19.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*पंढरपूर महाद्वार काला…*

*पंढरपूर महाद्वार काला…*


ज्यांच्या डोक्यावर पांडुरंगाच्या पादुका असतात त्यांची शुध्द हरपते, म्हणून त्या पादुका डोक्यावर बांधलेल्या असतात बघा.
त्या पादुकांचेच सामर्थ्य आहे की त्यांची समाधी लागते.

पंढरपूरचा महाव्दार काला…

पंढरपूर- जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा

या संत वचना प्रमाणे हरिदास घराण्यात जन्म घेणे म्हणजे अनेक जन्माचे पुण्य फलास येणे यावर आमची श्रध्दा आहे. कारण भगवान विठूरायाच्या सात सेवाधार्‍या पैकी हरिदास हे एक सेवाधारी. मंदिरात देवा समोर अभंग गायन करणे, किर्तन करणे, आरती म्हणणे, टाळ वाजविणे अशी सेवा हरिदास घराण्याकडे शेकडो वर्षापासून आहे. जन्मताच साक्षात विठ्ठलाच्या समोरच सेवा करण्याचे भाग्य या घराण्यातील वंशजांना मिळाले यामुळे हरिदास घराण्यात जन्म म्हणजे मुक्तीचे व्दार हे निश्‍चित.

या हरिदास घराण्यात तीन संत होवून गेले. एक रामा हरिदास जे माहुरच्या रेणुका देवीचे मोठे भक्त होते. आपल्या भक्तीच्या जोरावरच त्यांनी साक्षात रेणुका मातेला माहुरहून पंढरीत प्रगट होण्यास भाग पाडले. आज देखील आठशे वर्षा पासून येथे या देवीचे जागृत स्थान आहे. दुसरे संत कान्हैया हरिदास होवून गेले. विठ्ठल भक्त असणार्‍या कान्हैया हरिदास यांनी पांडुरंगाची काकडा आरती रचली. आज देखील पहाटे देवाला अनुपम्य नगर पंढरपूर ही आरती गायन करूनच उठविले जाते. तर तिसरे संत पांडुरंग महाराज.

पांडुरंग महाराज यांनीच आपल्या भक्तीच्या जोरावर विठूरायाला प्रसन्न करून त्यांच्या खडावा प्रसाद म्हणून प्राप्त केल्या. या खडावा मस्तकी धारण करून महाव्दार काला साजरा केला जातो. कलियुगातील एक चमत्कार म्हणूनच याकडे पहावे लागेल.

पांडुरंग महाराज हे बालपणापासूनच विठ्ठल भक्तीत रममाण झाले होते. दररोज त्रिकाल स्नान म्हणजे सकाळी, दुपारी व सायंकाळी चंद्रभागेवर जावून स्नान करावे, विठूरायाच्या मंदिरात भागवत वाचन व गायन सेवा करावी अशी त्यांची दिनचर्या होती. बाल वयातच विठ्ठल दर्शनाची आस लागल्यामुळे ते सतत देवाचे स्मरण करीत असत. अशी सेवा करीत करीत महाराजांनी वयाची सत्तरी गाठली. या वयात देखील आपल्या नित्यकर्मात त्यांचा खंड पडत नसे. यामुळेच ऐन वैशाष महिन्यात उन्हाचा कहर असताना नित्यनेमा प्रमाणे दुपारी बारा वाजता ते चंद्रभागेच्या स्नास निघाले होते. सूर्य अंगाची लाही करीत होता, तर वाळवंटातील वाळू देखील तप्त झाली होती. यामुळे वृध्द झालेल्या पांडुरंग महाराज यांच्या शरीराला हा दाह सहन झाला नाही व ते वाळवंटात बेशुध्द पडले. यावेळी दयाघन विठूरायाने बेशुध्द असलेल्या पांडुरंग महाराज यांच्या नजिक लाकडी खडावा ठेवल्या. महाराज शुध्दीवर आल्यावर त्यांना या खडावा दिसल्या. परंतु चारशे वर्षापूर्वीचा काळ व कडक उन्हाळ्यामुळे संपूर्ण वाळवंटात एक ही व्यक्ती दिसत नव्हती. यामुळे महाराजांनी ही पांडुरंगाची लीला असल्याचे ओळखले. मात्र मनोमन प्रार्थना केली की जो पर्यंत प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन होत नाही तो पर्यंत प्राण गेले तरी येथून हालणार नाही. भक्ताच्या या निश्‍चयामुळे व जन्मोजन्मीच्या पुण्याईमुळे प्रत्यक्ष भगवंताने महाराजांना दर्शन दिले. यावेळी देवाने आपल्या खडावा पांडुरंग महाराजांना प्रसाद म्हणून देत, आषाढी व कार्तिकीस या डोक्यावर धारण करून काल्याचा उत्सव करण्याची आज्ञा दिली. प्रत्येक युगात देवाने आपल्या खडावा लाडक्या भक्तास दिल्या आहेत. त्रेता युगात श्रीरामाने भरताला, व्दापार युगात श्रीकृष्णाने उध्दवाला तर कलियुगात हा प्रसाद पांडुरंग महाराज यांना दिला. तसेच पिढ्यान पिढ्या हा उत्सव साजरा करण्याचा आशीर्वाद देखील दिला.

या पादुका मस्तकावर ठेवताच भगवंत अंतरंगात प्रवेश करून भक्तांना देहाव्दारे दर्शन देतो. यामुळे आषाढ व कार्तिक शुध्द प्रतिपदेस महाव्दार काला करण्याची परंपरा चारशे वर्षा पासून अखंड सुरू आहे.

काल्या दिवशी या पादुका काल्याचे मानकरी असणार्‍या हरिदास घराण्यातील महाराजांच्या मस्तकावर शंभर फुटी पागोट्याने बांधल्या जातात. पादुका महाराजांच्या मस्तकावर ठेवताच समाधी अवस्था प्राप्त होती. यावेळी संत नामदेव महाराजांच्या वंशजांना मोठा मान आहे. नामदास महाराज यांची दिंडी दाखल झाल्यावरच काल्याचा उत्सव सुरू होतो. पादुका धारण करणार्‍या महाराजांना समाधी अवस्था प्राप्त झाल्याने नामदास त्यांना खांद्यावर घेवूनच श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील सभामंडपात पाच प्रदक्षिणा मारल्या जातात. या नंतर काल्याचा अभंग म्हणून दही हांडी फोडली जाते. मंदिरातून महाराजांना खांद्यावरच घेवून महाव्दार घाटावरून चंद्रभागेच्या वाळवंटात नदीचे पाणी अर्पण केले जाते. पुढे कुंभार घाटावरून माहेश्‍वरी धर्मशाळेत हांडी फोडून आराध्ये गल्ली, हरिदास वेस या मार्गाने हा उत्सव पुन्हा काल्याच्या वाड्यात दाखल होतो. येथे महाराजांच्या मस्तकावरून पादुका काढल्यावर विठू नामाचा गजर होतो व ते समाधी अवस्थेतून बाहेर येतात.

या नंतर हजारो भक्तांना काल्याचा प्रसाद वाटला जातो. काल्याचा उत्सव रस्त्यावरून जाताना कुंकू, बुक्का, लाह्या, दही, दूध आदींची उधळण केली जाते. सध्या या गादीवर मदन महाराजा हरिदास हे असून त्यांची ही दहावी पिढी आहे.

प्रत्यक्ष भगवंताच्या खडावा धारण करूनच हा उत्सव साजरा होत असल्याने भक्तांसाठी हा खर्‍या अर्थान सुख सोहळा अनुभवास येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]