वर्ल्ड कप -2023
ह्या विश्व चषक स्पर्धेत एकदा तरी असं काहीतरी करून निर्विवाद जिंकावं, असं फार वाटत होतं … ! … हे मी परवाच एकदा लिहिलंही होतं.
विराट, शुभमन, नवोन्मेषी पुनरागमनी श्रेयस, शमी, सिराज, यांचे दमदार खेळ; रोहितचे आक्रमक कल्पक नेतृत्व, उत्तम संघसमन्वय, संघभावना, एरवी आजवर फार कमी वेळा दिसून आलेली यापूर्वी भारतीय संघात सकारात्मक आणि प्रसंगी कठोर वाटण्याइतपत व्यावसायिकतेची चुणूक दाखवणारी निपुणता, तसेच आक्रमक क्षेत्ररक्षण व प्रतिस्पर्धी संघाच्या काळजाला भेदणारा व्यूह … ह्यातून साकारलेला निर्विवाद विजय … चक्क ३०२ धावांनी केलेली मात … ! हे सगळे डोळ्याचे पारणे फेडणारे होते … ऊर भरून आणणारे होते … !
सूडबुद्धीनं नव्हे, पण कुठल्यातरी वैषम्यभावानं माझ्या डोक्यात बसलेला श्रीलंकेचा क्रिकेट संघ आहे … श्रीलंकेच्या संघानं आजवर अनेकदा अत्यंत खालच्या थराला जावून भारताविरुद्ध क्रिकेट खेळले आहे, याची मला हटकून आठवण येते, त्यामुळे ह्या संघाला एरवीही भारतीय संघाने हरवले की मला वेगळाच आनंद होतो.
ह्या संघाने अनेकवेळा कसोटी सामन्यांत रडीचे खेळ, विशेषतः भारताविरुद्ध खेळून आपली लपवता न येणारी द्वेषभावना दाखवलेली आहे … अकारण बुटाचे बंद बांधण्यासारख्या बालिश क्लृप्त्यांनी वेळ घालवत उशीर करून अपुऱ्या प्रकाशाचे कारण दाखवून सामने अनिर्णीत ठेवणे, खेळभावना व संकेत मोडून ९०० हून अधिक धावसंख्या करत सगळे पाचही दिवस एकतर्फी फलंदाजी करून भारतीय गोलंदाज व क्षेत्ररक्षक वेठबिगार असल्याप्रमाणे खेळवत राहणे, सामना जिंकण्याचा आनंद मिळू नये यासाठी नोबाॕल वगैरे टाकून (नाक कापून अपशकून करण्यासारखे) असले अनेक प्रताप भारताविरुद्ध श्रीलंकेने केले आहेत. सभ्यांच्या खेळातले हे संभावित प्रमाद निर्लज्जपणे केले आहेत. एकदा तर केवळ बाद ठरवल्याचा राग व्यक्त करण्यासाठी, पंच असलेल्या वेंकट राघवनकडे डोळे रोखून एकटक बघत विरुद्ध दिशेने तंबूत परतण्याचा निर्लज्ज निषेध कुमार संगकाराने केला होता. अशा अनेक गोष्टी मला आठवतात … तेव्हापासून या संघाला भारतीय संघाने हरवल्यानंतर माझा आनंद वेगळा होतो …
अगदी खेळापुरतंच बोलायचं तर एका विश्व चषक स्पर्धेत याच संघानं अत्यंत निर्दयी समाचार भारतीय गोलंदाजांचा घेवून त्यांची नामुष्की केली होती. बंगाल्यांनी त्यावेळी ढेपाळलेल्या संघाचाही निषेध करत कलकत्याच्या स्टेडियमवर गोंधळ घातला होता. कांबळीला त्यावेळी रडे आवरले नव्हते.
अशा अनेक गोष्टींमुळेही मला श्रीलंकेच्या संघाला ह्या व अशा प्रकारच्या विजयानंतर ‘धडा शिकवला’ असल्याचा आनंद होतो. तसाही, हिणकस वृत्तीच्या संघाला आजचा हा दुसरा धडा आहे. पहिला तर काही महिन्यांपूर्वीच असेच त्यांच्याच देशात पन्नाशीत सर्वबाद करून दिला होताच; वर जिगरबाज आणि दिलेर सिराजने आपल्या पुरस्कारातील लाखो रुपये श्रीलंकेतील मैदानाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीसाठी बक्षीस देवून भारतीय दाक्षिण्याचा वस्तुपाठ दिला होताच. लज्जास्पद पराभवानंतरचे हे वरचे दाक्षिण्य तोंड दाबून त्यांना स्वीकारावे लागले होतेच. वर्तनाचाही धडा त्यांनी घेण्याची तरी सुसंस्कृती त्यांनी दाखवावी.
या सर्वामुळेच भारतीय संघाचे कौतुक, अभिनंदनच नव्हे, अभिवादन करावे, असे वाटते. मानवंदनेस पात्र असा हा आजचा विजय आहे.
भारताकडून मात्र अगदी छान जम बसलेल्या फलंदाजांनी आश्चर्यकारक अशा चुकीच्या फटक्यांनी बाद व्हावे आणि त्यात आज तीन शतके हुकावीत, हे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात खदखदखणारे एक शल्य मात्र भारतीय फलंदाजांनी लक्षात ठेवावे. त्याचप्रमाणे, एकदा तरी ४०० च्या पार धावसंख्या फलाकावर लावण्याचीही दुर्मीळ संधी गमावल्याचेही शल्य लक्षात राहण्या – ठेवण्यासारखे आहेच.
… पण तरीही … भारतीय संघाला मानवंदना आहेच. शुभेच्छाही … आणि एका उद्दामवृत्तीच्या, एरवी बऱ्या लौकिकाच्या संघाला एकतर्फी विनासायास आणि प्रेक्षकांना क्षणभरही दडपण न येवू देता मिळवलेल्या विजयाचा एक अपूर्व आनंद दिल्याबद्दल धन्यवादही … !

डॉ.संतोष कुलकर्णी ,लातूर