आज इलाही जमादार यांचा पहिला स्मृतीदिन. त्यासाठी हा लेख.
अरबी, फारसी भाषेतून, उर्दू – हिंदीमध्ये आलेली गज़ल, मराठीत तुलनेने उशिराने रुजली, स्थिरावली. त्याकाळात मराठी साहित्य क्षेत्रात मराठी कवी आणि कवितांचं प्राबल्य अधिक असल्यामुळे, माधव ज्युलियन यांनी मराठी भाषेत रुजवलेला गज़ल काव्यप्रकार मराठीत म्हणावा तसा, म्हणावा तितका रुजू शकला नाही. पण नंतर गझलसम्राट सुरेश भट यांनी सचोटीने, सातत्याने आपल्या अभ्यासपूर्ण अशा संवादात्मक शैलीने मराठी गज़ल रुजवली आणि गज़लेला मानाचं स्थान त्यांनी मिळवून दिलं. त्याकाळात गज़ल ही काव्यविधा उपेक्षितच समजली गेली. दर वर्षी होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनामध्ये कवितेला स्थान मिळत होते पण गज़ल मात्र उपेक्षितच राहिली. खरं तर गज़ल हा कवितेचाच एक प्रकार, पण गज़लेच्या तंत्रानुगामितेमुळे, नियमांमुळे गज़लेस कृतकपणाचा दोष लागला.
कविवर्य सुरेश भट यांच्यानंतर दुसऱ्या फळीतील कवींमध्ये इलाही जमादार हे नाव फार महत्त्वाचं आहे १ मार्च १९४६ मध्ये सांगली जिल्ह्यात जन्मलेले इलाही, आपलं शिक्षण संपताच, नोकरीनिमित्त प्रथमच घर सोडून पुण्याला आले. आपल्या आई-वडिलांपासून, नातेवाईकांपासून प्रथमच दूर राहताना त्यांना खूप एकटं वाटायचं. त्यांना एकांत सहन व्हायचा नाही आणि अशा अवस्थेत त्यांनी कवितेला जवळ केलं आणि मनातील विचार, भावना ते कागदावर उतरू लागले, पुण्यात आयोजित केल्या जाणारे मुशायरे पाहण्यासाठी जाऊ लागले. अशाच एका मुशायऱ्यात त्यांची सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्याशी ओळख झाली आणि तिथून खऱ्या अर्थाने त्यांच्या गज़ल लेखनाचा प्रवास सुरू झाला. इलाहींच्या गज़ल लेखन शैलीने आपले स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या गज़ल लेखन शैलीवर सुरेश भटांच्या लेखन शैलीचा प्रभाव कधीही जाणवला नाही. सुरेश भटांनी जास्तीत जास्त रचना या अक्षरगणवृत्तात लिहिल्या, कारण गज़ल ही मुळात फारसी उर्दूतून मराठीत आली ती अक्षरगणवृत्ताचं लेणं लेऊन. पण इलाहींनी उत्तमोत्तम अशा गज़ला शब्दबद्ध करताना अक्षरगणवृत्तासोबतच मात्रावृत्ताचाही कौशल्याने वापर केला. मात्रावृत्तात लिहिताना त्यांनी लय, यती उत्तमपणे सांभाळली. त्यामुळे त्यांची गझल कधीही वाचणाऱ्याला किंवा ऐकणार्याला खटकली नाही.
उत्तमोउत्तम शब्दांची निवड, अभ्यासपूर्ण आशयांची मांडणी, वेगवेगळे खायाल त्याचबरोबर मराठी गज़लेत प्रथमच वापरला जाणारा मक्ता किंवा तखल्लुस, शायराचे उपनाम यामुळे इलाहींच्या गझला वाचताना, ऐकताना त्यांचं वेगळेपण जाणवायचं. गज़लनवाज श्री भिमराव पांचाळे यांनी संगीतबद्ध करून गायलेल्या गझल अल्बम मध्ये सर्वात जास्त गज़ला या इलाहींच्या आहेत. यातून इलाहींच्या गज़ल सामर्थ्याची, लेखन सामर्थ्याची प्रचिती आपणास आल्यावाचून राहत नाही.
वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे?
पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे?
रोज अत्याचार होतो आरशावरती अता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा
अशा शेरांनी सुरू होणारा एक जखम सुगंधी हा गज़ल अल्बम मराठी रसिकांना अलगदपणे मराठी गज़लकडे आकृष्ट करत गेला. गज़लनवाज श्री भिमराव पांचाळे यांच्या अल्बम मधील इलाहींच्या खालील गज़ला विशेष लोकप्रिय आहेत.
१. भावनांची वादळे उठली अचानक
छेडताना तारही तुटली अचानक
२. घर वाळूचे बांधायाचे
स्वप्न नसे हे दीवाण्याचे
३. काळजाला सारखा जाळीत गेलो
मी तिला भेटायचे टाळीत गेलो
४. हे असे बागेवरी उपकार केले
कत्तली करुनी फुलांचे हार केले
५. आकाशाला भास म्हणालो चुकले का हो
धरतीला इतिहास म्हणालो चुकले का हो
मराठी गज़ल ही पारसी उर्दूतून आलेल्या नियमांवर चालणारी अशी काव्यविधा. सुरेश भटांनी अतिशय काटेकोरपणे त्या नियमांचे पालन करीत अक्षरगणवृत्तात मराठी गज़ला लिहिल्या. मराठीत गज़ल लिहिताना शुद्ध काफिया वापरण्याबाबत सुरेश भटांचा विशेष आग्रह असे. पण इलाहींनी आपल्या गझलांमध्ये विविध प्रयोग करत मराठी गझलेला वेगळे आयाम देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अक्षरगणवृत्ताबरोबरच मात्रा वृत्तांचाही अतिशय कौशल्याने वापर केला. त्याचबरोबर शुद्ध काफिया वापरण्याबरोबरच स्वरांचा काफियाही तितकाच परिणामकारकतेने वापरून शेरांमधील आशयाची व्याप्ती वाढवली. गज़ल ही दोन ओळींचे शेर असलेली काव्यविधा. इलाहींनी मराठीत सर्वप्रथम तीन ओळींचे शेर लिहिण्याचे प्रयोग केले. त्याचबरोबर पहिला मिसरा (ओळ) मराठीत तर दुसरा मिसरा उर्दूत. तसेच पहिला मिसरा उर्दूत आणि दुसरा मिसरा मराठीत, असे नवनवीन प्रयोग मराठी गज़लेत त्यांनी केले.
खालील अशीच एक गज़ल ‘रंगा पतंगा’ या चित्रपटात खूप गाजली आहे.
ऐ सनम आँखों को मेरी खूबसुरत साज दे
येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे
ते पुढे आपल्या गजलेत असंही म्हणतात
उम्र अब ढलने लगी है, कर लूँ कुछ बहर-ए-खुदा
टाळ चिपळ्या दे इलाही, आणखी पखवाज दे
इलाही जमादार हे आपल्या शब्दांमधून जितके मनमोकळेपणाने प्रखरपणे व्यक्त होत असत, तितके सभा, व्यसपीठांवरून होत नसत. काहीसे एकांतप्रिय असलेले इलाही स्वभावाने मितभाषी, सभा संमेलनांपासून दूर राहणारे असे. पण आपल्या चाहत्यांसोबत, आपल्या वाचक, रसिकांसोबत मात्र ते दिलखुलासपणे रंगून जायचे. मराठीत गज़ल लिहू पाहणाऱ्या कित्येक तरुणांना त्यांनी उत्तम मार्गदर्शन केले, प्रोत्साहन दिले आणि आपला गज़ल वारसा पुढे चालू ठेवला.
आज इलाही सर या भूतलावर नसले तरी त्यांचे शब्द, त्यांचे शेर, त्यांच्या गज़ला, त्यांचे दोहे, त्यांचे विचार, मराठी जनमनात नेहमी करिता, चिरंतन, अमर राहतील हे मात्र नक्की. या तेजस्वी गज़ल पुत्रास भावपूर्ण आदरांजली.
- व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद
संपर्क: 9500484442