तमानपत्रांमध्ये पंडित दशरथ पुजारी सरांकडे संगीत शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या परीक्षेत उतरत त्यांच्या कडून गंडा बंधन करून घेऊन त्यांचे शिष्यत्व पत्करले व पुढे हा गुरू शिष्याचा प्रवास सातत्याने दहा वर्षे चालत राहिला . आनंदी विकास या ग्रामीण भागातून मुंबईसारख्या पुढारलेल्या शहरांमध्ये नव्यानेच गेलेल्या होत्या. संगीत क्षेत्रातील नावाजलेली मंडळी त्या ठिकाणी यायची, त्या ठिकाणी असणारा इंग्रजी भाषेचा वापर ,शहरी वातावरण यामुळे त्या कधीतरी बावरायच्याही परंतु त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास होता त्या आत्मविश्वासाने आनंदीविकास ठामपणे आलेली परिस्थिती उत्तमरीत्या हाताळायच्या . गुरू म्हणून दशरथ पुजारी यांना त्यांचा हा बाणा मनातून आवडायचा तसे पुजारीजींनी त्यांच्या नांदेड येथील आनंदीविकास यांच्या घरी झालेल्या प्रकट मुलाखती मधून बोलून ही दाखवले होते त्याचे कारण होते डोळ्यामध्ये संगीतकार होण्याचे स्वप्न घेऊन त्यांची 12-12 तास संगीताचे धडे घेण्यासाठी मुंबई नांदेड प्रवास करत ध्येयपूर्तीची धडपड आणि त्यावेळी स्विकारलेल्या आव्हानाला कुटुंबीयांनी दिलेली साथ . घरचे सर्व कुळाचार कुलधर्म, प्रापंचिक सांसारिक जबाबदाऱ्या, सांभाळून तसेच जिल्हा परिषद मधील नोकरी मध्येही कुठे उणिवा न जाणवू देता प्रचंड कष्ट घेत त्यांनी संगीताचे शिक्षण मुंबईमध्ये घेतले. पुजारी सरांकडे महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतकारांची उठबस असायची त्यामुळे त्यांच्या सहवासात आलेल्या संगीत क्षेत्रातील दिग्गजांबरोबर संगीत रचना ऐकण्याची व निर्मितीची त्यांना संधी प्राप्त झाली. नकळतच आनंदी विकास यांच्या मनावर संगीतकाराचे शिक्षण प्रशिक्षण होत गेले. पुजारी सरांनी त्यांना मैफिली मध्ये कसे गायचे ,सुगम संगीत कसे गायचे, बंदिशी कशा गायच्या हे शिकवत असताना त्यांना आनंदीविकास यांच्यातील संगीतकारांसाठी असणारी गुणवैशिष्ट्य जाणवू लागली आणि गुरू म्हणून त्यांनी ती स्पष्टपणे बोलून ही दाखवली.गाणी गाणारे खूप जण आहेत, पण गाणी तयार करणारे कमी असतात तुझ्यात मला ते सारे गुण दिसतात असे बोलून त्यांनी संगीतकार होण्याकडे त्यांचे लक्ष वळवले व तेथूनच संगीतकार होण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला. लग्नानंतर त्यांचे पती विकास देशमुख व यांच्या घरातील सर्व मंडळींनी आनंदी विकास यांना पाठिंबा दिला .सहकार्य केले व संगीतकार होण्यासाठी प्रोत्साहन दिले. जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरी करत असताना, संगीतकार म्हणून काम करताना लागणारा वेळ ,व्यस्त वेळापत्रक यामधून ही त्यांनी कुटुंबासाठी , मुलांसाठी जतन करून ठेवलेला वेळ आपल्या मुलांचे शिक्षण, संस्कार, त्यांचे छंद तसेच करियर यासाठी कटाक्षाने दिलेला आहे . त्याकडे यत्किंचितही दुर्लक्ष होऊ दिलेले नाही. विकास देशमुख हे सुद्धा उत्तम हार्मोनियम वादक व संगीताचे जाणकार आहेत. आनंदी विकास यांच्या संगीतकार होण्याच्या प्रवासामध्ये ते एक दीपस्तंभ म्हणून मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिलेले आहेत. त्यांचा मुलगा आदित्य देशमुख यंत्र अभियांत्रिकी पदवी घेतलेला अभियंता असून तो सुद्धा साऊंड इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. त्याचा स्वतःचा मीडिया वर्क्स स्टुडिओ पुण्यामध्ये असून अनेक गाण्यांचे ध्वनी चित्रीकरण या भव्य स्टुडिओ मध्ये झालेले आहेत. स्नुषा युगा आदित्य ही कथक विशारद असून इंजिनिअर आहे. मुलगी भार्गवी देशमुख ही सुद्धा अत्यंत कमी वयामध्ये , उत्तम कथ्थक नृत्यांगना, कथ्थक संरचनाकार,(नृत्य दिग्दर्शिका) म्हणून नावारूपाला येत आहे आहे.या लेखाच्या आणि चिंबाडल्या रानी या गाण्याच्या निमित्ताने त्यांच्यातील उत्तम अशा दिगदर्शकाची व कॅमेरामन ची नवी ओळख रसिकांना झाली आहे .पुण्याच्या ललित कला केंद्रामधून बी ए सर्वप्रथम तर एम ए च्या पदव्युत्तर परीक्षेमध्ये गुरू पं रोहिणी भाटे यांच्या नावे दिले जाणारे सुवर्णपदक तिला प्राप्त झालेले आहे. तिने कथ्थक नृत्याचे प्रारंभिक शिक्षण नांदेडमध्ये रमा करजगावकर यांच्याकडे, तसेच पुढील शिक्षण नाशिकच्या कीर्ती भवाळकर व आत पुणे येथील प्रख्यात कथक नृत्य गुरु शर्वरी जमेनीस यांच्याकडे घेत आहे. नृत्य, योग व दिग्दर्शन या तिन्हींचा मिलाफ हा तिचा आवडता कलाप्रांत असून या क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची तिची इच्छा आहे व हे क्षेत्र करिअर म्हणून तिने सुरुवातीपासूनच निवडलेले आहे. हे करियर निवडत असताना भार्गवी ला आनंदी विकास व वडील विकास देशमुख यांनी कोणतेही बंधन घातलेले नसून तिला तिच्या आवडत्या या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी ची मोकळीक त्यांनी दिल्यामुळेच ती नृत्यसादरीकरण , नृत्यदिग्दर्शन यात सृजनशील व नाविन्यपूर्ण प्रयोग करत आहे. घरामध्ये गाणे जन्मापासूनच असल्याने तिला कलेचा प्रांत फार जवळून न्याहाळता आला आहे. कलेप्रति घेतलेले आईचे कष्ट , पावलोपावली संगीता विषयी दिसत आलेली आईची जिद्द तिला रोजच्या राज अनुभवता आली आहे . बालपणापासूनच असे कलात्मक संस्कार तिच्यावर घडत गेल्यामुळे करियर म्हणून ती आपसूकच या क्षेत्राकडे वळलेली आहे. आई वडिलांच्या सोबतच आता पुढील आयुष्यात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे भार्गवीचे पती अनंत कुलकर्णी व त्यांचे कुटुंब ही भार्गवी च्या कला प्रवासात नक्कीच मोलाचे आहे . IIM मधून MBA केलेले अनंत कुलकर्णी हे भार्गवीच्या रियाज, करिअर च्या बाबतीत (आनंदीबाईंच्या गोपाळरावां प्रमाणे ) तटस्थ भूमिकेत आहेत .. याचा तिला फार आनंद आहे …

आदित्य देशमुख साऊंड इंजिनिअर यांनी आजपर्यंत अनेक लघु चित्रपट व मोठ्या पडद्यावरील चित्रपटांचे ध्वनि चित्रीकरण केलेले आहे. त्याने आज पर्यंत उदाहरणार्थ नेमाडे ,फर्जंद काशिनाथ घाणेकर, बस्ता ,विकेंड या डायलिमा सह अनेक चित्रपटाचे ध्वनी , फॉली , एडिटिंग ,मास्टर मिक्स असे कार्य लिलया हाताळले आहे .

यातील 2 चित्रपटांची नोंद आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठीही झाली आहे.

तसेच ड्रेनेज, वशाट, आयन ,राजकुमार ,लालबागची राणी, महाप्रयाण, असेही एकदा व्हावे, लग्न मुबारक यासारख्या लघुपटांची निर्मिती केलेली आहे.

आनंदी विकास यांनी निर्मिती केलेल्या 64 गाण्यांचे प्रक्षेपण आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून ( महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर )तसेच परदेशामध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळ कार्यरत आहे, त्या ठिकाणी सुद्धा नियमित होत असते . अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेचे गीत, नांदेड येथील राजर्षी शाहू विद्यालय, गुरुकुल विद्यालयाचे प्रार्थना गीत , होट्टल संगीत महोत्सवाचे शिल्पगीत सुद्धा त्यांनी संगीतबद्ध केलेले आहे.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया द्वारे सादर होणाऱ्या होट्टल महोत्सव,दिवाळी पहाट सह अन्य उपक्रमांमधून , महोत्सवामधूनही त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण असतो त्या जिल्हा परिषद विभागांमार्फत घेण्यात येणाऱ्या सांस्कृतीक विभागाच्या कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असतात ,अनेक वेळा नियोजनाची सुद्धा जबाबदारी सुद्धा त्या कुशलतेने सांभाळतात. या कामांमध्ये त्यांना जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी व आजवरचे शाळा मुख्याध्यापक त्यांना सहकार्य करत असतात हे आवर्जून सांगताना त्यांना त्यांच्या कार्यालया विषयी असलेला स्वाभिमान व निष्ठा प्रकर्षाने जाणवते .

15 जानेवारी 2010 रोजी महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील महाराष्ट्र शासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते त्यातील विद्यार्थ्यांचे समुहंगान हा उपक्रम नांदेड येथे संपन्न होणार होता . त्याची संपूर्ण जबाबदारी संगीत दिगदर्शक म्हणून फार कौशल्याने यांनी पार पडली होती .25000 विद्यार्थी एका सुरात एका तालात गातात हे एक महिला उत्तम रित्या हाताळतेय तेही आपल्या नांदेड मध्ये असे महत्वपूर्ण बोल तत्कालीन सांस्कृतिक मंत्री व सध्याचे पालक मंत्री असलेले नांदेडचे भूमिपुत्र मा अशोक राव चव्हाण यांनी व्यासपीठावरून व्यक्त होत त्यांच्या स्वतः कडून विशेष सत्कार ही केला होता. हे महान कार्य त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते .

महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वांग्मयीन पुरस्कार सोहळ्यात गाणी ऋतू वेल्हाळ या त्यांच्या कार्यक्रमाचे अनेक मान्यवरांच्या समोर सादर करून त्यांनी वाहवा मिळविली आहे. अखिल भारतीय नाट्य संमेलन, बीड येथे फेब्रुवारी 2009 मध्ये निमंत्रित कार्यक्रमांमध्ये गाणी ऋतू वेल्हाळ चे सादरीकरण केले. तसेच अखिल भारतीय संगीत संमेलन परभणी 2007मध्ये गाणी ऋतू वेल्हाळ चे सादरीकरण,परभणी येथे भरलेल्या 19 व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनात फुलपाखरांचा गाव हा बालगीतांचा कार्यक्रम तसेच नांदेड येथील संगीत शंकर दरबार या महोत्सवात गीत एक आनंद चे सादरीकरण करत रसिकांना नवनिर्मितीचा आनंद त्यांनी दिला आहे. मराठवाड्यातील विविध संगीत स्पर्धा मध्ये त्या परीक्षक म्हणून त्या कार्यरत असतात. प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्या संगीत स्पर्धांचे सलग तीन वर्षे जिल्हास्तरीय परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. श्री क्षेत्र पंढरपूर, दत्त संस्थान कारंजा, अक्कलकोट ,गोंदवले, सज्जनगड , कोल्हापूर अशा नामवंत पुण्यक्षेत्री संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर संगीत मैफिलीचे कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत. मुंबई दूरदर्शन वर सह्याद्री वाहिनीच्या संगीत उपक्रमातील एम 2 जी 2 , कला डायरी , भक्तिरंग , नमस्कार मंडळी , हॅलो सखी या कार्यक्रमातून त्या रसिकांच्या भेटीला आल्या आहेत . दिल्ली ,सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे ही महाराष्ट्रीयन संगीत लावणी करिता केंद्र सरकार तर्फे त्यांना निमंत्रित म्हणून पाचारण करण्यात आले होते. ई टिव्ही वरील 75 भागाच्या भजन स्पर्धेत परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.साम टीव्ही वर गाण्यातही करियर करता येते का ? यासाठी एक तासाच्या चर्चात्मक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता त्यांच्या समवेत आनंद भाटे, कौशल इनामदार, श्रीरंग भावे, महेश हिरेमठ ,शिल्पा गुजर आदींचा सहभाग होता. झी मराठी या वृत्तवाहिनी वरून लेडीज स्पेशल कार्यक्रमातून महिला संगीतकार म्हणून त्यांची मुलाखत प्रसारित करण्यात आलेली आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनांना आज पर्यंत उत्तरा केळकर, शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर, ऋषिकेश रानडे, प्रियंका बर्वे

मुग्धा वैशंपायन ,ज्ञानेश्वर मेश्राम ,जसराज जोशी ,सौरभ दप्तरदार, प्रियंका बर्वे, सावनी रवींद्र ,आशा खाडिलकर , पं.अजित कडकडे ,मंगेश बोरगावकर, शेफाली कुलकर्णी, सुरंजन खंडाळकर,अवधूत गांधी ,अंकिता जोशी, आसावरी देगलूरकर , संदीप उबाळे , शमिका भिडे,, यांच्यासह अनेक नामवंत व नवोदित गायक, कलावंतांनी या संगीतबद्ध रचनांना स्वरसाज दिलेला आहे. अशा अनेक आशयगर्भ व चिंतनशील कवितांना आनंदी विकास यांनी संगीतसाज देऊन एका वेगळ्या उंचीवर कोंदणात नेऊन ठेवलेले आहे. नांदेड येथील ज्येष्ठ हृदय शल्यचिकित्सक व चिंतनशील कवी डॉ. व्यंकटेश काब्दे सरांच्या कवितेमध्ये बेचिराख स्वप्नां मधून आशेची नवी पालवी, सकारात्मकता, प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगण्याची उर्मी, कशी देते याबाबत लिहिलेले आहे.त्यांनी असे म्हटले आहे

पिकलेल्या पानांना 

        जगण्याचा सोस नवा !

         रुसलेल्या शब्दांना 

          गाण्याचा जोश नवा !!

 

तुझ्या व्यथेच्या कवेत  

      खडी अवसेची रात !

      एका जळत्या काठाशी 

     उभे दिवसाचे दूत !!

    राख अस्थी ची पाहून 

    उद्या हसेल निखारा !!!

    मुक्त श्वासांची शपथ

  लाव कपाळी अंगारा !!!

 

या आनंदीविकास यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावरील गीताला संगीतबद्ध करून ते मातोश्री (कलानगर मुंबई ) येथे प्रकाशित करण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झालेला आहे. आज पर्यंत त्यांनी महिला संगीतकार म्हणून पांडुरंगाच्या चरणी सलग एकवीस नवीन गाणी संगीतबद्ध करून आपली सेवा अर्पण केलेली आहे ख्यातनाम गायक अजित कडकडे रेकॉर्डिंगच्या वेळी म्हणाले होते की, ” असे भाग्य सर्वांना लाभत नाही .आम्ही एक गाणं गायला मिळालं, तर आम्ही खूप धन्य समजतो ! …… पण आनंदी विकास यांनी तर सलग एकवीस गाणी रेकॉर्ड केली आहेत! काय गमक आहे तुमचे आणि पांडुरंगाचे ? ….. माझं उत्तर , ” कर्ता-करविता तोच आहे. त्यांनेच करून घेतलं .मी कोण करणारी ? ….. ही सर्व गाणी संजीव कोकीळ मुंबई, दिलीप पंडित मुंबई ,राजेंद्र आत्रे उस्मानाबाद, डॉ. व्यंकटेश काब्दे, नांदेड आणि डॉ. दासू वैद्य, औरंगाबाद यांनी लिहिलेली आहेत. लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथे त्यांचा संगीत रचनांचा बहारदार कार्यक्रम 11 सप्टेंबर 2019 ला पार पडला. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेविक डॉ प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत दादा आमटे, डॉ दिगंत दादा आमटे, डॉ. समीक्षा आमटे आदी मान्यवर उपस्थित होते.

हीच संगीतसेवा त्यांनी आनंदवन येथेही माँ विकास आमटे , डॉ भारती आमटे, व तेथील सर्व रसिकांसाठी केली आहे .

काही दिवसांपुर्वी आषाढी एकादशी चे औचित्य साधून आनंदी विकास व भार्गवी या दोघींनी मिळून ,”चिंबाडल्या रानी ….. “हा नृत्य, रांगोळी, शिल्पकला यांचा मिलाफ सुंदर पद्धतीने करून एक नाविन्यपूर्ण संगीत व्हिडिओ तयार केल्यानंतर महाराष्ट्रातील ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी त्याबाबत दिलेल्या बोलक्या प्रतिक्रिया- चिंबाडल्या रानी. ……… मस्त फोक पद्धतीचं गाणं असल्याने त्याची वाद्ये, त्याचा ठेका, त्यातला कोरस …… गायकी,…… त्याचा व्हिडिओ ! सर्वच बहारदार वाटलं‌……. तुमचं प्रत्येक गाणं नेहमीच वेगळं असतं. म्हणून ते मला आवडतं. मनाला भावतं….

अशोक पत्की यांनी आनंदीविकास यांची अनेक गाणी ऐकली व ऐकत असून ते त्यांच्या प्रत्येक गाण्यांवर कधी शाबासकीची थाप तर कधी भरभरून कौतुक तर कधी मार्गदर्शन या नुसार बोलत असतात ..

आनंदीताई बोलताना म्हणतात की अशोक काका मला माझ्या कार्यासाठी फार महत्वाचे व दिशादर्शक आहेत . ज्येष्ठ साहित्यिक ना धो महानोर यांच्या सुद्धा त्या निर्मितीबद्दल च्या प्रतिक्रिया खूप बोलक्या आहेत. गाणी ऋतुवेल्हाळ संबंधी नाट्य सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आदरणीय प्रभाकर पणशीकर यांनी सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वांगमयीन पुरस्कार सोहळ्यातील सादरिकरणानंतर स्वतः विंगेमध्ये येऊन कौतुक केले. एक स्त्री एवढी निर्मिती करू शकते म्हणून शाबासकी दिली. तसेच त्यांच्या हातावर सही दिली व भार्गवी ला मांडीवर घेऊन तिचेही कौतुक केले होते हा क्षण आनंदी विकास यांच्यासाठी खुप अवर्णनीय व लाख मोलाचा आहे! आज पर्यंतच्या त्यांच्या सांगितिक प्रवासामध्ये 2004 मध्ये जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने दिला जाणारा संगीत रत्न पुरस्कार (सुवर्णपदक सन्मानपत्र व रोख रक्कम ) त्यांना मिळालेला आहे .गांधर्व महाविद्यालय मुंबई तर्फे 2000 सालचा ग्रामीण भागातील उत्कृष्ट संगीत कार्य करणाऱ्या संगीतकारांना दिला जाणारा गांधर्व विशेष संगीत पुरस्कार त्यांना देऊन गौरविण्यात आलेले आहे.

नाशिक येथील राजमाता सन्मान पुरस्कार, कोल्हापूर, इचलकरंजी येथील एकता मित्र मंडळ व पत्रकार मित्र मंडळाच्या वतीने महिला संगीतकार म्हणून संगीत रत्न हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. 2012 मध्ये नागपूर येथील पत्रकार संघाचा महिला भूषण पुरस्कार ,तसेच 2014 मध्ये महिला दिनाच्या निमित्ताने दिला जाणारा नांदेड येथील प्रतिष्ठित समजला जाणारा स्व. कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे. पुरस्कारांची मांदियाळी त्यांच्याकडे खूप आहे. पण त्याचा उल्लेख सुद्धा त्यांनी केलेला नाही. भूतकाळातील कामगिरीपेक्षा त्यांना वर्तमान व भविष्यकाळ महत्त्वाचा वाटतो हे त्यांनी बोलताना अधोरेखित केल्यामुळे पुरस्कारांचा विषय सहाजिकच टाळला.

मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या एखाद्या गाण्याची चाल तुम्हाला कशी सुचते असा प्रश्न विचारला असता, त्या सहज उत्तर देतात, ” घरा मध्ये तसेच समाजामध्ये वावरताना गाण्या बद्दलचा विचार प्रक्रिया सतत चालू असते. त्यातूनच एखादी चाल सुचते व त्यातून गाणे तयार होते. स्वयंपाक घरात स्वयंपाक करत असताना किंवा निवांत क्षणी बसल्यावर सुद्धा एखादी चाल चटकन सुचून जाते.बालवयात सातत्याने बाबांच्या पंचपदीचा व आध्यात्मिक वातावरणाचा संस्कार , उत्तम काव्यही कधी नाद लय घेऊनच निर्माण होत यामधूनही नवीन चाली मिळतात. यासाठी सतत मनामध्ये चिंतन-मनन, समृद्ध वाचन व निरीक्षण याची आवश्यकता असते. मागील दीड वर्षापासून महाराष्ट्रावर कोरोनाचे प्रलयंकारी महासंकट आहे. त्यामुळे आषाढी वारी व कार्तिकी वारी होत नसून दरवर्षी होणारे आषाढी वारीच्या निमित्ताने निघणाऱ्या दिंड्या , हातामध्ये भागवत धर्माची वारकरी संप्रदायाची भगवी पताका घेऊन पायी निघणारे माऊली भक्त, टाळ -मृदंगा च्या निनादा मध्ये आकंठ बुडालेले वारकरी, भाविक, महिला हे चित्र महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षांपासून दिसत नाही. त्यामुळे सर्व काही सुनेसुने वाटत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रसिकांना पंढरीच्या वारीची अनुभूती गाण्याच्या माध्यमातून यावी. या हेतूने त्यांनी या वर्षी ही निर्मिती केलेली आहे. ” चिंबाडल्या रानी ….. विठ्ठलाचा लळा ” साहित्य अकादमी प्राप्त जळगाव येथील कवी आबा महाजन यांच्या लेखणीतून हे काव्य साकारले आहे ,या गाण्याची निर्मिती आनंदीविकास यांनी नांदेड येथील स्थानिक तंत्रज्ञांना व कलाकारांना एकत्र करून केलेली आहे. हे विशेषत्वाने सांगावेसे वाटते. नांदेड सारख्या ग्रामीण बाज असलेल्या, पण तुलनेने मोठ्या असलेल्या शहरांमध्ये संगीत रेकॉर्डिंगच्या सोयीसुविधा म्हणाव्या तेवढ्या अद्ययावत प्रमाणामध्ये उपलब्ध नसताना देखील केवळ कल्पकता व सूक्ष्म नियोजन याच्या आधारे हा सुंदर व्हिडीओ चित्रीत करण्यात आलेला आहे.

नांदेड येथील दिगदर्शक भार्गवी देशमुख , मूर्तिकार व्यंकट पाटील , प्रमोद देशपांडे ,विकास देशमुख स्वरेश देशपांडे व गायक व अभिनय केलेले आनंदी विकास यांचे शिष्य विश्वास आंबेकर, महेश जैन , वादक म्हणून राज लांबटीळे , संतोष देशमुख , आदित्य डावरे ,बाल कलावंत विराज अंबेकर , मयूर भोजगंडे आणि मालेगाव भजनी मंडळ या सर्वांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर रियालिटी शोचे जे प्रयोग होतात, त्यामधून जुन्या गायकांची प्रसिद्ध गाणी गायली जातात .त्याऐवजी कसदार गायन ,नवीन गाणे ,नवा विचार, नवीन संगीत रचना युवा , बाल कलाकाराकडून आल्या पाहिजेत. त्याचा निश्चितच फायदा त्यांना पुढे होऊ शकतो .असे मत त्यांनी व्यक्त केले.संगीतकार म्हणून करिअर करण्यासाठी या क्षेत्रांमध्ये महिलांना व युवकांना विशेष वाव आहे .संगीत क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी साधना, चिंतन व मनन यांची आवश्यकता असते. तुमचे कामच तुम्हाला योग्य रस्ता दाखवते व त्यातूनच पुढे योग्य मार्ग मिळतो. संगीतकार होऊ इच्छिणाऱ्यांनी भूतकाळात दिग्गजांनी करून ठेवलेल्या कामाचा अभ्यास करत ‘उद्या ‘लक्षात ठेवायचा.

नवनिर्मितीच्या हळुवार आठवणी, प्रेरणा ,उर्मी ,स्त्रोत मनामध्ये सांगावयाच्या राहून गेलेल्या आठवणी…….. सारं काही एक दीड तासांच्या गप्पांच्या मैफली मध्ये सहज बोलता बोलता त्यांनी उलगडून दाखवलं. सांगताना कुठे अहंकाराचा दर्प यत्किंचितही दिसत नव्हता . निर्भीड ,बाणेदार वृत्ती, स्पष्टवक्तेपणा शब्दाशब्दातून दिसत होता.अंत:करणांमध्ये फक्त होती सावळ्या विठ्ठलाची भक्ती ,पसायदान मागणाऱ्या ज्ञानदेवांची अनुभूती,…… संगीत क्षेत्रातील एका कलासक्त, स्वरयात्री चा हा प्रवास शब्दांमध्ये गुंफण्यात एक दीड तासांचा कालावधी कसा गेला हे कळलेच नाही. ” “चिंबाडल्या रानी ….. विठ्ठलाचा लळा ” हे विठ्ठलाचं गीत मात्र आषाढमासी मनामध्ये गुंजत होतं..

 *प्रा.संतोष कुलकर्णी ,नांदेड*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here