मानवी जीवनात धर्मसंस्कार , अध्यात्म विचारांचे महत्व
अनन्यसाधारण असे आहे : गहिनीनाथ महाराज
अँड. मनोहरराव गोमारे साहित्य नगरी, लातूर 🙁 वृत्तसेवा )- मानवी जीवनात धर्मसंस्कार , अध्यात्म विचारांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन हभप. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीने लातुरात आयोजित करण्यात आलेल्या नवव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप गुरुवारी सायंकाळी झाला. या समारोप सत्रास पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप. गहिनीनाथ महाराज औसेकर , उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, संमेलनाध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे, आ. बाबासाहेब पाटील, प्रा. शिवराज मोटेगावकर, उद्योजक तुकाराम पाटील, साहित्य संमेलनाचे संयोजक कालिदासराव माने, शिवाजीराव साखरे, फ. म . शहाजिंदे, योगीराज माने,अशोक देडे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
या सत्रात गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते प्रा. शिवराज मोटेगावकर यांना लोकनेते विलासराव देशमुख शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उद्योगरत्न पुरस्कार द्वारकादास श्यामकुमारचे तुकाराम पाटील, ज्ञानरत्न पुरस्कार सौ. सरिता चोखोबा किर्ते – उबाळे , रामलिंग मुळे यांना , उत्कृष्ट प्रशासकरत्न पुरस्काराने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – गुज याना सन्मानित करण्यात आले. त्यांच्यावतीने हा पुरस्कार उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी स्वीकारला. उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार अनिल गायकवाड यांच्या वतीने प्रवीण अंबुलगेकर यांनी स्वीकारला. मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने स्व. ज्ञानेश्वर ठाकरे यांना गौरविण्यात आले. हा पुरस्कार ठाकरे श्रीमती वंदना ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला. यावेळी राज्यभरातील अनेक शिक्षकांना ज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कालिदासराव माने यांच्या ६१ चे औचित्य साधून संयोजन समितीच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षक सारथी या गौरव ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले.
यावेळी आपल्या आशिर्वचनात हभप. गहिनीनाथ महाराजांनी शिक्षणाचे महत्व अत्यंत मुद्देसुदरीत्या समजावून सांगितले. मानवाचे अशिक्षित, शिक्षित आणि सुशिक्षित असे तीन प्रकार असल्याचे सांगून या तिन्ही प्रकारांचे महत्व त्यांनी अत्यंत सहज – सोप्या भाषेत विशद केले. मनुष्य केवळ शालेय शिक्षणानेच सुसंस्कारित होतो असे नाही तर सुसंस्काराला अध्यात्म, धर्म संस्काराची जोड आवश्यक असते. अध्यात्माच्या विचाराची बैठक असल्याशिवाय मानव जन्माला फारसा अर्थ उरत नाही. या संमेलनाचे संयोजक कालिदास माने हे अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळींच्या सहवासात वावरताना दिसतात. त्यामुळे एका चांगल्या कार्यक्रमास उपस्थिती लावल्याचे समाधान आपल्याला असल्याचे गहिनीनाथ महाराजांनी सांगितले. आ. बाबासाहेब पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना एका चांगल्या साहित्य संमेलनास उपस्थित राहण्याची संधी आपल्याला कालिदास माने यांनी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कालिदास माने यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी या साहित्य संमेलनाच्या आयोजनामागची आपली भूमिका विशद केली. पुरस्कार विजेत्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात तुकाराम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केले. साहित्य संमेलनास राज्यभरातून मोठ्या संख्येने शिक्षकवृंद उपस्थित होते.
————————–