आपले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध
—आमदार धिरज देशमुख यांनी
केले विविध विकासकामांचे लोकार्पण
रेणापूर : रेणापूर तालुक्यातील पानगाव आणि खरोळा येथे लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण व शुभारंभ शुक्रवारी (ता. ९) करण्यात आले. यावेळी विकासकामांसाठी आणखी भरीव निधी आणून आपले प्रश्न, आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
खरोळा येथील ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासकामांचे लोकार्पण व काही विकासकामांचा शुभारंभ झाला. यात ग्रामपंचायत अंतर्गत स्ट्रीट लाईटचे लोकार्पण, जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या नळ कनेक्शन कामाचे लोकार्पण, अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण, तसेच १५ व्या वित्त आयोगातून झालेल्या १.५ किलोमीटर वाढीव पाईपलाईन कामाचा शुभारंभ, घनकचरा जमा करण्यासाठी कुटुंबांना वैयक्तिक कचराकुंडी वाटपाचा समावेश होता. गावातील सुनियोजित विकासकामांबाबत आमदार श्री. धिरज देशमुख यांनी ग्रामपंचायतीचे व ग्रामस्थांचे यावेळी कौतुक केले.
पानगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक परिसरात १५व्या वित्त आयोगातून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक सभागृहाचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. तसेच, पानगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात पंधराव्या वित्त आयोगातून झालेल्या पेव्हर ब्लॉक कामाचे लोकार्पणही आमदार श्री. धिरज देशमुख यांच्या हस्ते झाले. ही प्राचीन वास्तू असून मंदीराला तीर्थक्षेत्राचा दर्जा व निधी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. या वास्तूचे जतन व संवर्धन करण्यासाठी, दर्शनाला येणाऱ्या भक्त व पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाच्या योजनांतून निधी उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
बाजारपेठ असलेल्या पानगाव येथे विविध रेल्वे गाड्यांचा थांबा असावा, अशी पानगावकरांची मागणी आहे. यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करु. येथे रेल्वे थांबा झाल्यास त्याचा फायदा शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, अधिकारी यांना होणार आहे. यासह अन्य महत्वाचे प्रश्न शासनदरबारी मांडून ते सोडवू, असे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी आश्वस्त केले.
खरोळा – पानगाव रस्त्याचे काम लवकर पूर्ण होणार
पानगावचे चैत्यस्मारक आणि खरोळा फाटा ते पानगाव दरम्यान रखडलेल्या १४ किमी. राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याची दखल घेवून नुकतेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी जी यांनी शासनाच्या बांधकाम विभागाला कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वांच्या सहकार्याने हे थांबलेले काम पूर्ण होणार आहे. ते दर्जेदार व्हावे यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.
—