28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeसाहित्य*दिल्लीतील बृहन्महाराष्ट्र मंडळात गोव्याच्या कवीचे कविसंमेलन*

*दिल्लीतील बृहन्महाराष्ट्र मंडळात गोव्याच्या कवीचे कविसंमेलन*

पणजी,दि.३०(सां.प्र.)
ओठात शब्द होते तेही न बोललो मी कळले तुला न काही इतकेच बोललो मी …,मी पाहिलंय अश्रूंना मला सामावून घेतांना आणि पानातील थेंबाना नभाला आश्रा देतांना.. अशा रचनांनी ज्येष्ठ कवी माधव सटवाणी यांनी बृहन महाराष्ट्र मंडळ (मध्यवर्ती संघटना), दिल्ली येथे शनिवारी झालेल्या कविसंमेलनात उपस्थित कविमंडळी आणि रसिकांना प्रभावित केले.
गोव्यातील मराठी कवी कवयित्रींचे कविसंमेलन पहाडगंज दिल्ली येथील बृहन महाराष्ट्र मंडळात आयोजित केले होते त्याचे अध्यक्षपद
सटवाणी यांनी भूषविले होते. नागपूर येथील प्रसिद्ध लेखिका तथा कवयित्री प्रा. विजया मारोतकर सहअध्यक्षा म्हणून तर इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा, पणजी या संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी दशरथ परब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सहभागी कवींच्या कवितांवर प्रा. मारोतकर यांनी नेमकेपणाने भाष्य करतांना सुसंगत अशा कवितेच्या ओळी पेरून

कविसंमेलनाची रंगत वाढवली.

नवरसांचा आविष्कार कवितेतून घडतो

सगळे नऊही रस कवितेतून मांडता येतात. भावना आणि विचार यातून कविता आकार घेत असते. काव्य हा हृदयाशी संबंधित वाङ्मय प्रकार आहे.
कवितेचे सौंदर्याशी जवळचे नाते आहे.

—-माधव सटवाणी

उन्मेशाचे नवे वारे नव्या दिशांना

या ओळींनी विजया मारोतकर यांनी
नवचेतनेचा संदेश दिला. त्याने पाहिले राधेच्या डोळ्यात मनात तनात प्रतिबिंब बासरीचे… या दीपा मिरिंगकर यांच्या सुरेख ओळी राधा कृष्णाच्या अकृत्रिम प्रेमाचे दर्शन घडविणाऱ्या होत्या.वळण बांध सखी पाणी यायच्या आधी… या पोर्णिमा केरकर यांच्या ओळी अंतर्मुख करून गेल्या.
‘मुलं आणि मी’ ही चित्रा क्षीरसागर यांची वास्तवदर्शी कविता दाद घेऊन गेली.दशरथ परब यांनी, ती दिवा लावते आत राहुनी दुसऱ्या देशी.. या ओळींनी मने जिंकली.
झाडं आणि मुली वयात आल्यावर माणसांच्या नजरा कशा वखवखतात, यावर प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांनी आपल्या माणसांची खैर नाही या कवितेतून नेमकेपणाने भाष्य केले. शुभदा च्यारी यांच्या, ‘पुन्हा नव्याने’ या कवितेतील व समृद्धी केरकर हिच्या, “फुलाला माहित असतं अवघं दोन किंवा झालंच तर चार दिवसांचे त्यांचे जीवन असतं.. या ओळीतील आशय लक्षवेधी होता.
आसावरी कुलकर्णी यांच्या,”दोन तटांवर दोघे आपण नदी वाहते खोल निरंतर ..” या ओळी रसिकांना थेट भिडल्या. रजनी रायकर यांनी,”एक जन्म स्त्रीचा पूर्ण संसार तारते..” या ओळीतून स्त्रीची महती छान अधोरेखित केली.
माझ्या दुःखात सुख शोधताना मी पाहिले तिला.. या आईवरील कवितेने
शर्मिला प्रभू यांनी आईचे अकृत्रिम,निर्मळ प्रेम नेमकेपणाने आविष्कृत केले. कालिका बापट यांनी, “राधेच्या रंगात रंगला सावळा श्रीरंग..” ही आपली रसिली कविता
गाऊन दाद घेतली. ‘थट्टा लोकशाहीची’ या मार्मिक कवितेतून नितीन कोरगावकर यांनी आजच्या स्वार्थी राजकीय स्थितीवर कोरडे ओढले व त्यांना उस्फूर्त प्रतिसादही लाभला.
बृहन महाराष्ट्र मंडळ, दिल्लीचे प्रबंधक येनुरकर यांनी स्वागत केले.
यावेळी ज्ञानेश्वर भेलकर, ऍड. तुषार भेलकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रकाश क्षीरसागर यांनी आभार मानले. चित्रा क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून उत्तम कामगिरी बजावली याबद्दल सर्वांनी त्यांना दुवा दिला.*

फोटो ओळी: नवी दिल्लीतील बृहन महाराष्ट्र मंडळात कविता सादर करताना माधव साटवाणी सोबत प्रकाश क्षीरसागर, उदय येनुरकर,विजया मारोतकर व दशरथ परब.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]