पत्रकारांना मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघासह जिल्हा पत्रकार संघाने केला काळ्या फिती लावुन निषेध
ठाणे,दि.११ : ( वृत्तसेवा ) —पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. या मागणीसाठी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ व ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर काळ्या फिती लावुन निषेध केला. या हल्ल्याचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत असून या हल्यामागील राजकिय व्यक्तींना तत्काळ अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या माध्यमातुन सरकारकडे केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी दिलेल्या बातमीचा राग धरून शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना काही दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. त्यानंतर वृत्तांकन करून परतताना चार ते पाच जणांच्या टोळक्याने भर चौकात महाजन यांच्यावर हल्ला केला. पत्रकारावरील या हल्याचे पडसाद राज्यभर उमटत असुन विविध पत्रकार संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. तर शुक्रवारी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ व ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर काळ्या फिती लावुन निषेध नोंदवण्यात आला.

यावेळी पत्रकारांनी घोषणाबाजी करीत पत्रकार संरक्षण कायद्यानुसार हल्लेखोरांना अटक करून कठोर कारवाईची मागणी केली. तसेच, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना निवेदन दिले. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शेकडोच्या संख्येने पत्रकार बांधव सहभागी झाले होते.