*म्युनिक ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये झालेली इस्रायली खेळाडूंची हत्या !*
* ४८ वर्षांपूर्वीचा हादरवून टाकणारा प्रसंग *
नुकतीच टोकियो, जपानमध्ये ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली आहे. जगातील सर्व देशातील, विविध खेळातील खेळाडूंनी आपले क्रीडा कौशल्य दाखवावे, पारितोषिके जिंकावीत, प्रसिद्धी मिळवावी असे अनेक उद्देश या खेळांमधून साधले जातात. यजमान देशाच्या आयोजन कौशल्याचा प्रचंड कस लागतो. दर्जेदर तंत्रज्ञान, नियोजन, सोयीसुविधा, मनोरंजन यांची रेलचेल असते. अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. जगातील खूप मोठा आणि प्रतिष्ठित असा हा क्रीडा कुंभमेळा आहे.
१९७२ च्या म्युनिक, जर्मनी येथील या ऑलिम्पिक महोत्सवाला अत्यंत धक्कादायक रक्तरंजित बट्टा लागला. स्पर्धा सुरु असताना इस्राएलच्या ११ खेळाडूंची निर्घृण हत्त्या झाली. पॅलेस्टाईनच्या ब्लॅक सप्टेंबर या अतिरेकी गटाने ही हत्त्या घडवून आणली. संपूर्ण जगाला याचा प्रचंड धक्का बसला.सर्वत्र संताप उसळला. ‘ खेळांमधून सौहार्द ‘ या तत्वालाच ही तिलांजली होती. तरीही खेळ चालूच ठेवण्याच्या, ऑलिंपिक कमिटीच्या भावनाशून्य निर्णयाच्या विरोधात आणखीनच संताप उसळला. अखेर नमते घेऊन ऑलिम्पिक्सच्या इतिहासात प्रथमच ३४ तास खेळ थांबविण्यात आले होते. ऑलिम्पिक स्टेडियममध्ये झालेल्या श्रद्धांजली सभेला ८०००० प्रेक्षक आणि ३००० हजार खेळाडू उपस्थित होते.
आपण भारतीय लोकं अत्यंत शांतताप्रिय आहोत. पाकिस्तान सरकारने पुरस्कृत केलेल्या दहशतवादामध्येआजवर हजारो सैनिक आणि निरपराध नागरिक ठार झाले. अब्जावधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली. तरीही खेळ, कला, संगीत यामध्ये राजकारण आणू नका असे सांगणारे राजकारणी, नेते, विचारवंत या देशात आहेत. याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्या कुटुंबातील कुणी सीमेवर हुतात्मा झालेला नसतो. आणि ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती यात मरण पावतात त्यांना विचारतोच कोण ? पण इस्राएल हा देश आपल्यासारखा नाही. इस्राएलने या मृत्यूंचा बदला घेण्यासाठी ‘ ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड ‘ ( बायोनेट ) ची तात्काळ आखणी करून कारवाईला सुरुवात केली. सुमारे २० वर्षे चाललेल्या या ऑपरेशनमध्ये, प्रत्येक अपराध्याला शोधून काढून मारण्यात आले.
६ सप्टेंबर १९७२ च्या संध्याकाळी, मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या तेव्हाच्या इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडिया या पेपरमध्ये, या खेळाडूंना श्रद्धांजली म्हणून एक रेखाटन प्रसिद्ध करण्यात आले होते. यात क्रीडाज्योत घेऊन धावणारा ‘ हाडांचा सापळा ‘ रेखाटण्यात आला आहे. Death stalks the Olympics असे यावर नोंदविलेले आहे. यावरील चित्रकाराची सही / नाव ओळखता येत नाही.
आता टोकियो ऑलिंपिक्स २०२० सुरु आहेत. या निमित्ताने माझ्या संग्रहातील हे या करूण आठवणीचे चित्र सोबत देत आहे.
( कांही संदर्भ – विकिपीडियाच्या सौजन्याने )
*मकरंद करंदीकर.*
*makarandsk@gmail.com*