प्रभु श्रीरामाचा परमस्नेही निषादराज – निरूपणकार घळसासी
सोलापूर,(प्रतिनिधी):- मैत्रीतून स्नेह जपणारे प्रभु श्रीराम आणि निषादराज यांच्यामध्ये अदभुत प्रेम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या वतीने आयोजित पुना गाडगीळ प्रायोजित दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणीच्या पहिल्या दिवशी ते बोलत होते. लोकमान्य टिळक सभागृह (अॅम्फी थिएटर) मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ जयेश दर्बी कले्नशनचे गिरीष दर्बी यांच्या हस्ते करण्यात आला.
रामायण काळात प्रभु श्रीरामाच्या आधी निषादराज यांचा राज्याभिषेक झाला त्यानंतरच श्री रामाचा आयोध्येत राज्याभिषेक झाला. यावरूनच प्रभु श्रीरामाने आपली मैत्री निषादराज गुहा याच्याशी स्नेहपूर्ण कशी केली आणि त्यांची मैत्री टोकाच्या समर्पणाला कशी जाते याचाच प्रत्यय येतो. मैत्री शिवाय मार्ग नाही शब्दाचे मोल पाळणे हेच आध्यात्म आहे. रामचरित मानस हा सर्वश्रेष्ठ अलंकार आहे. प्रत्येकाने आपल्या घरात रामचरित मानस ठेवलाच पाहिजे ज्या घरात रामचरित मानस आहे त्या घरात सुख शांतता नांदते. प्रभु श्रीराम वनसावाला जाताना निषादराज गुहा यांची भेट होते त्या भेटीचे रूपांतर मैत्री आणि स्नेहात होते. त्यातूनच भरत शत्रुघ्न यांना निषादराज यांच्या रूपात लक्ष्मण दिसतात तर भरतच्या रूपात निषादराज यांना प्रभु श्रीराम दिसतात असा अनोखा स्नेह निर्माण होतो. साधा भक्तही भगवंताला मार्ग कसा दाखवतो हेच निषादराज यांच्यामधून दिसून येते.
प्रभु श्रीराम स्नेही निषादराज या विषयावर आपल्या रसाळवाणीतून ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी राम आणि निषादराज यांच्या भेटीतील सान्निध्यातील प्रसंगाचे विवेचन केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या वतीने तीन दिवस विवेकाची अमृतवाणीचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या पहिल्या दिवशीच सकाळी 6. 25 वा. रसिक श्रोत्यांनी अॅम्फी थिएटर भरून गेले होते. प्रारंभी जयेश दर्बी कले्नशनचे गिरीष दर्बी यांच्या हस्ते विवेकजी घळसासी यांना पुष्पहार घालून अमृतवाणीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर, हास्यसम्राट प्रा.दिपक देशपांडे, कार्यवाह प्रशांत बडवे, अमोल धाबळे, गुरू वठारे, पुना गाडगीळचे जितेंद्र जोशी, अविनाश महागांवकर, शहाजी पवार, सुयश गुरूकुलचे केशव शिंदे, आर्यन क्रिएशनचे विनायक होटकर आदी उपस्थित होते. विवेकाची अमृतवाणीच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दि. 4 नोव्हेंबर रोजी श्रीराम सेवक असलेल्या केवट यांच्यावर विवेचन होणार आहे.
….. फोटो: नागेश दंतकाळे……..…………
–