*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास सार्थ करून दाखवू -पाशा पटेल*आपण आजवर शेतकऱ्यांसाठीच जीवन समर्पित करत आलेलो असून, देशाचा पोशिंदा जगला पाहिजे यासाठी आपले यापुढेही प्रयत्न राहणार आहेत. बांबू शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाबु लागवडीची संकल्पना शेतकऱ्यांत रुजवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीवर केंद्र सरकारने तीन मोठ मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या असून, प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून विश्वास सार्थ करून दाखवू, अशी प्रतिक्रिया पाशा पटेल यांनी दिली. शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. या समितीवर संधी दिली, हे मी माझे भाग्य समजतो, असे सांगून पाशा पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
*लातूर/प्रतिनिधी* : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र बांबू लागवड चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत बांबू लागवड सल्लागार समितीचे गठन केले असून, या समितीत सदस्य म्हणून बांबू लागवड चळवळीचे प्रणेते तथा महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी पाशा पटेल यांचा केंद्र सरकारच्या व्यापार मंडळ, झिरो बजेट अर्थात शून्य खर्चावर आधारित शेती संबंधित झिरो बजेट शेती समितीवर नियुक्ती केलेली असून, आता बांबू लागवड सल्लागार समितीवर त्यांची नियुक्ती करून केंद्र सरकारने विश्वास दाखवत त्यांच्या कार्याची पावती देत त्यांच्यावर तीन मोठ मोठ्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत, ही महाराष्ट्रासाठी निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढवय्ये नेते म्हणून ख्याती असलेल्या पाशा पटेल यांच्यावर केंद्र सरकारने गेल्या काही दिवसात दोन मोठ्या जबाबदाऱ्या सोपवून एक प्रकारे त्यांच्या कार्याची पावती दिली असून, शेतकऱ्यांचा सन्मान वाढविला आहे. इतर प्रजातींसह बांबूच्या मिश्र लागवड /आंतरपीकांच्या मुद्द्यांवर सल्ला देणे, बांबूच्या लागवडीच्या घनतेबद्दल सल्ला देणे, सल्लागार गटाकडे संदर्भित इतर कोणतीही संबंधित समस्या निवारण करणे यासाठी बांबू लागवड सल्लागार समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष महात्मा गांधी नरेगा योजनेचे सहसचिव अमित कटारिया हे आहेत. निमंत्रक म्हणून ग्रामविकास विभागाचे धर्मवीर झा, सदस्य म्हणून पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाचे प्रतिनिधी, राष्ट्रीय बांबू अभियान विभागाचे प्रतिनिधी, कोकण बांबू व ऊस विकास केंद्राचे सदस्य संजीव करपे, ट्रांसफार्म रुरल इंडिया फॉर्मेशनचे पाशा पटेल, ग्रोमर बायोटेक लिमिटेड होसुरचे एस. एन. भारती, ग्रीन बांबू टेक जबलपूरचे सुभाष भाटिया, पुंगी जैविक ऊर्जा फार्मर प्रोडूसर कंपनी प्रतापगडचे ललित शर्मा, एफ. आर. प्रतिनिधी, मेसर्स गजरोला फार्म्स अग्रोटेक पीलीभीत उत्तर प्रदेशच्या कु. कल्पना परमार यांचा समावेश करण्यात आला आहे. या सल्लागार समितीवर प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रातून एकमेव पाशा पटेल यांचा यांचा समावेश करण्यात आला आहे. पाशा पटेल यांच्यावर पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा विश्वास दाखवत महाराष्ट्रासह शेतकऱ्यांचा गौरव वाढविला आहे.