औरंगाबाद : ( विशेष प्रतिनिधी) –पाचोरा मतदार संघातील आमदारगुलाबराव पाटलांना जळगाव जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीने मुक्ताईनगरच्या एकनाथराव खडसेंचे पुनरागमन अडचणीचे तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगतापांना आमदारकीची टॉनिक मिळणे दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न परवडणारे. एक छगन भुजबळ काबूत ठेवता येत नसताना खडसे सारखा आणखी एक नेता झेलण्यास अजितदादा खुश असण्याचे संभवत नाही तर प्रवक्ते संजय राऊतांनी अपक्षावर शब्दबाण चालवून ‘घोडे’ पांगवलेले आणि मविआचे निर्माते पावरबाज शरद पवार ऐन मतदानाच्या तोंडावर दिल्लीत जाऊन बसलेले … अशा चित्र-विचित्र परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान सुरू झाले आहे.
दहा दिवसांपूर्वीच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीतील मोठया भावाला , शिवसेनेला जोरदार फटका बसला होता आणि त्यामुळे आघाडीतील घटक पक्षात एकप्रकारचा तणाव निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे. शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने परस्परांच्या आमदारांच्या भेटीगाठी चर्चेचा विषय ठरला होता.शिवसेनेने याबाबत नाराजीचा सूर चांगलाच मोठा केला होता. शेवटच्या क्षणी सुद्धा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना भेट दिली नाही त्यामुळे काँग्रेसच्या या व निवडणुकीतील भवितव्यावर टांगती तलवार कायम असल्याचे दिसून येते.
हे वृत्त प्रसिद्ध होण्यापूर्वीच संध्याकाळी पर्यंत मतमोजणीला प्रारंभ झालेला असेल . यावेळी मतदान गुप्त पद्धतीने होत असल्याने त्यासंबंधी काही अंदाज बांधणे फारसे योग्य होणार नसले तरी निवडणुकीतील जय-पराजय महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने दिशादर्शक असेल हे मात्र नक्की .
●यांचे भवितव्य ठरणार●
●शिवसेना : सचिन अहीर व आमश्या पाडवी
●राष्ट्रवादी : रामराजे निंबाळकर व एकनाथ खडसे
●काँग्रेस : चंद्रकांत हंडोरे व भाई जगताप
●भाजपा : प्रवीण दरेकर,राम शिंदे,श्रीकांत भारतीया,उमा खापरे आणि प्रसाद लाड
राष्ट्रवादीचे तीन आमदार अद्यापही मुंबईबाहेर !
अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीच्या मतदानाचा दिवस उजाडला असला राष्ट्रवादीचे तीन आमदार अद्याप मुंबईत पोहचलेले नसल्यामुळे पक्षापुढील डोकेदुखी वाढली आहे. यामध्ये खेडचे आ.दिलीप मोहिते, पिंपरीचे आ. अण्णा बनसोडे आणि कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांचा समावेश आहे. मात्र पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचे व मतदानाची वेळ संपण्यापूर्वी ते पोहचतील असे सांगण्यात येत आहे.
अण्णा बनसोडे हे प्रकृतीच्या कारणास्तव तर आशुतोष काळे हे स्थानिक निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने आतापर्यंत मुंबईत येऊ शकले नसल्याचे समजते. मात्र दिलीप मोहिते पाटील यांच्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.दरम्यान, राज्यसभा निवडणुकीतही हे आमदार मतदानाच्या दिवशी मुंबईत उशिरा पोहोचले होते हे येथे उल्लेखनीय होय .
बविआचे आमदार क्षितीज ठाकूर धावतपळत मुंबईत
एक-एक मत महत्त्वाचे असलेल्या या निवडणुकीत दोन्ही बाजूने जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच नातेवाइकाच्या उपचारासाठी न्यूयॉर्कमध्ये गेलेले बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर अखेर मतदानाच्या दिवशी मुंबईत दाखल झाले आहेत.