जून २०१९ च्या दरम्यान मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना उपाध्यक्षाच्या खुर्चीत बसून जिल्हाभरातून समोर येणाऱ्या नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत होतो.सतत समोर वीस-पंचवीस लोकांचा जत्था बसलेला असायचा.अशातच भूम येथून आलेली दोन निष्पाप बालकं, अत्यंत निरागसपणाने माझ्याकडे पाहत उभी आहेत,त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा ओघळत आहेत असं दिसलं.मी त्यांना जवळ घेऊन विचारलं तेंव्हा ती भावनावश होऊन ओक्सबोक्षी रडत होती.त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.
या दोन लेकरांना भूम जिल्हा (उस्मानाबाद) धाराशिव येथील त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम या घेऊन आलेल्या होत्या. त्यांनीच या दोघांचा परिचय देताना मला सांगितलं,हा प्रतीक गोयकर आणि याची बहीण विश्वांकी गोयकर.काही दिवसांपूर्वी या दोघांच्या आई-
वडिलांचं मोटर सायकल अपघातात निधन झालं.विश्रांती गोयकर हिने एस.एस.सी.बोर्डाची परीक्षा दिली.तिला ९४ टक्के गुण पडले आहेत.लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रवेश मिळावा अशी तिची इच्छा आहे.
त्यांनी सांगितलेली ती करूण कहाणी ऐकल्यानंतर अंगावर शहारे उभे राहिले.मलाही अश्रू अनावर झाले.क्षणात वाटलं की आपण या लेकराच्या अंत:करणातल्या स्वप्नांना साकार करू शकू का? क्षणाचाही विलंब न करता मी त्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.गोपाळराव पाटील यांचं घर गाठलं.डॉक्टर साहेबांना या मुलीच्या प्रवेशाबाबत विनंती केली.त्यांनी सांगितलं की, नुकतंच शाहू महाविद्यालयाने मॅनेजमेंटच्या कोट्यातून प्रवेश देणं बंद केलय.ही मुलगी हटकर समाजाची म्हणजेच NT प्रवर्गातील आहे.त्या प्रवर्गासाठी ९७ टक्के गुण हवे आहेत. त्यामुळं मी याबाबतीत काहीही करू शकणार नाही.असं म्हणताच गोपाळराव पाटलांच्या समोरच माझ्या डोळ्यातील अश्रूचा बांध फुटला..
डॉक्टर साहेबांनी माझ्यातली पवित्र भावना ओळखली आणि तिच्या प्रवेशाबाबत मला काय करता येईल ते मी सकारात्मक दृष्टीने पाहीन,असा शब्द दिला.
खूप दिवस तिचा प्रवेश झाला नाही.मी असंख्य वेळा तिच्या प्रवेशासाठी पाठपुरावा करत होतो.त्यानुसार मी केलेल्या प्रयत्नाला यश आलं आणि विश्वांकीला प्रवेश मिळाला.यापुढे जाऊन खारीचा वाटा उचलत मी तिला शक्य तितकी मदत करण्याचं ठरवलं.त्याप्रमाणं
या जिद्दी लेकरानं परिस्थितीवर मात करत साऱ्या दुःखाला मुठुमती देत ध्येय गाठण्याचं ठरवलं.रात्रंदिवस मेहनत केली. नीटच्या परीक्षेत चांगले गुण घेतले.महाराष्ट्रातल्या नामांकित असलेल्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय,सायन येथे MBBS साठी प्रवेशासाठी ती पात्र झाली.हे कळल्यानंतर माझा ऊर भरून आला.
जि.प.चा उपाध्यक्ष म्हणून मी अनेक कामं केली. शाळांचा पट वाढविण्यासाठी प्रयत्न केले. आपल्या गावापासून दूरच्या जिल्ह्यात अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यांसाठी प्रयत्न केले.शिक्षण विभागाला शिस्त लावून या पवित्र क्षेत्रात शक्य ते योगदान दिलं.जे-जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.गुणवंत शिक्षकांचं पुरस्कार देऊन कौतुक केलं.पण ….
विश्वांकीच्या शिक्षणासाठी, प्रवेशासाठी मला जे काही करता आलं त्याचं समाधान फार वेगळंच आहे.असं कार्य करण्याची संधी मिळाली,हे सुद्धा माझं भाग्यच आहे.या माध्यमातून माझ्या जि.प. उपाध्यक्ष पदाचं सार्थक झालं,याचा मला आज खऱ्या अर्थानं अभिमान वाटला..
रामचंद्र तिरुके