■ स्वतः जिल्हाधिकारी यांनी टोकण यंत्रातून केली सोयाबीनची लागवड ■
लातूर दि.14 ( प्रतिनिधी) कृषी विभागाच्या वतीने लातूर तालुक्यातील मूरूड अकोला गावातील प्रगतशील शेतकरी सोमेश्वर बिडवे व केदारनाथ बिडवे यांच्या शेतावर रुंद वरंबा सरी पद्धतीने केलेल्या सोयाबीन लागवडीची पाहणी करण्यासाठी लातूरचे जिल्हाधिकारी थेट शेतावर पोहोचले. लातूर जिल्ह्यामध्ये यावर्षी खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर रुंद वरंबा सरी पद्धतीने व टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड झालेली असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आज मूरूड अकोला गावाला भेट देऊन पीक पाहणी केली.
याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक शिवसांब लाडके, कृषी विकास अधिकारी सुभाष चोले, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सचिन दिग्रसे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव, तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ संदीप देशमुख, मंडळ कृषी अधिकारी अण्णाराव वाघमारे, सरपंच शिवराज बिडवे उपस्थित होते.
रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड केल्याने बियाणामध्ये वीस टक्के बचत होते, जास्तीचा पाऊस झाला तर पाणी सरीमधून निघून जाते व पावसाचे प्रमाण कमी असेल तर सरीमध्ये पाणी अडते,जमिनीमध्ये जिरते, मुरते, परिणामी जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. एकूण उत्पादनामध्ये वीस टक्क्यांपर्यंत वाढ होते असे याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांनी सांगितले.
स्वतः जिल्हाधिकारी यांनी टोकण यंत्रातून केली लागवड आत्मा व कृषी विभागाच्या वतीने जिल्हाभर सोयाबीनचे रोप अवस्थेतच नुकसानकारक असणारी कीड शंखी गोगलगायीचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध उपाययोजनाचे प्रात्यक्षिके दाखवली. यामध्ये बांधाच्या चारही बाजूने आतील भागात चुन्याच्या भुकटीचा दहा सेंटिमीटर रूंदीचा पट्टा मारून गोगलगायींचे व्यवस्थापन करता येते याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी करून दाखवले. यावेळी सोयाबीन पीक प्रात्यक्षिकाची पाहणी करून सोयाबीनची टोकन पद्धतीने जिल्हाधिकारी यांनी स्वतः टोकण यंत्राने लागवड करून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड करण्याचे आवाहन केले. उपस्थित शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्ये वर्षानिमित्त बाजरी, ज्वारी, राळा, राजगिरा, नाचणी या तृणधान्ये बियाण्याचे पाकिटे वाटप करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांचे शेतकऱ्यांना आवाहन शंखी
गोगलगायीचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे. एक रूपयात पीकाचा विमा उतरवावा. सीएससी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडून विमा भरण्यासाठी आगावू रक्कम घेऊ नये. यासाठी एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लातूर जिल्ह्यात कार्यरत आहे. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांना बॅंकांनी वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत काही अडचण असेल तर तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा अशा सूचना दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक सूर्यकांत लोखंडे यांनी केले तर आभार प्रगतशील शेतकरी केदारनाथ बिडवे यांनी मानले. याप्रसंगी गावचे उपसरपंच जयलिंग बिडवे, चेअरमन सूरेश पांढरे, प्रगतशील शेतकरी शिवरूद्रअप्पा बिडवे, केदारनाथ बिडवे, सोमेश्वर बिडवे, विकास कारखान्याचे संचालक बाळासाहेब बिडवे, शिवदास घेवारे, रत्नाप्पा घेवारे, आत्माचे तालुका तंत्र व्यवस्थापक सचिन हिंदोळे, विस्तार अधिकारी कृषी नंदकिशोर जयस्वाल, पर्यवेक्षक सूर्यकांत लोखंडे, हणूमंत हरिदास, सचिन साळूंके, कृषी सहाय्यक संगीता विश्वकर्मा, शोभा आडे, महादेव काळदाते, अजित देशमुख यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी व गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.