इचलकरंजी ता. १५ सप्टेंबरः भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ‘इनोव्हेशन कौन्सिल’ व एआयसीटीई, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने चेन्नई येथे आयोजित ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२२’ या स्पर्धेमध्ये डीकेटीईचा ‘टीम अल्फा’ हा संघ देशामध्ये अव्वल ठरला व एक लाख रुपयाचे बक्षिस देवून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून झाले आणि ही देशातील सर्वात मोठी स्पर्धा होती.
‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२२’ या स्पर्धेमध्ये देशभरातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, भारत सरकार यांच्या मार्फत देण्यात आलेल्या विषयावर विद्यार्थ्यांनी आधुनिक संकल्पनेव्दारे त्यांच्या कल्पना शक्तीला वाव देत समाजोपयोगी प्रकल्प पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. भारतातून आलेल्या अर्जामधून एकूण १५० हून अधिक टीम्स यासाठी पात्र झाले होते. त्यानंतर प्रत्यक्षात चेन्नई येथे ग्रँड फायनल मध्ये निवडक उत्कृष्ट टीमची निवड झाली होती. ही स्पर्धा सॉफ्टवेअर व हार्डवेअर या दोन विभागामध्ये आयोजित करण्यात आली होती. हार्डवेअर विभागामध्ये तब्बल १२० तास ही स्पर्धा सुरु होती. त्यामध्ये बी.टेक. इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग मध्ये शिकत असलेले साबीर सजदे, प्रणव चौगुले, अभिषेक मोहिते, श्रध्दा पाटील, प्राजक्ता पवार व बी.टेक.मेकॅनिकल इंजिनिअरींग मधील प्रथमेश अरबळी या विद्यार्थ्यांच्या ‘टीम अल्फा’ ने घवघवीत यश मिळवत भारतातून प्रथम येण्याचा मान पटकावला. सदर विद्यार्थ्यांना डीकेटीईतील इलेक्ट्रीकल विभागाचे प्रमुख व डीन डॉ.आर.एन. पाटील व प्रा. ए.ए. मालगावे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
या विद्यार्थ्यांनी ‘सोलार पॅनेल विथ सोलार ट्रॅकींग डिव्हाईस विदाउट पॉवर कन्झंम्शन’ या विषयावर परीक्षकांच्या देखरेखीखाली प्रकल्पाची मांडणी केली. पारंपारिक पध्दतीमध्ये सुर्याच्या किरणाबरोबर सोलार पॅनेल फिरवण्यासाठी विद्युत उर्जेची गरज असते. विद्यार्थ्यांनी आधुनिक पध्दतीने डिझाईन केलेल्या प्रकल्पामध्ये कोणतीही उर्जा न वापरता सायफन टेक्नॉलॉजी व वेट बॅलन्सच्या आधारे सुर्य किरणांबरोबर सोलार पॅनेल फिरविता येते हे सिध्द केले. त्यामुळे उर्जा बचत झाली व पर्यायी सामान्य व्यक्तीला परवडेल अशा प्रकारचे सोलार पॅनेल बनवण्यामध्ये या विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांना या प्रकल्पासाठी डिझाईन पेटेंट देखील मंजूर झाले आहे. या सर्वांची केंद्रीय मंत्री सुभाष सरकार यांनी देखील दखल घेतली आणि गौरवोद्गार काढले.
अशा प्रकारे देशातील सहभागी झालेल्या सर्व टीम्स मध्ये डीकेटीईची टीम अल्फा अव्वल ठरली. एआयसीटीईचे पदाधिकारी व एसआरएम चेन्नईचे डायरेक्टर यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना एक लाख रुपयाचे बक्षिस व प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. डीकेटीई मध्ये सर्व सोयींनी युक्त असलेली आयडीया लॅब व इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅबोरेटरीज येथे प्रत्यक्षात प्रात्यक्षिकाव्दारे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते त्यामुळेच ती देशभरात चमकतात. या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांचा सत्कार डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे यांनी केला तसेच संस्थेचे सर्व ट्रस्टी तसेच इन्स्टिटयूटचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही.कडोले, संचालक प्रा.डॉ.यु.जे.पाटील, उपसंचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळी चेन्नाई येथे झालेल्या हॅकॅथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस स्विकारताना डीकेटीईची टीम अल्फा